Login

"मायेच्या नात्याची ऊब" भाग - ३५

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
​मायेच्या नात्याची ऊब - ३५
​ परतीचे वेध!
​अद्वैतचं 'बा-बा' म्हणणं आणि त्याचं ते इवलंसं रांगणं, यात घर कसं गुंगून गेलं होतं कोणालाच कळलं नाही. पण कॅलेंडरच्या पानांनी मात्र आपली गती कायम ठेवली होती.
एका संध्याकाळी राघवने लॅपटॉपवर काही कागदपत्रं तपासली आणि घराच्या वातावरणात थोडी शांतता पसरली.
​"आई, तुमचे सहा महिने कसे संपले कळलंच नाही ग! तुमच्या व्हिसाची मुदत आता संपत आली आहे," राघव हळूवारपणे म्हणाला.
​हे ऐकताच विजया अरूणाचे हातातील काम थांबलं आणि अरुणाचा चेहरा क्षणभर उतरला.
आजोबा तर तीन महिन्यांच्या व्हिसावर आले होते. त्यांच्याकडे तर आता मोजकेच दिवस उरले होते. अद्वैतच्या येण्याने आणि त्याच्या संगोपनात वेळ इतका वेगाने धावला की 'परतीचा प्रवास' इतक्या जवळ आला असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं.
​ शार्वी म्हणाली, "आई, तुम्ही सगळे
गेल्यावर आमचं कसं होईल ग? अद्वैत तर तुमच्याशिवाय राहूच शकत नाही."
​पुढच्या पंधरा दिवसांत घरात एक वेगळीच लगबग सुरू झाली.तिकिटं कन्फर्म झाली होती. आता ही लगबग अद्वैतच्या खेळण्यांची नव्हती, तर अरुणा आणि विजयाची शार्वीला 'सक्षम' करण्याची होती.
अद्वैतच्या वरच्या जेवणाची पद्धत, घरगुती 'सरॅलॅक' बनवणं आणि राघवला बाळाला न्हाऊ घालण्याचं प्रशिक्षण देणं यात सगळे मग्न झाले.
राघव आणि शार्वी एखाद्या विद्यार्थ्यासारखे 'नोट्स' काढत होते.
​तेवढ्यात राघवने आनंदाची बातमी दिली, "सगळ्यांची तिकिटं कन्फर्म झाली आहेत!"त्या बरोबर आमचीही. हे सरप्राईज तुमच्यासाठी.
​ राघव आणि शार्वीने विचार केला होता की, आजी-आजोबा पुण्यात परतणारच आहेत, तर आपणही त्यांच्यासोबत का जाऊ नये? अद्वैत आता सहा महिन्यांचा होईल, त्याला पुण्यातल्या नातेवाईकांना आणि विशेषतः आतुरतेने वाट पाहणाऱ्या पणजी आजींना दाखवण्याची हीच उत्तम वेळ होती.
​"आई, आपण सगळेच एकत्र भारताला निघतोय! अद्वैतचा पहिला विमान प्रवास आणि त्याचं अन्नप्राशन आपण पुण्यातच करूया," राघव उत्साहाने म्हणाला.
​तिकिटं कन्फर्म झाल्याचं ऐकताच घरातलं मळभ दूर झालं. परतीचं दुःख आता 'स्वदेशाच्या ओढीमध्ये' बदललं होतं.
"बरं झालं बाबा, एकदाचा अद्वैत त्याच्या घराण्याला आणि पुण्याला भेटेल!" विजया राघवची आई आनंदाने म्हणाल्या.
​शार्वीचे बाबा हसून म्हणाले, "चला, म्हणजे आता अमेरिकेच्या घराचं कुलूप लावण्यापूर्वी आपल्याला अद्वैतची बॅग भरावी लागेल!"
​अद्वैत मात्र या सगळ्यातून अनभिज्ञ होता. तो आपल्या रांगण्याच्या नादात आजोबांच्या पायजम्याला धरून उभा राहण्याचा प्रयत्न करत होता, जणू तो म्हणत होता - "तुम्ही मला कुठेही नेलं तरी चालेल, फक्त तुमची ही 'मायेची ऊब' माझ्यासोबत राहू द्या!"
अद्वैतचा सातासमुद्रापारचा पहिला विमान प्रवास आणि पुण्याच्या विमानतळावर झालेलं जंगी स्वागत!
​पाहूया का पुढील भागात!..
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन" fevorite " आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all