Login

"मायेच्या नात्याची ऊब" भाग - ४८

Jithe Mayechi Oob Thithe Fakt Jivala Japala Jato
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर २०२५ जानेवारी २०२६
मायेच्या नात्याची ऊब भाग - ४८
"​सातासमुद्रापारचा 'लाईव्ह' गोंधळ"
वेळ कोणासाठी थांबत नाही, ती फक्त बदलत राहते. ब्रुकलिनच्या त्या थंड हवेत आता शार्वी, राघव आणि अद्वैतच्या आयुष्याला एक नवी आणि आश्वासक लय प्राप्त झाली होती.
सुरुवातीचे ते आव्हानात्मक दिवस, अद्वैतचं रडणं आणि शार्वीची होणारी ओढाताण आता मागे पडली होती.
​अद्वैत आता डे-केअरमध्ये पूर्णपणे रुळला होता. शार्वीला आता 'वर्क फ्रॉम होम'ची गरज उरली नव्हती.
ती नीट आवरून,आपला लॅपटॉप बॅग खांद्यावर लटकवून आत्मविश्वासाने ऑफिसला जायला लागली होती.न्यूयॉर्कच्या सबवेमध्ये (Subway) प्रवास करताना तिला आता एक वेगळं स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास जाणवू लागला होता.
राघवचं ऑफिस आणि त्याचं रुटीनही आता व्यवस्थित बसलं होतं.​दिवसभराचा सर्वात आनंददायी आणि हसवणारा क्षण असायचा.
​रात्रीचे आठ-साडेआठ वाजले की तिकडे पुण्यात सकाळ झालेली असायची. लॅपटॉपच्या स्क्रीनवर एका बाजूला शार्वीचे आई, बाबा आणि दुसऱ्या विंडोमध्ये राघवचे आई,बाबा असा 'ग्रुप कॉल' रंगायचा. मधून मधून पंजी आज्जी पण असायची. या कॉलचा खरा 'हिरो' अद्वैत असायचा.
कॉल सुरू झाला की दोन्हीकडच्या आजी, आजोबांमध्ये एकच स्पर्धा लागायची. अद्वैतने कोणाकडे बघून आधी 'हॅलो' करायचं!
​शार्वीचे बाबा ओरडायचे, "अद्वैत,इकडे बघ,आजोबांनी काय आणलंय बघ!"
"तर राघवचे बाबा दुसऱ्या खिडकीतून टॅबवर टकटक करायचे, "अरे तो तिकडे नाही, इकडे बघतोय. अद्वैत, बघ बाळा!"
अद्वैत मात्र आता कमालीचा 'स्मार्ट' झाला होता. त्याला समजलं होतं की स्क्रीनवरचे हे लोक फक्त दिसतात, स्पर्श करता येत नाहीत.
एकदा असाच कॉल सुरू असताना अद्वैतने हातातला बिस्किटाचा तुकडा थेट लॅपटॉपच्या कॅमेऱ्याला लावला.​अरुणा हसत ओरडली,"अगं शार्वी, बघा हा आम्हाला बिस्किट भरवतोय!"
​ शार्वीचे बाबा मिश्किलपणे म्हणाले, "अगं बिस्किट नाही, तो चेक करतोय की हे लोक खरंच जेवतात का फक्त कॅमेऱ्यात बसून बोलतात!"
​गप्पा रंगात आल्या की अद्वैतची खोडकर बाजू वर यायची.त्याला आता कळलं होतं की लॅपटॉपचं बटण दाबलं की हे सगळे 'गायब' होतात.
जेव्हा एखादी आजी किंवा पंजी आज्जी त्याला म्हणाली, "बाळा, दूध पी बरं" किंवा "मम् कर,काय हवं बाळाला बाळाची आई करून देणार बाळाला!" असं सांगायला लागली, की अद्वैत हळूच टेबल किंवा टिपॉयचा अधारित घेत लॅपटॉपजवळ जायचा.
राघव ओरडायचा,"अद्वैत, नको,हात नको लावू!"
​पण राघवचा शब्द पूर्ण व्हायच्या आत अद्वैतनं लॅपटॉपची स्क्रीन खाली ओढलेली असायची किंवा 'म्युट'चं बटण दाबलं असायचं.
पुण्यातून फक्त लोकांचे ओठ हलताना दिसायचे पण आवाज यायचा नाही. हे बघून अद्वैत टाळ्या वाजवून हसायचा.
​ शार्वी हसून म्हणायची,"बघा आई, याला तुमचं प्रवचन ऐकायचं नसलं की हा बरोबर तुम्हाला 'म्युट' करतो. तंत्रज्ञान याला आपल्यापेक्षा जास्त कळायला लागलंय!"
​राघवचे बाबा हसून म्हणायचे, "अरे, हा तर अस्सल पुणेकर निघाला! समोरच्याला कसं गप्प करायचं हे याला उपजतच कळतंय."
​ ब्रुकलिनच्या त्या अपार्टमेंटमध्ये आता मराठी गाणी, अद्वैतचा किलबिलाट आणि घरगुती जेवणाचा सुवास दरवळायचा.
शार्वीने खिडकीत लावलेल्या छोट्याशा तुळशीला आता नवी पालवी फुटली होती.
परदेशात असूनही त्यांचं घर पूर्णपणे 'भारतीय' आणि 'पुणेरी' झालं होतं, कारण तिथे जुन्या पिढीच्या आठवणींची शिदोरी आणि 'मायेच्या नात्याची ऊब' अजूनही तितकीच ताजी होती.
​क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all