"मायेच्या नात्याची ऊब" भाग - ३३
'मशीन' की 'सोनार'? आणि अद्वैतचे पहिले शब्द!
मंदीरात दर्शन घेतल्यानंतर
पुढे जवळच असलेल्या अमेरिकेतल्या त्या भारतीय वस्तीतल्या एका छोट्याशा दुकानासमोर राघवची गाडी उभी राहिली.
दुकानाच्या पाटीवर 'इंडियन ज्वेलर्स' असं वाचल्यावर आजींना पुण्यात बसून थोडं समाधान वाटलं. मधून मधून पणजी आजींचा व्हिडिओ कॉल सुरूच होता.
त्या स्क्रीनवरूनच दुकान न्याहाळत होत्या.
"अरुणा, त्या सोनारदादांना म्हणावं, हात जरा हलका ठेवा. आणि हो, यंत्र-बित्र वापरू नका म्हणावं, आपल्या पद्धतीनं हातानेच टोचा!"
आजींच्या सूचना पुण्यातून थेट अमेरिकेत घुमत होत्या.
दुकानातले ते अनुभवी सोनार काका हसले. ते म्हणाले, "आजी, काळजी करू नका. मी कोल्हापूरचाच आहे.
इथे कितीही मशीन आल्या तरी आपल्या भारतीय कातडीला आणि बाळाच्या नाजूक कानाला सोनाराचा हातच बरा! मशीनने कान 'शॉक' बसल्यासारखा होतो.
पण हाताने टोचताना आम्हाला अचूक नस समजते."
सोनार काकांनी राघवला अद्वैतला मांडीवर घेऊन स्थिर बसायला सांगितलं.
शार्वीच्या बाबांनी अद्वैतचे दोन्ही पाय घट्ट धरले, तर अरुणाने त्याचे छोटे हात पकडले. शार्वीला मात्र ते बघवेना, ती दुकानाच्या कोपऱ्यात जाऊन उभी राहिली.
आजी फोनवरून ओरडल्या, "विजया, बाळाच्या कानावर सोन्याची काडी टेकवली की लगेच त्याच्या तोंडात साखरेचा खडा टाक किंवा त्याचं लक्ष दुसरीकडे वळवा!"
सोनार काकांनी हातात ती सोन्याची अणकुचीदार काडी धरली. अद्वैत मोठ्या कुतूहलाने त्या चमकणाऱ्या वस्तूंकडे बघत होता.काकांनी हळूच त्याच्या कानाच्या पाळीला स्पर्श केला आणि एका क्षणात, अत्यंत सफाईदारपणे ती काडी आरपार गेली!
"आंऽऽऽऽऽ..." अद्वैतचा चेहरा एका सेकंदात लाल झाला आणि त्याने जोराचा टाहो फोडला. तो रडताना पाहून राघवच्या डोळ्यांतही पाणी आलं. "बस, बस... झालं रे सोन्या!" राघव त्याला थोपटत होता.
"दुसरा कान राहिलाय, पटकन उरकून घ्या!" पणजी आजींनी तिथूनच धीर दिला. दुसऱ्या कानावेळी अद्वैतने जास्तच धडपड केली.
तो रडत रडत आजोबांकडे हात पसरत होता. जेव्हा दोन्ही कानात काड्या बसल्या, तेव्हा अद्वैत इतका रडला की त्याचा श्वास भरून आला. सोनार काका म्हणाले, "हे बघा, मशीनने केलं असतं तर गाठ पडली असती, पण आता हे छान निवळेल."
घरी परतताना अद्वैत गाडीतच रडून रडून थकला आणि झोपी गेला. पण घरी आल्यावर पुन्हा तो रडत जागा झाला. कानाला थोडाही हात लागला तरी तो किंचाळत होता.
विजयानं लगेच 'बेबी क्रीम' आणलं. "माझ्या राजाला खूप दुखतंय हो..." म्हणत त्यांनी अत्यंत नाजूकपणे त्या टोचलेल्या जागी क्रीम लावलं.
क्रीमचा स्पर्श होताच अद्वैत क्षणभर दचकला, पण मग त्या थंडाव्याने त्याला थोडं बरं वाटलं. त्याने रडवेल्या नजरेने आजीकडे पाहिलं, जणू तो विचारत होता, "आजी, कशासाठी हे दुखणं?"
संध्याकाळ झाली आणि अद्वैतचा मूड बदलला. झुल्यावर बसून आजोबांच्या चष्म्याकडे बघताना त्याच्या तोंडातून अचानक सूर उमटले...
"बा... बा... बा... बा..."
सगळेजण थबकले! टीव्हीचा आवाज म्यूट झाला. राघव गुडघ्यावर बसून त्याच्या समोर आला. "शार्वी, ऐकलंस? तो 'बाबा' म्हणतोय!"
शार्वी डोळ्यांतले आनंदाश्रू पुसत म्हणाली, "अहो, तो 'बाबा' नाही, तो रडून रडून आता तक्रार करतोय तुम्हाला. पण खरंच, तो आता बोलायला लागलाय!"
अद्वैतचं ते बोबडं "बा-बा-बा" आता घरात घुमू लागलं होतं. कान टोचल्याच्या वेदनेवर त्या शब्दांनी जणू मायेची फुंकर घातली होती.
पुण्यातून पणजी आजींनी जेव्हा हे ऐकलं, तेव्हा त्या म्हणाल्या, "बघितलंत? सोनाराने कान टोचले आणि देवानं जीभ उघडली! मुहूर्त कधीच वाया जात नाही."
अद्वैत आता काय काय बाललीला करणार? कि अजूनही काही. पाहूया पुढील भागात...
क्रमशः.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन" fevorite"आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा