दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर २०२५ जानेवारी २०२६
"मायेच्या नात्याची ऊब" भाग -४७
ब्रुकलिनच्या रस्त्यांवर
आज नेहमीपेक्षा जास्त वर्दळ जाणवत होती. न्यूयॉर्कचे हे वेगवान आयुष्य आणि तिथली थंडी शार्वीसाठी आता नवीन नव्हती.
पण आज तिच्या मनाची अवस्था मात्र काहीशी वेगळी होती. सहा महिन्यांच्या प्रदीर्घ बाळंतपणाच्या सुट्टीनंतर आज शार्वीचे ऑफिस पुन्हा सुरू होणार होते.
अद्वैतला पहिल्यांदाच डे-केअरमध्ये सोडायचे असल्याने तिने काही दिवसांसाठी 'वर्क फ्रॉम होम' मागून घेतले होते, ज्यामुळे तिला थोडा दिलासा मिळाला होता.
"राघव, आपण कार डे-केअरच्या पार्किंगमध्येच लावूया का? तू पण तिथूनच लॉग-इन कर. अद्वैत जवळ आहे असं वाटलं तरच मला कामावर लक्ष देता येईल," शार्वीने सुचवले. राघवलाही तिची ही कसरत जाणवत होती, त्यानेही लागलीच ऑफिसला कळवून 'वर्क फ्रॉम कार'चे नियोजन केले.
सकाळी अद्वैतची बॅग भरताना शार्वीने त्यात त्याची दुधाची बाटली, त्याचे आवडते खेळणे आणि आईने पुण्याहून मुद्दाम पाठवलेला तो लहानसा लोकरीचा स्वेटर आठवणीने ठेवला. तो स्वेटर म्हणजे केवळ कपडा नव्हता, तर सातासमुद्रापार असलेल्या आजीची मायेची पाखरण होती.
डे-केअरच्या गेटवर अद्वैतला शिक्षिकेच्या स्वाधीन करताना तो रडला नाही; उलट, तिथल्या रंगीबेरंगी भिंती आणि नवीन खेळणी पाहून तो कुतूहलाने पाहत राहिला.
पण शार्वीला मात्र राहून राहून वाटत होतं, 'बाळा, एकदा तरी मागे वळून बघ... माझ्याकडे बघ.' तिने जड अंतःकरणाने निरोप घेतला, "बाय बाबू, मी येईल हं लवकर."
दोघेही कारमध्ये बसले आणि लॅपटॉप उघडून कामाला लागले. शार्वीला वाटलं होतं की तिला कामात खूप उत्साह वाटेल, कारण गेली सहा महिने ती याच दिवसाची वाट पाहत होती. तिच्या मॅनेजरने तिचे स्वागत केले— "Welcome back, Sharvi! We missed your efficiency." कौतुकाचे शब्द स्क्रीनवर चमकले.
पण शार्वीचे लक्ष कामापेक्षा फोनवरच्या 'डे-केअर ॲप'मध्ये जास्त होते.
सकाळी ११ वाजता तिने कॅमेरा फीड उघडले. अद्वैत एका कोपऱ्यात बसून दुसऱ्या मुलाला खेळताना पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर पुण्यात असताना असायचा तसा 'निर्भेळ आनंद' नव्हता, तर एक प्रकारचे 'गंभीरपण' होते. जणू तो लहान जीवही त्या नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याची धडपड करत होता.
दुपारी २ वाजता जेव्हा तिने पुन्हा कॅमेरा पाहिला, तेव्हा तिचे हृदय धपाधपू लागले. अद्वैत रडत होता. शिक्षिका त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या.पण तो कुणाकडेच जात नव्हता.
नेमकी त्याच वेळी शार्वीची एक महत्त्वाची मीटिंग सुरू होणार होती, जिथे तिला नवीन प्रोजेक्टचे 'प्रेझेंटेशन' द्यायचे होते.
तिच्या मनात विचारांचे द्वंद्व सुरू झाले. 'हे सगळं मी कोणासाठी करतेय? करिअरसाठी की स्वतःच्या अस्तित्वासाठी? माझ्या बाळाला तिथे रडत ठेवून मी प्रगतीच्या गप्पा कशा मारू शकते?'
तिने डोळे मिटले आणि दीर्घ श्वास घेतला. तिला आईचे शब्द आठवले. "शार्वी, मुलं स्वतःचं विश्व शोधायला शिकतात, तू फक्त स्वतःला खंबीर बनव. तू खंबीर झालीस तरच तो खंबीर होईल."
शार्वीने स्वतःला सावरले आणि ती मीटिंग पूर्ण आत्मविश्वासाने गाजवली.
पण मीटिंग संपताच, ऑफिस सुटायला पाच मिनिटं असतानाच तिने आवरायला सुरुवात केली.
तिला जगातल्या कोणत्याही 'प्रमोशन'पेक्षा अद्वैतची ती एक छोटी मिठी आता जास्त महत्त्वाची वाटत होती.
जेव्हा राघव आणि शार्वी डे-केअरच्या आत पोहोचले, तेव्हा अद्वैतने दोघांना पाहिले. आपल्या आई-बाबांना समोर पाहताच अद्वैतच्या रडण्याचा सूर बदलला.
त्याने शिक्षिकेच्या कुशीतून आपल्या चिमुकल्या हातांनी आई-बाबांच्या दिशेने एक मोठी झेप घेतली.
शार्वीने त्याला घट्ट काळजाशी धरले आणि राघवने त्या दोघांनाही आपल्या कवेत सामावून घेतले. त्या स्पर्शात अद्वैतला कमालीची सुरक्षिततेची भावना मिळाली.
दिवसभराचा तो विरह, ती भीती आणि तो एकटेपणा एका क्षणात पुसले गेले.
ब्रुकलिनच्या त्या थंड संध्याकाळी, घरापासून दूर एका अनोळखी शहरात, माय-लेकांच्या त्या मिठीत पुण्यासारखीच ऊब होती.
बापाच्या खंबीर हातांच्या वेढ्यात आणि आईच्या कुशीत अद्वैत आता सुरक्षित होता. जगाच्या पाठीवर कुठेही गेलं, तरी ही 'मायेच्या नात्याची ऊब' कोणत्याही संकटाशी लढण्यासाठी पुरेशी होती.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा