मायेच्या नात्याची ऊब - ३२
'अद्वैत'चा पायाचा रेटा आणि अमेरिकेतला मुहूर्त!
अद्वैत आता दिवसागणिक चपखल आणि चपळ होत होता. नुसती कूस वळून त्याचं समाधान होईना. आता स्वारीला 'पालथं' पडण्याचे वेध लागले होते.
बेडवर झोपवल्यावर तो आपले छोटे छोटे पाय गादीवर जोरात घासून शरीराला 'रेटा' द्यायचा. तोंड लाल व्हायचं, श्वास रोखून धरला जायचा आणि अखेर एक जोराचा धक्का देऊन अद्वैत 'धप्पकन' पालथा पडायचा!
पालथं पडल्यावर मान उंचावून, विमान चालवल्यासारखे हात पाय हलवत तो जो आनंदाचा चित्कार काढायचा, त्याने अख्खं घर गोळा व्हायचं.
एके दिवशी पुण्यातून पणजी आजींचा व्हिडिओ कॉल आला. आजींनी स्क्रीनवरूनच अद्वैतचे कौतुक केले आणि मग आपला मुख्य मुद्दा मांडला.
"अरुणा, विजया,बाळ आता चांगलं साडेचार महिन्यांचं झालंय. एक चांगला मुहूर्त बघा आणि आधी त्याला मंदिरात नेऊन आणा. आणि हो, त्याचे 'कान' टोचून घ्या आता.
जावईबापू (शार्वीचे बाबा), मी आठवणीने सोन्याच्या काड्या घ्यायला सांगितल्या होत्या. त्या आता काढा बाहेर?"
शार्वीचे बाबा हसून म्हणाले, "हो आई, सोन्याच्या काड्या तर माझ्या बॅगेत एकदम सुरक्षित आहेत!"
पण प्रश्न होता अमेरिकेत कान कुठे टोचायचे? शार्वी म्हणाली, "आजी, इथे मशीनने कान टोचतात ग, बंदुकीसारखं यंत्र असतं त्याने 'क्लिक' केलं की झालं!"
हे ऐकताच आजींचा पारा चढला, "काय? मशीन? मेलं ते यंत्र! आपल्याकडे सोनार कसा प्रेमाने हळूच टोचतो. अद्वैत खूप रडेल ग मशीनने."
राघव म्हणाला, "आजी, इथे एक महाराष्ट्रीयन एरिया आहे, तिथे एक भारतीय दुकान आहे जे पारंपरिक पद्धतीने कान टोचून देतात असं ऐकलंय. पण ते इथून खूप दूर आहे."
शार्वी वैतागून म्हणाली, "अहो, खूप ड्रायव्हिंग करावं लागेल. त्यापेक्षा आपण जेव्हा भारतात येऊ ना, तेव्हाच बघूया कान टोचायचं. आता कुठे घाई आहे?"
पणजींनी तिथूनच डोळे वटारले, "भारतात यायला अजून वेळ आहे. मुहूर्त चुकला की मग नंतर पस्तावाल. बघा काय ते!"
अद्वैतच्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा आता अगदीच 'अनियमित' झाल्या होत्या. तो रात्री दोन वाजता खेळायला उठायचा आणि सकाळी सगळे कामाला लागल्यावर शांत झोपायचा. त्यामुळे घरातले सगळेजण अद्वैतच्या वेळापत्रकानुसारच चालत होते. 'घर आता बाळाभोवती फिरत होतं.'
राघव आणि शार्वीला मदत व्हावी म्हणून दोन्ही बाजूंचे आई-बाबा पडेल ते काम करत होते. त्यात कसलाही संकोच नव्हता.
शार्वीचे बाबा चक्क घराच्या बाल्कनीत किंवा ड्रायरमधून आलेले कपडे नीट घड्या घालून ठेवायचे. कधी कधी तर 'डिश वॉशर'मध्ये भांडी लावणं आणि ती काढून जागेवर ठेवणं हे त्यांचं हक्काचं काम झालं होतं.
तर राघवचे बाबा हातात व्हॅक्यूम क्लिनर घेऊन हॉल साफ करत असायचे. "अरे, बाळ आता रांगायला लागेल, जमीन एकदम स्वच्छ हवी," असं म्हणत ते कोपरान् कोपरा साफ करायचे.
दोन्ही आजी स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ बनवण्यात मग्न असायच्या. अरुणा पोळ्या लाटत असतील तर विजया भाजी फोडणीला टाकायच्या.
एकदा राघव गंमतीने म्हणाला, "काय बाबा तुम्हीं दोघांनीही पुण्यात तुम्ही कधी साधी पाण्याची बाटली भरली नसेल आणि इथे चक्क डिश वॉशर लावताय केर काढताय ?"
त्यावर राघवचे बाबा हसून म्हणाले, "अरे राजा, पुण्यात मी 'रिटायर्ड ऑफिसर' होतो, पण इथे मी अद्वैतचे 'Full-time Servant' आहोत आणि यात जी मजा आहे ती कशातच नाही."
अखेर आजींच्या सांगण्यावरून जवळच्या एका मंदिरात जायचं ठरलं. थंडी थोडी कमी होती. अद्वैतला छान लोकरीचे कपडे, टोपी घालून तयार केलं गेलं. मंदिरात गेल्यावर तिथल्या शांत वातावरणात अद्वैतने चक्क देवाच्या मूर्तीकडे बघून हात हलवले. हे बघून दोन्ही आजींचे डोळे भरून आले.
"बघा, संस्कार रक्तामध्ये असतात ते असे!" विजया हळूवारपणे म्हणाल्या.
बाहेर बर्फाच्या कणांवर पडलेलं कोवळं ऊन आणि घरातल्या मोठ्या माणसांच्या चेहऱ्यावरचं समाधान, हे पाहून शार्वीला वाटलं 'हेच तर खरं सुख आहे!'
पुढील भागात: अद्वैतचं पहिलं 'रांगणं' आणि कान टोचताना झालेली धावपळ!
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा