दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर २०२५ जानेवारी २०२६
"मायेच्या नात्याची ऊब"-
भाग - ४६
"करीअरचा पेच आणि ओळखीचं घर"
शार्वीला देखिल ऑफिस जॉईन करायला अवघे काही दिवस उरले होते.लॅपटॉपवर 'पेंडिंग ईमेल्स' आणि 'प्रोजेक्ट डेडलाईन्स' दिसत होत्या.
पण डोळ्यांसमोर मात्र अद्वैतचा चेहरा होता. अमेरिकेत करीअर करणं सोपं नव्हतं, पण बाळ सोडून कामावर जाणं त्याहून कठीण होतं.
"शार्वी, अगं आपल्या अपार्टमेंटच्या दोन गल्ल्या सोडूनच एक चांगलं डे-केअर आहे.
ऑफिसमधल्या नेहाने तिची मुलगी तिथेच ठेवली होती. ती सांगत होती की तिथल्या 'टीचर्स' खूप प्रेमळ आहेत!" राघवने तिचा हात हातात घेत धीर दिला.
"मग बघून येऊयात का?" शार्वी म्हणाली.
मग त्या दिवशी संध्याकाळी दोघे अद्वैतला घेऊन त्या डे-केअरला भेट द्यायला गेले.
. आत पाऊल ठेवताच शार्वीच्या नाकाने पुण्याच्या घराची ती विशिष्ट माया शोधली. पण इथे पुण्याच्या घरासारखा सुका मेव्याचा किंवा साखरेच्या पाकाचा सुगंध नव्हता.
तर इथे सॅनिटायझर आणि प्लास्टिकच्या खेळण्यांचा एक वेगळाच 'प्रोफेशनल' वास होता.तिथल्या मॅडम अद्वैतशी हसून बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. अद्वैतने मात्र शार्वीचा हात घट्ट धरून ठेवला होता.
आजूबाजूला इतर लहान मुलं खेळत होती.हे मात्र अव्देतला आवडले होते. तो शार्वीच्या कडेवरून उतरून मस्त रांगत रांगत जाऊन त्यांच्यात सामील झाला.शार्वीला हायसे वाटले.
पण तरीही शार्वीला राहून राहून आठवत होते. पुण्यात अद्वैत रडला की धावत येणारे आजोबा आणि त्याला थोपटून झोपवणारी पणजी. इथे अद्वैत रडला, तर त्याला कडेवर घेऊन अंगाई म्हणणारं कोणी नसेल या ठिकाणी.
तर फक्त इथे अव्दैतला पाळण्यात घालून झुलवणारं कोणीतरी असेल.इतरांबरोबर माझं बाळ वाढणार आहे.
"शार्वी, बघ किती स्वच्छ आहे सगळं. सीसीटीव्ही ॲक्सेस पण देणार आहेत ते," राघव तिला फिचर्स समजावून सांगत होता.शार्वी मनातल्या मनात म्हणत होती, 'कॅमेरा अद्वैतला बघू शकेल, पण त्याला माझी ऊब कशी देईल?'
पण तरीही, करीअरचा हा पेच सोडवण्यासाठी तिला हे पाऊल उचलणं गरजेचं होतं. नेहाच्या ओळखीमुळे आणि घराच्या जवळ असल्यामुळे त्यांनी तिथे अद्वैतचं नाव नोंदवलं.
तो फॉर्म भरताना शार्वीचा हात थरथरत होता. उद्यापासून तिचं आणि अद्वैतचं जग थोड्या काळासाठी का होईना, पण वेगळं होणार होतं.
घरी परतताना शार्वी शांत होती. न्यूयॉर्कच्या म्हणजेच ब्रुकलिनच्या रस्त्यांवरील रोषणाई डोळ्यांना दिपत होती, पण मनात मात्र पुण्याच्या त्या जुन्या घराचा कोपरा प्रकाशत होता.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा