मायेच्या नात्याची ऊब - ४०
आठवणींची बांधाबांध आणि निरोपाची हुरहूर!
शेवटी तो दिवस उजाडला, ज्याची धास्ती दोन्ही घरच्या आई-बाबांना वाटत होती. अवघ्या दोन दिवसांत राघव, शार्वी आणि छोटा अद्वैत अमेरिकेला निघणार होते.
घरात आता कपाटांतून कपडे बाहेर आले होते आणि हॉलमध्ये मोठ्या सूटकेस उघडल्या गेल्या होत्या.
खोलीत सामानाचा ढीग पडला होता.पण अद्वैत मात्र त्या ढिगाऱ्यातही आपली खेळणी शोधून आनंदाने खेळत होता. त्याला कुठे माहीत होतं की हे सगळं पॅक होऊन आता सातासमुद्रापार जाणार आहे.
राघव आणि शार्वी बॅगा भरत असतानाच दोन्ही आयांची धावपळ सुरू झाली. विजया स्वयंपाकघरातून दोन मोठे स्टीलचे डबे आणले.
"हे बघ शार्वी, या एका डब्यात घरगुती सॅरलॅक आहे. अद्वैतसाठी मी स्वतः धान्य निवडून,भाजून मिक्सरवर दळून तयार केलंय. बाहेरचं पाकीटबंद अन्न देण्यापेक्षा त्याला हेच खाऊ घाल. तब्येतीला चांगलं असतं.
दुसऱ्या डब्यात सुक्या मेव्याच्या करंज्या आहेत, राघव तुला खूप आवडतात ना म्हणून खास करून घेतल्या आहेत." विजया प्रेमाने म्हणाली.
शार्वीने आईंच्या हातातून तो सॅरलॅकचा डबा घेतला. त्या घरी बनवलेल्या सॅरलॅकचा खमंग वास पूर्ण खोलीत दरवळला.
"आई, तुम्ही खूप कष्ट घेतलेत हो. अद्वैतच्या प्रत्येक गोष्टीचा किती विचार करता तुम्ही!" शार्वी भावूक होऊन म्हणाली.
अरुणानं अद्वैतची ती जुनी लाकडी गाडी एका मऊ कापडात गुंडाळून बॅगेत व्यवस्थित ठेवली. "हे सोबत ने, राघवची लहानपणी आठवण म्हणून. अद्वैतला ती खूप आवडली आहे."
राघव बॅगची चेन ओढताना म्हणाला, "आई, एवढं सगळं सामान भरलंय की आता एअरपोर्टवर वजन जास्त होईल की काय असं वाटतंय."
त्यावर अरुणा हसून म्हणाली, "अरे, सामानाचं वजन झालं तरी चालेल, पण घरच्या मायेचं वजन कसं मोजणार? तिकडे गेल्यावर जेव्हा जेव्हा हा खाऊ खाल, तेव्हा आम्ही तुमच्या सोबतच आहोत असं समजा."
खोलीत एकीकडे बॅगांची बांधाबांध सुरू होती, तर दुसरीकडे अद्वैतने बॅगेतच जाऊन बसायचा हट्ट धरला होता. त्याचं ते बाललीला बघून सगळ्यांच्या डोळ्यांत हसू होतं, पण मनात कुठेतरी 'परतीची हुरहूर' दाटून आली होती. दोन महिने कसे संपले, हे कुणालाच कळलं नव्हतं.
रात्री जेवताना आज कुणीच जास्त बोलत नव्हतं. प्रत्येक जण अद्वैतचा निरागस चेहरा डोळ्यांत साठवून घेण्याचा प्रयत्न करत होतं.
सामानाची बांधाबांध झाली होती, पण नात्यांची ही घट्ट विणलेली ऊब सोडून जाणं कुणालाच सोपं वाटत नव्हतं.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा