दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर २०२५ जानेवारी २०२६
"मायेच्या नात्याची ऊब"- भाग ४९
शार्वी आणि राघवला दिवस कसा उगवत होता आणि कसा मावळत होता, याचा पत्ताही लागत नव्हता.
ब्रुकलिनच्या या नांदत्या घरात आता आंबट-गोड भांडणे मिटून मुरलेल्या लोणच्याची गोड मिठास आली होती. तिथे अद्वैतच्या रूपात केवळ 'आनंद' नांदत होता!
तशातच एक दुग्धशर्करा योग जुळून आला; शार्वीला ऑफिसमध्ये 'प्रोजेक्ट मॅनेजर' म्हणून पदोन्नती मिळाली होती. पण तिच्यासाठी त्याहीपेक्षा मोठी पदोन्नती होती ती म्हणजे अद्वैतचा पहिला वाढदिवस!
पुण्यात आणि ब्रुकलिनमध्ये या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती. आपल्या लाडक्या नातवासाठी दोन्हीकडचे आजी-आजोबा आधीच ठरवल्याप्रमाणे 'सरप्राईज' देण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले होते.
पण या संपूर्ण आनंदाच्या केंद्रस्थानी होती ती म्हणजे 'पंजी आज्जी'. वयोमान आणि प्रकृतीमुळे तिला इतका लांबचा प्रवास करणे शक्य नव्हते.
मात्र शार्वी आणि राघवने आज्जीची इच्छा पूर्ण करण्यासाठी एक खास नियोजन केले होते. अद्वैतचा वाढदिवस ब्रुकलिनमध्ये साजरा होत असतानाच, पुण्यातही एका हॉलमध्ये छोटेखानी पण देखणा समारंभ आयोजित केला होता.
राघव आणि शार्वीने तिथल्या सर्व पाहुण्यांसाठी आणि नातेवाईकांसाठी केक आणि खास भोजनाची (Lunch) व्यवस्था स्वतः केली होती.
पंजी आज्जीला मधोमध बसवून पुण्यात सोहळा रंगात आला होता.
जणू सातासमुद्रापारचे नाते एका धाग्यात गुंफले गेले होते. ब्रुकलिनमध्ये अद्वैत आजोबांच्या (राघवचे बाबा) कडेवर होता आणि समोर मोठ्या स्क्रीनवर पुण्याचा सोहळा 'लाईव्ह' दिसत होता.
व्हिडिओ कॉल सुरू झाला आणि पंजी आज्जीचा चेहरा दिसताच अद्वैत आनंदाने उड्या मारू लागला.
पुण्यातून अद्वैतला डिजिटल पद्धतीने ओवाळण्यात आले, तर इकडे दोन्ही आजींनी आणि शार्वीने त्याचे प्रत्यक्ष औक्षण केले.
नेमक्या याच वेळी तो हृदयस्पर्शी प्रसंग घडला. गप्पांच्या ओघात जेव्हा पंजी आज्जी म्हणाली, "बरं बाळांनो, आता ठेवू का फोन?" तसा अद्वैतने हात मारून लॅपटॉपची स्क्रीन आपल्या इवल्याशा हातांनी गच्च धरली. तो ती स्क्रीन बंद न करण्याचा प्रयत्न करू लागला, जणू त्याला आज्जीला जाऊच द्यायचे नव्हते!
हे पाहून पुण्यातल्या हॉलमध्ये एकच हशा पिकला. पण इकडे शार्वीच्या आईचे—अरुणाचे डोळे भरून आले.
ती भावूक होऊन सर्वांसमोर म्हणाली, "हे बघा! हे केवळ संस्कार नाहीत, तर रक्ताची ओढ आहे. शार्वीचे आजोबा (माझे बाबा) अगदी असेच होते! घरी कोणी पाहुणे आले की त्यांना ते जाऊच द्यायचे नाहीत.अगदी लहान मुलासारखी त्यांची बॅग लपवून ठेवायचे.
आज अद्वैतच्या रूपात माझे बाबाच पुन्हा अवतरले आहेत. आजोबांची तीच माया, तीच ओढ आज या चिमुकल्यात दिसतेय!"पणजोबांचे सर्व स्वप्न पुर्ण कर रे पठ्ठ्या म्हणत अरूणा आज्जीनं त्याचा गोड पापा घेतला.
तिकडे सगळे नातेवाईक पंजी आज्जीला चिडवू लागले, "बघा आज्जी, तुमचे यजमान परत आले! आता ते तुम्हाला फोन सुद्धा ठेवू देणार नाहीत!" पंजी आज्जीने आनंदाश्रू पुसत हसून म्हटले, "हो गं, माझा रक्षणकर्ता पुन्हा आलाय. तो आता अर्थवट राहिलेले त्यांची सुध्दा स्वप्न पुर्ण करणार. आता मला कसलीच काळजी नाही!"
दोन्ही ठिकाणी एकाच वेळी केक कापला गेला. ब्रुकलिनमध्ये अद्वैतने केक कापला, तर पुण्यात पंजी आज्जीने अद्वैतच्या नावाने केक कापून सर्वांचे तोंड गोड केले.
सातासमुद्रांचे अंतर एका क्षणात पुसले गेले होते. विजयाने रात्री तिघांचीही दृष्ट काढली. यावेळी हे चौघे (आजी-आजोबा) फक्त तीन आठवड्यांसाठी आले होते, कारण पुढे त्यांनी युरोपची सहल (Trip) नियोजित केली होती.त्याच रात्री ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले.
रात्री जेव्हा ब्रुकलिनमध्ये शांतता पसरली, तेव्हा शार्वी खिडकीपाशी उभी राहून उजळलेल्या शहराकडे पाहत होती. राघव जवळ येताच ती म्हणाली, "राघव, आज मला खऱ्या अर्थाने जाणवलं की घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात. जिथे आपली माणसं असतात, तिथेच घर असतं. आपण पुण्यात असू किंवा ब्रुकलिनमध्ये, जोपर्यंत आपल्याकडे 'मायेच्या नात्याची ऊब' आहे, तोपर्यंत कोणतंही शहर परकं वाटत नाही."
राघवने तिच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवला. न्यूयॉर्कच्या त्या थंड रात्रीत, आजी-आजोबांच्या सहवासाची आणि पूर्वजांच्या आशीर्वादाची ऊब त्यांच्या संसारात कायमची विसावली होती.
शार्वी, राघव आणि अद्वैत... एका नव्या देशात, आपल्या संस्कृतीच्या जोरावर, एका सुखद भविष्याकडे वाटचाल करत होते.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन fevorite आॉप्शन निवडून घ्या जेणेकरुन एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा