दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर २०२५ जानेवारी २०२६
"मायेच्या नात्याची ऊब" - भाग ५० (अंतिम भाग)
ब्रुकलिनच्या त्या उबदार घरात आज आनंदाचे वातावरण होते, पण शार्वीच्या मनात पंजी आज्जीशी झालेल्या मघाच्या संवादाचे काहूर माजले होते.
व्हिडिओ कॉलवर गप्पा मारताना पंजी आज्जीचा आवाज अचानक गहिवरला होता.
अद्वैतला खेळताना बघून तिने शार्वीला कुटुंबाचा एक असा इतिहास सांगितला, जो आजवर आज्जीनं आठवणीच्या कप्प्यात जपून ठेवला होता.
पंजी आज्जी म्हणाली, "शार्वी, आज तुला मिळालेली ही पदोन्नती आणि तुझा हा थाट बघायला तुझे आजोबा हवे होते ग! तुला माहीत नाही, पण तुझ्या आजोबांना सुद्धा त्यांच्या तारुण्यात अशीच परदेशी जायची मोठी 'ऑफर' मिळाली होती.
खूप पैसा आणि मानसन्मान त्यांच्यासमोर उभा होता.पण त्या काळी घराच्या जबाबदाऱ्या डोंगराएवढ्या होत्या."
आज्जीने क्षणभर थांबून डोळ्याला पदर लावला आणि पुढचा प्रसंग सांगू लागली, "जेव्हा तुझ्या आजोबांनी त्यांच्या वडिलांना म्हणजेच माझ्या सासऱ्यांना ही गोष्ट सांगितली, तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दांत ठाम नकार दिला.
ते बाणेदारपणे म्हणाले होते, 'बाळा, पैसा मिळेल पण कर्तव्य विसरता येणार नाही. जे काही कर्तृत्व गाजवायचे ते याच मातीत राहून करा.
परक्यांच्या देशात जाऊन आपली बुद्धी विकू नका!' पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून तुझ्या आजोबांनी त्यांच्या डोळ्यांतील ती स्वप्नांना तिलांजली दिली.
आज तुझ्या रूपाने त्यांची तीच स्वप्ने सातासमुद्रापार पूर्ण होताना मी उघड्या डोळ्यांनी बघतेय!"
आज्जीचे हे शब्द शार्वीच्या काळजाला भिडले. तिने राघवकडे पाहिले, दोघांच्याही नजरा एकमेकांत मिसळल्या आणि एका क्षणात दोघांनी एक मोठा निर्णय घेतला.
शार्वी म्हणाली, "राघव, आजोबांनी आपल्या मायभूमीसाठी आणि कर्तव्यासाठी त्याकाळी स्वार्थाचा त्याग केला. आज आपण इथे खूप काही मिळवलंय, पण आपल्या मातीचं देणं आपण कसं विसरू शकतो? आपण आपल्या प्रगतीचा उपयोग आपल्या माणसांसाठी करायला हवा."
राघवने लगेच दुजोरा दिला.
त्या दोघांनी मिळून आजोबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'पणजोबा - पंजी स्कॉलरशिप' (शिष्यवृत्ती) सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पुण्यातल्या अशा गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी, ज्यांची स्वप्ने पैशाअभावी अपुरी राहतात, ही शिष्यवृत्ती आता एक मोठा आधार ठरणार होती.
जेव्हा हा निर्णय त्यांनी व्हिडिओ कॉलवर सर्वांना सांगितला, तेव्हा स्क्रीनच्या पलीकडे असलेल्या दोन्ही आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर सात्विक समाधान पसरले.
शार्वीची आई (अरुणा) आणि राघवची आई दोघींचेही डोळे भरून आले. अरुणा भावूक होऊन म्हणाली, "शार्वी, राघव आज खऱ्या अर्थाने वाटतंय की आमचे संस्कार सार्थकी लागले.
अंगाखांद्यावर खेळलेली आमची ही मुलं कर्तृत्वाने सातासमुद्रापार मोठी झाली. पण त्यांचे पाय अजूनही मातृभूमीच्या जमिनीवरच घट्ट रोवलेले आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय!"
दोन्ही बाबांनीही या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्या. राघवचे बाबा म्हणाले, "राघव, हा केवळ एक उपक्रम नाही, तर तो संस्कारांचा पूल आहे.
जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुळांशी जोडलेले आहात, तोपर्यंत तुमच्या यशाला कधीही उतरती कळा लागणार नाही."
पंजी आज्जी मात्र शांतपणे हे सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावरचे समाधान सांगत होते की, आज तिच्या मते आजोबांना खऱ्या अर्थाने ते आदरांजली लाभली होती.
ती उठली आजोबाच्या फोटोपुढे नतमस्तक होत म्हणाली,"अहो ऐकलत का आज तुमच्या नातवंडांची बुद्धी परक्यांच्या कामी लागत असली, तरी तिची फळे मायभूमीतील लेकरांना मिळणार आहेत बरका!"
रात्री खिडकीतून न्यूयॉर्कच्या उजळलेल्या शहराकडे पाहताना शार्वीला जाणवले की, बाहेर कितीही थंडी असली, तरी तिच्या मनात कर्तव्याची आणि 'मायेच्या नात्याची ऊब' कायम होती.
न्यूयॉर्कच्या थंड रात्रीत, पुण्याच्या आठवणींची आणि पूर्वजांच्या आशीर्वादाची ऊब त्यांच्या संसारात कायमची विसावली होती.
शार्वी, राघव आणि अद्वैत एका नव्या देशात, आपल्या संस्कृतीच्या जोरावर, एका सुखद भविष्याकडे आणि सामाजिक बांधिलकीकडे वाटचाल करत होते.
समाप्त:
या दीर्घकथेचा प्रवास आज ५०व्या भागावर येऊन थांबला आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही या कथेला आणि त्यातील पात्रांना जे प्रेम दिले, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसादामुळे हा प्रवास इथवर पोहोचू शकला ही कथा संपली असली तरीही अशाच नवनवीन कथा घेऊन मी पुन्हा भेटीला येईन. तोपर्यंत पेजला फॉलो करा कनेक्टेड रहा, आणि मुख्य म्हणजे "fevorite" सेटिंग्स आॉन ठेवा. जेणे करून कथेचा कोणताही भाग तुमच्याकडून मिस होणार नाही.
कथा कशी वाटली? आवडली नाही आवडली प्रांजळपणे सांगायला विसरू नका.धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा