Login

"मायेच्या नात्याची ऊब" भाग - ४४

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
दीर्घलेखन स्पर्धा डिसेंबर- जानेवारी 2025-26
​मायेच्या नात्याची ऊब - ४४:
"सातासमुद्रापारचा तो पहिला व्हिडीओ कॉल!"
अमेरिकेतल्या ब्रुकलिन (Brooklyn)येथील घरी पोहोचल्यावर राघवने हीटर चालू केला आणि घरामध्ये थोडी उब निर्माण झाली.
जॉन एफ. केनेडी (JFK) विमानतळावरून टॅक्सीने अवघ्या वीस मिनिटांत ते इथे पोंहचले होते. बाहेर बर्फाची चादर पसरलेली होती. पण घराची भिंत आता हळूहळू उबदार होऊ लागली होती.
अद्वैत आता थकव्यामुळे शार्वीच्या कुशीतच विसावला होता. शार्वीने त्याला झोपवलं.
शार्वी आवराआवर नंतर आधी आपण सगळ्यांना ग्रुप कॉलवर घेऊन आपण व्यवस्थित पोंहचल्याची बातमी देऊ. ते सगळे फोनकडे डोळे लावून बसले असतील. म्हणत राघवने बॅगेतून लॅपटॉप काढला.आणि सगळ्यांना ग्रुप कॉलवर घेतले.
​ पुण्यात आता सकाळचे नऊ वाजले होते. पलीकडून स्क्रीनवर पटापट सगळ्यांनी फोन उचलला.
दोन्ही घरचे आई-बाबा आणि मध्यभागी सोफ्यावर बसलेली अद्वैतची लाडकी 'पणजी आजी'
​"अरे आले रे आले! पोहोचले माझे बाळ," पणजी आजीचा थरथरणारा पण आनंदी आवाज ऐकून शार्वीचे डोळे भरून आले.
​"आई, बाबा.आम्ही व्यवस्थित पोहोचलो. अद्वैत आताच झोपलाय, खूप प्रवास झाला ना त्याचा," शार्वीने कॅमेरा अद्वैतकडे वळवत म्हटलं.
​पणजी आजी स्क्रीनच्या अगदी जवळ येऊन बघू लागली, "अगं शार्वी, माझा राजा किती थकलाय बघ. त्याला नीट उबदार कपड्यात गुंडाळून ठेव हं, तिकडे खूप बर्फ असतो म्हणतात. आणि विजयानं दिलेली खिमटी तुमच्या भाषेत सॅरलॅक त्याला दिलीस का?
अग हो सॅरलॅक पाजलं का त्याला?"​विजयाने मध्येच विचारलं, "राघव, तुला थंडी वाजतेय का रे? कानात वारे जाऊ देऊ नकोस. आणि शार्वी, डब्यातल्या करंज्या काढल्या का? आज काहीतरी गोड खाऊनच दिवसाची सुरुवात करा."
​राघव हसून म्हणाला, "हो, हो आई थोडा श्वास तर घे! तुम्ही काळजी नका करू. आम्ही सगळं व्यवस्थित आणलंय. थोडा वेळ द्या बॅगा तर उघडायला!
आज्जी तुमचा आशीर्वाद सोबत आहेच ना, मग आम्हाला काय होणार?"​पणजी आजीने डोळ्याला पदर लावला, "बाळा, शरीर जरी तिथे असलं तरी माझं मन त्या अद्वैतापाशीच आहे.
त्याला उठल्यावर माझा गोड गोड पापा सांग आणि रोज फोन करत जा, म्हणजे आम्हाला तरी चैन पडेल.आणि तो रोज तो भेटल्याचा आनंद मिळेल.
​दोन्हीकडचे बाबा मात्र शांतपणे मागून बघत होते, त्यांच्या डोळ्यांत मुलांच्या यशाचं कौतुक आणि त्यांना लांब पाठवल्याचं थोडं दुःख, असे संमिश्र भाव होते.
​"बरं, आता तुम्ही थोडी विश्रांती घ्या. जेवण वेळेवर करा," असं म्हणत वडिलांनी फोन ठेवला.
​फोन कट झाला पण त्या छोट्या स्क्रीनवरून मिळालेली मायेची ऊब त्या थंडगार अमेरिकन घरात कितीतरी वेळ रेंगाळत राहिली. शार्वीला जाणवलं की,जग किती जवळ आले आहे. या स्कीनवर सगळे मायेची माणसे आपल्या जवळ आली. अंतर फक्त नकाशावर असतं, काळजाच्या नात्यात नसतं.
​क्रमशः...
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all