Login

"मायेच्या नात्याची ऊब" भाग - ३९

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
​मायेच्या नात्याची ऊब - भाग ३९
​जेवणावळींचा बेत आणि परतीची चाहूल!
​पुण्यातील 'ग्रिट अँड मीट' सोहळ्यानंतर अद्वैत आता सर्वांचाच लाडका झाला होता. पण आता खऱ्या अर्थाने धावपळ सुरू झाली होती.
राघव आणि शार्वीची सुट्टी संपायला आता काहीच दिवस उरले होते. राघवने तर अमेरिकेच्या वेळेनुसार रात्रीच्या वेळी ऑफिसच्या मीटिंग्स अटेंड करायला सुरुवातही केली होती.
​दुसरीकडे, शार्वीच्या सहा महिन्यांच्या 'मॅटरनिटी लीव्ह'चे शेवटचे दिवस मोजले जात होते. तिलाही लवकरच ऑफिस जॉईन करायचे होते.
पण सध्या या परतीच्या प्रवासाच्या धास्तीपेक्षा घरात वेगळीच चर्चा रंगली होती, ती म्हणजे अद्वैतचा पसारा!
​अद्वैत आता केवळ एका घराचा राहिला नव्हता. त्याचे साम्राज्य राघवच्या घरी जितके होते, तितकेच ते शार्वीच्या माहेरीही पसरलेले होते. दोन्ही घरांत अद्वैतचा पसारा 'तितकाच' असायचा.
राघवची आई विजया यांनी अद्वैतसाठी घराचा एक कोपराच राखीव ठेवला होता.
तिथे त्याची सगळी खेळणी एका टोपलीत भरून ठेवली होती; कारण त्याला कधी काय खेळायला लागेल, याचा नेम नसायचा. त्यामुळे सगळी खेळणी त्याच्या डोळ्यांसमोर असणे गरजेचे होते.
​तसेच शार्वीच्या आईकडे (अरुणाकडे) गेल्यावर तिथेही अद्वैतच्या खेळण्यांची आणि कपड्यांची दुसरी मोठी फौज तयार असायची.
शार्वी हसून म्हणायची, "आई, या दोन्ही घरांचे तर आता अद्वैतचे 'प्ले-स्कूल' झाले आहे! आपण एका घरून दुसऱ्या घरी जाताना अद्वैतला घेऊन जातो की त्याचा पसारा हलवतो, हेच कळत नाही."
पण दोन्हीकडच्या आजी-आजोबांना तो पसारा आवरण्यापेक्षा तो वाढताना बघण्यातच जास्त रस होता.
​दुसरीकडे, नातेवाईकांच्या उत्साहामुळे जेवणावळींना ऊत आला होता. "अरे, बाळ पहिल्यांदाच आलंय, आमच्याकडे जेवायला आल्याशिवाय कसं चालेल?" असा आग्रह प्रत्येक घरातून होत होता.
"शार्वी, आज दुपारी माझ्या मोठ्या काकांकडे जेवण आहे आणि रात्री राघवच्या आत्तेबहिणीने बोलावलंय तुम्हाला!" विजया आणि अरुणा अशा आशयाची कार्यक्रमांची यादीच वाचून दाखवत.
​शार्वी कपाळावर हात लावून म्हणायची, "आई, एवढं जेवण आणि अद्वैतचं सामान घेऊन रोज इकडून तिकडे फिरणं खूप थकायला होतंय हो!"
त्यात राघवच्या रात्री मीटिंग्स असतात, त्यामुळे त्याची झोपही पूर्ण होत नाहीये."
​राघवची तर वेगळीच ओढाताण सुरू होती.
तो लॅपटॉपसमोर बसून ऑफिसचे काम करत असताना अद्वैत रांगता रांगता त्याच्या पायाजवळ यायचा आणि लॅपटॉपच्या वायरशी खेळायला बघायचा.
मग राघव त्याला उचलून म्हणायचा, "बेटा, बाबाला काम करू दे, तुला हवं तर माझा मोबाईल घे!" पण अद्वैतसाठी मात्र बाबाच्या कामात व्यत्यय आणण्यातच जास्त मजा होती.
​एके दिवशी राघवच्या घरी असताना अद्वैत रांगता रांगता थेट एका जुन्या लाकडी कपाटाखाली शिरला. शार्वी त्याला बाहेर काढायला गेली, तर अद्वैतने काहीतरी घट्ट पकडून ठेवले होते. बाहेर आल्यावर पाहिले, तर त्याच्या हातात राघवची बालपणीची जुनी लाकडी खेळणी होती - एक छोटी लाकडी गाडी आणि लाकडी भिरभिरं!
​विजया भावूक होऊन म्हणाली, "बघ शार्वी, बापाचीच ओढ! ही गाडी मी तशीच त्या कपाटाखाली जपून ठेवली होती. मी नेहमी मनाशी म्हणायचे की, आज ना उद्या राघवचे बाळ येईल आणि ते नक्कीच याच गाडीशी खेळेल.
'स्वामी, माझी एवढीच इच्छा पूर्ण करा' अशी मी प्रार्थना करायचे. स्वामींनी माझं ऐकलं बघ.
अद्वैतने बरोबर ती गाडी शोधून काढली." राघव तासनतास याच गाडीशी खेळायचा आणि खेळून झाले की याच कपाटाखाली ढकलून द्यायचा.
हे सांगताना विजयाच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
​रात्री जेवण झाल्यावर राघव शांतपणे म्हणाला, "शार्वी, सुट्टी कशी संपली कळलंच नाही ना? आता पुन्हा तेच धावपळीचं आयुष्य सुरू होईल.
तिथे गेल्यावर या नटखट पोराला कसं सांभाळायचं? आता हे सगळं आपल्याला एकट्याने जमेल का? इथे तर हातोहात अद्वैतला सांभाळलं जातंय, पण तिथे..."
​दोन्ही घरांमध्ये पसरलेला अद्वैतचा तो हक्काचा पसारा पाहून दोघांचेही डोळे भरून आले. शार्वी अद्वैतकडे बघत म्हणाली, "हो रे, कसं होणार कुणास ठाऊक! पण या काही दिवसांत अद्वैतला जी 'मायेची ऊब' मिळाली, ती त्याला आयुष्यभर पुरेल.
आता आपल्याला स्वतःला मॅनेज करायला लागेल. आई-बाबा तरी किती दिवस येतील? त्यांनाही त्यांचं आयुष्य आहेच ना!"
​"चला, सामानाची आवराआवर करताना आता आठवणींची सुद्धा बांधाबांध करायला हवी!"
​क्रमशः.
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन" fevorite"आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all