मायेच्या नात्याची ऊब - ३८
'ग्रिट अँड मीट' नात्यांचा मेळावा आणि जुन्या आठवणी!
पुण्याच्या घरी आल्यापासून अद्वैतला बघण्यासाठी नातेवाईकांची इतकी गर्दी होऊ लागली की, घराचं स्वरूप एखाद्या जत्रेसारखं झालं होतं.
प्रत्येक जण येताना अद्वैतसाठी कपडे, महागडी खेळणी आणि सोन्याची चांदीच्या वस्तू घेऊन येत होतं.
पण रोजच्या या गर्दीमुळे अद्वैत बावरला होता, त्याला त्याची झोपही मिळेनाशी झाली होती.
"राघव, अद्वैत खूप चिडचिड करतोय रे. सतत नवीन चेहरे बघून तो गोंधळून जातोय," शार्वी काळजीने म्हणाली.
राघवने यावर एक उत्तम तोडगा काढला. "आई, बाबा आपण सगळ्यांना रोज घरी बोलावण्यापेक्षा एक छान हॉल बुक करूया. तिथेच 'ग्रिट अँड मीट' (Greet & Meet) चा सोहळा आणि लंच ठेवूया.
म्हणजे अद्वैतलाही सगळ्यांना एकदाच भेटता येईल आणि एक छान गेट-टू-गेदर होईल."
सर्वानुमते हा ठराव पास झाला. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी (दोघांचेही) आमंत्रणं गेली. हॉल बुक झाला. मेन्यू पास झाला.
ठरल्याप्रमाणे पुण्याच्या एका प्रशस्त हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. आज केवळ नातेवाईकच नाही, तर राघव आणि शार्वीचे मित्र-मैत्रिणीही मोठ्या संख्येने आले होते. राघवचे शाळेपासूनचे मित्र आणि शार्वीच्या कॉलेजच्या मैत्रिणींमुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह होता.
"अरे राघव, हा तर हुबेहूब तुझ्यासारखा दिसतो!" एखादा मित्र म्हणायचा, तर शार्वीच्या मैत्रिणी "नाही गं, डोळे तर अगदी शार्वीवर गेलेत!" असं म्हणत अद्वैतचे लाड करत होत्या. मित्रमंडळी अद्वैतसोबत सेल्फी काढण्यात आणि त्याच्या बोबड्या बोलांचे व्हिडिओ बनवण्यात दंग होती.
अद्वैतही आज मूडमध्ये होता. तो सर्वांकडे बघून आपल्या बोबड्या बोलात 'बा-बा' करत दाद देत होता.
समारंभात चर्चेचा मुख्य विषय होता तो म्हणजे 'रिटर्न गिफ्ट'. शार्वी म्हणाली होती, "लोक अद्वैतसाठी एवढं प्रेमाने काही ना काही आणतायत, तर आपणही रिकाम्या हाताने कोणाला पाठवायचं नाही. नुसतं घेणं नको.
आपल्याकडूनही त्यांना काहीतरी आठवण म्हणून द्यायला हवं."त्यांनी प्रत्येक पाहुण्याला आणि मित्र-मैत्रिणींना 'श्री स्वामी समर्थांची एक सुंदर मूर्ती' आणि पुण्याची अजरामर ओळख असलेला 'चितळेंची मिठाई' असा संच भेट म्हणून दिला.
"अद्वैतच्या आयुष्याची सुरुवात अशा मंगल आशीर्वादाने व्हावी आणि आपल्या माणसांच्या घरातही ही स्वामींची कृपा राहावी," या भावनेने दिलेली ही भेट पाहून अनेकांचे डोळे भरून आले.
जेवणाचा अस्सल पुणेरी बेत रंगला. मऊ वरण-भात, साजूक तूप, लुसलुशीत पोळ्या, मुगाची भजी,मटकीची उसळ आणि केशरयुक्त श्रीखंड. डाव्या उजव्यानं ताटं नुसते भरलेले.
जेवता, जेवता राघव आणि त्याच्या मित्रांच्या जुन्या गप्पा, सहलींच्या आठवणी आणि शार्वीच्या मैत्रिणींची थट्टा-मस्करी यामुळे हॉल हास्याने दुमदुमून गेला होता.
नातेवाईक पण भरभरून कौतुक करत होते. राघव शार्वी सगळ्यांचे आदरातिथ्य करत होते. प्रत्येकाला वेळ देत होते.
राघवचे बाबा अभिमानाने म्हणाले, "शार्वी, कितीही आपण सातासमुद्रापार गेलो, तरी आपल्या माणसांची ही मायेची गर्दी आणि त्यांनी अद्वैतवर केलेला हा आशीर्वादांचा वर्षाव हेच खरं सुख आहे!"
सायंकाळी जेव्हा सोहळा संपून सगळे वाड्यात परतले, तेव्हा अद्वैत राघवच्या खांद्यावर निवांत झोपला होता.
अद्वैतच्या या पहिल्या भव्य पुणेरी भेटीने आणि स्वामींच्या त्या कृपाप्रसादाने सर्वांच्या मनात एक वेगळीच" मायेच्या नात्याची ऊब" निर्माण केली होती.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा