दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर २०२५ जानेवारी २०२६
"मायेच्या नात्याची ऊब" भाग-४५
"मोकळं झालेलं घर आणि जबाबदारीची नवी जाणीव"
ब्रुकलिनच्या त्या घरात पाऊल ठेवल्यापासून शार्वीला राहून राहून सहा महिन्यांपूर्वीचे दिवस आठवत होते.
अद्वैतचा जन्म झाला तेव्हा हेच घर कसं माणसांनी गजबजलेलं होतं! एका खोलीत तिची आई अद्वैतसाठी अंगाई म्हणत असायची, तर किचनमध्ये सासूबाईंच्या हाताच्या गरम जेवणाचा सुगंध दरवळायला. तर कधी दोघी मिळून स्वयंपाकघरात काहीतरी बनवत असायच्या.दोन्हीकडचे बाबा अद्वैतला कडेवर घेण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करायचे.
पण आज..आज घर शांत होतं. फक्त हिटरचा घरघर आवाज आणि अद्वैतच्या खेळण्यांचा आवाज येत होता.
"काय झालं गं शार्वी? गप्प का झालीस?" राघवने बॅगेतून अद्वैतचे डायपर्स काढत विचारलं.
"अरे काय काय नाही, आठवतंय? सहा महिन्यांपूर्वी दोन्हीही आई-बाबा इथेच होते. अद्वैत रडला की धावून जायला चार हात असायचे. आता पुन्हा आपण दोघंच आहोत.
हे घर अचानक खूप मोठं वाटायला लागलंय," शार्वी सोफ्यावर बसत म्हणाली.राघव तिच्या जवळ आला, "हो गं, मलाही आठवतंय.
संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी आल्यावर दोन्ही बाबांसोबत अद्वैत च्या मस्ती सोबत आमची संध्याकाळ मस्त असायची.
दोन्हीही आईच्या( अरूणा आणि विजया) हातचे गरमागरम जेवण नवनवीन पदार्थांची रेलचेल असायची.
पण आता आपल्याला सवय करून घ्यावी लागेल. अद्वैत आता मोठा होतोय, आणि आपण पुण्यात जाऊन आलो यामुळे त्याचे लाडही खूप झालेत."
शार्वीने अद्वैतकडे पाहिलं. अद्वैत जमिनीवर पालथा पडून त्याच्या लाडक्या स्वाॉफ्ट टॉईज बरोबर खेळण्यात दंग होता.
त्याला कदाचित पुण्यातल्या त्या गजबजलेल्या घराची उणीव भासत नसावी, कारण त्याचे आई-बाबा त्याच्यसोबत होते.
पण शार्वीला मात्र पदोपदी दोन्हीही आईची आणि दोन्हीही बाबांची अद्वैतला खेळवताना केलेले ते आवाज आठवत होते.
शार्वी उठली आणि तिने किचनचा ताबा घेतला. पुण्यातून येताना आईने दिलेला सुका मेव्याचा डबा तिने काढला. "राघव, आईने दिलेले मेथीचे लाडू खाऊन घे. जेट लॅगमुळे थकवा जाणवेल, त्याने हुशारी येईल."
पुण्यात असताना ती 'मुलगी' आणि 'सून' म्हणून लाडात होती, पण अमेरिकेत उतरताच पुन्हा एकदा 'गृहिणी' आणि 'नोकरी करणारी स्त्री' या भूमिका तिच्यासमोर उभ्या ठाकल्या होत्या.
"उद्यापासून तुझं ऑफिस सुरू होतंय ना राघव तुला जायला लागणार ना? "शार्वीनं विचारलं.
"हो, उद्या पहिला दिवस! तुझं काय work from home मिळेल ना तुला!"
अद्वैतला 'डे-केअर'मध्ये (Day-care) सोडायची मानसिक तयारी करायला हवी.राघव म्हणाला.
पुण्यात तर त्याला खाली ठेवायचीही गरज पडायची नाही, कोणी ना कोणी कडेवर घ्यायला असायचंच. इथे आता त्याला स्वतःचं स्वतः खेळायला शिकावं लागेल," शार्वीच्या आवाजात थोडी हळहळ होती.
रात्री झोपताना शार्वीने अद्वैतला जवळ घेतलं. बाहेर बर्फ पडत होता, पण घरात पुण्याच्या आठवणींची ऊब होती. अंतर फक्त नकाशावर होतं, पण आई-बाबांचे आशीर्वाद आजही तिच्यासोबत या घरात वावरत होते.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा