मायेच्या नात्याची ऊब - ४१: "सातासमुद्रापार मायेची शिदोरी!"
पहाटेचे चार वाजले होते, पण आज कोणाच्याच डोळ्यांत झोप नव्हती. घराबाहेर दोन टॅक्सी येऊन उभ्या राहिल्या होत्या. राघव आणि शार्वीचं सामान एका गाडीत चढवलं गेलं आणि दुसऱ्या गाडीत सगळेच जण बसले.
अद्वैतला विमानतळावर सोडायला दोन्ही घरचे आई-बाबा निघाले होते.
विमानतळाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचल्यावर वातावरणात एक वेगळीच हुरहूर दाटून आली.
विजयानं डब्यातून आणलेली दही-साखरेची वाटी काढली आणि राघव अन् शार्वीच्या हातावर दही साखर ठेवली.राघव शार्वीनं पुन्हा एकदा वाकून नमस्कार केला.
"शुभस्य शीघ्रम! बाळ, सुखाचा प्रवास करा," दोन्ही आईंनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवला.
भावनिक झालेलं वातावरण बघून राघवने विषय बदलण्यासाठी थोडा मिश्किल सूर लावला. तो अरुणाला म्हणाला, "आई, त्या सुक्या मेव्याच्या करंज्या दोघींनी मिळून केल्या आहेत ना! म्हणून विचारतो. तश्या मी लगेजमध्ये नीट ठेवल्या आहेत. पण त्यात खसखस नाही ना घातली?"
कारण आजकाल अमेरिकन एअरपोर्टवर रिस्ट्रिक्शन्स खूप आहेत. खसखस असली की ते लगेच पकडतात. सामान तर सगळं नीट घेतलंय, पण खरी भीती त्या इमिग्रेशनची!"
राघव हसत पुढे म्हणाला, "आता तर पुन्हा ट्रम्प आजोबांची सत्ता आलीये, त्यांचीच कृपा आपल्यावर असू दे म्हणजे झालं! पण सोबतीला हा छोटा अद्वैत आहे, त्यामुळे लहान बाळ बघून जास्त चेकिंग होणार नाही असं वाटतंय." राघवच्या या बोलण्यावर सगळे थोडे हसले.
विजयानं शार्वीला पुन्हा एकदा बजावलं, "शार्वी, मी मिक्सरवर दळून जे घरगुती सॅरलॅक दिलंय ना, तेच त्याला प्रवासात गरम पाण्यात कालवून खाऊ घाल."
शेवटी निरोपाची वेळ आली. अद्वैतने आपल्या दोन्ही आजी-आजोबांना बघून हातांनी 'बाय-बाय' केलं नुकतेच त्याला आजोंबानी बाय् बाय् करायला शिकवले होते.
ते तिघे विमानतळाच्या आत गेले. आत गेल्यावर इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेकिंगची धावपळ सुरू झाली. अद्वैतामुळे त्यांना रांगेत थोडी सवलत मिळाली. एकदाचं सगळं चेकिंग झालं, सामान बोर्डिंगसाठी गेलं आणि राघवने सुटकेचा निश्वास टाकला. राघवने लगेच बाहेर उभ्या असलेल्या बाबांना फोन लावला.
"हॅलो बाबा, आम्ही आत पोहोचलो आहोत. इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेकिंग व्यवस्थित झालंय. सामान सगळं लोड झालंय, आता आम्हाला काही काळजी नाही. तुम्ही आता निघा, पुण्यात पोहोचायला तुम्हाला उशीर होईल. आम्ही विमानात बसल्यावर तुम्हाला फोन करू.
राघवच्या बाबांचा फोनवर आवाज
फोनवर बोलताना पलीकडून थोडा जड झाला. "हो रे बाळा,आम्ही निघतो आता. तुम्ही काळजी घ्या आणि अद्वैतला सांभाळा."फोन ठेवला आणि राघव-शार्वी गेटच्या दिशेने चालू लागले.
विमानाने टेक-ऑफ घेतल्यावर खिडकीतून मुंबईच्या लुकलुकणाऱ्या दिव्यांकडे बघताना शार्वीला जाणीव झाली की, अंतर कितीही असलं तरी ही 'मायेची ऊब' सातासमुद्रापारही त्यांच्यासोबत असणार आहे.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन fevorite आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा