Login

"मायेच्या नात्याची ऊब" भाग - ३७

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
​मायेच्या नात्याची ऊब - ३७
​घरगुती अन्नप्राशन (बाळाचे उष्टावण) सोहळा
​पुण्यातील शार्वीच्या माहेरी पाऊल ठेवल्यापासून अद्वैतची नुसती चंगळ सुरू होती. अमेरिकेत तो फक्त आई-बाबा आणि दोन्ही कडील आजी-आजोबांच्या मर्यादित घोळक्यात असायचा. पण इथे तर त्याला उचलून घेण्यासाठी हातांची उणीवच नव्हती. शार्वीचे मामा, मामी, आत्या, काका-काकू... प्रत्येकामध्ये अद्वैतला कडेवर घेण्यासाठी नुसती स्पर्धा सुरू असायची.
​एके दिवशी दुपारी सगळे गप्पा मारत बसले असताना, पंजी आजींनी अद्वैतला मांडीवर घेतलं आणि कौतुकाने म्हणाल्या, "शार्वी, अगं आपला राजा आता सहा महिन्यांचा झालाय! आता फक्त दुधावर कसं होणार? त्याला आता अन्नाची चव मिळायला हवी. बाळाला 'वरचं' अन्न सुरू करण्याची हीच योग्य वेळ आहे."
​शार्वी सहज बोलून गेली, "हो आजी, आम्ही देणारच होतो त्याला वरचं. तिथे अमेरिकेत सॅरलॅक आणि तयार बेबीफूडचे डबे मिळतात, तेच आम्ही त्याला सुरू करणार होतो."
​हे ऐकताच आजींनी कपाळावर आठ्या घातल्या आणि म्हणाल्या, "छे! ते डब्यातलं कोरडं अन्न काय कामाचं? ते काय खाणं झालं का? आपल्या बाळाला घरचं ताजं, सात्विक आणि पौष्टिक अन्नच मिळायला हवं."
​राघव म्हणाला, "हो आजी, तुमचं बरोबर आहे. त्याला घरचं सात्विक अन्नच द्यायला हवं. मग एखादा चांगला हॉल बघूया का? छोटासा कार्यक्रम करू..."
​पण आजींनी लगेच नकार दिला, "अरे नको, हॉल कशाला? आपलं घर कशासाठी आहे? अद्वैत राघव आणि शार्वी या दोन्ही घरांचा वारस आहे. त्याचा हा पहिला अन्नाचा घास आपल्या उंबरठ्याच्या आत, देवघरासमोर व्हायला हवा. मग तो शार्वीच्या माहेरी असो किंवा तुझ्या घरी म्हणजे शार्वीच्या सासरी. ते तुम्ही ठरवा. पण घरच्या घरी जो आनंद आणि मायेची ऊब मिळते, ती बाहेर कुठे मिळणार? आपण साध्या पद्धतीने पण मनापासून हा विधी घरीच करूया."
​आजींच्या या निर्णयाने शार्वी आणि राघव दोघांनाही खूप समाधान वाटलं. मग शार्वीच्या सासरी म्हणजे कोथरूडला हा कार्यक्रम करण्याचे ठरले.
​ठरल्याप्रमाणे, कोथरूडच्या जुन्या वाड्यात राघवच्या घरी घरगुती वातावरणात अन्नप्राशनाची तयारी सुरू झाली. शार्वीने अद्वैतसाठी कोल्हापुरी पद्धतीचं सोन्याचं नक्षीकाम केलेलं पीतांबर आणि डोक्यावर मखमली टोपी खरेदी केली. अद्वैत आज खऱ्या अर्थाने 'राजकुमार' दिसत होता.
​शार्वीची आई, बाबा आणि तिची पंजी आजी तिथे आल्या. आजींच्या हातात एक जुनी कापडी पिशवी होती. त्यातून त्यांनी अत्यंत जपून ठेवलेलं चांदीचं ताट, वाटी, चमचा आणि पेला बाहेर काढला. "शार्वी, हे बघ, हे आमच्याकडचं खानदानी चांदीचं ताट! याच ताटातून तुझं आणि तुझ्या मामेभावाचंही उष्टावण झालं होतं. आज माझ्या पतवंडासाठी मी हे खास घेऊन आले," आजी अभिमानाने म्हणाल्या.
​तेवढ्यात शार्वीचे मामा आणि मामी पाचपक्वान्नांचे डबे घेऊन हजर झाले. मामांच्या घरून आलेल्या खमंग बासुंदी, पुरणपोळी आणि मऊ वरण-भाताचा सुगंध संपूर्ण वाड्यात दरवळू लागला. राघवची आई विजया यांनी अद्वैतसाठी घरच्या सायीच्या दुधाची मऊ खीर खास तयार ठेवली होती.
​राघवने अद्वैतला आपल्या मांडीवर बसवलं. समोर चांदीच्या ताटात खिरीची वाटी ठेवली होती. प्रथेप्रमाणे, मामाच्या हस्ते बाळाला पहिला घास भरवला जातो. शार्वीचा मामेभाऊ पुढे सरसावला. त्याने चांदीच्या चमच्याने थोडी खीर अद्वैतच्या ओठांजवळ नेली.
​अद्वैतने सुरुवातीला तोंड घट्ट मिटून घेतलं. त्याला कदाचित वाटलं असेल की हे पुन्हा काहीतरी 'औषध' आहे की काय! पण जसा खिरीचा एक थेंब त्याच्या जिभेला लागला, तसे त्याचे डोळे मोठे झाले. खिरीची ती गोडी लागताच त्याने स्वतःहून तोंड उघडलं आणि 'आ' करून सगळी खीर फस्त केली! सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. "बघा, बघा... आमचा राजा कसा खवय्या निघाला!" मामा हसून म्हणाले.
​आजींच्या इच्छेखातर परत 'पाचवी'चा कार्यक्रमही करायचा ठरला, कारण आधीच्या पूजेत सगळ्या वस्तूंचे रीतसर पूजन झाले नव्हते. लगेच तयारी झाली. बाळासमोर काही वस्तू ठेवल्या जातात - पुस्तक, सोन्याचं नाणं आणि पेन. अद्वैतसमोर या वस्तू ठेवल्या गेल्या.
​अद्वैतने पुस्तकाकडे पाहिलं, सोन्याच्या नाण्याकडे पाहिलं... पण शेवटी त्याने झडप घातली ती बाजूलाच असलेल्या आजोबांच्या मोबाईलवर! सगळेजण पोट धरून हसले. राघव म्हणाला, "हा 'डिजिटल युगाचा' मुलगा आहे, हा काय सोनं-नाणं उचलतोय!"
​मग अद्वैतच्या मामाला अन्नप्राशनाच्या निमित्ताने छान भेटवस्तू दिली गेली. जेवणं आणि गप्पांचा कार्यक्रम उत्तम पार पडला. रात्री जेव्हा सगळे पाहुणे जायला निघाले, तेव्हा पंजी आजींनी विजयाला पुन्हा आठवण करून दिली— "बाळाची दृष्ट काढायला विसरू नकोस."
​शार्वीने अद्वैतच्या शांत चेहऱ्याकडे पाहिलं. राघव जवळ येत म्हणाला, "शार्वी, बघितलंस? आपण अमेरिकेत कितीही सोयी-सुविधा घेतल्या असत्या आणि सॅरलॅक भरवलं असतं, तरी पुण्यातल्या या 'घरच्या वातावरणात' आणि परंपरेत जी मजा आहे, ती तिथे नक्कीच मिळाली नसती."
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन" fevorite"आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all