माझं कुठे चुकलं? भाग अंतिम
पुर्वाध:- आपण मागील भागात पाहिलं की, सीमाने तिच्या भावाचं लग्न झाल्यानंतर सुमेधला आपल्यासोबत ठेवण्याचा निर्णय घेतला. नोकरी आणि मुलगा अशी तिची तारेवरची कसरत सुरू झाली. सुमेध बारावीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. पुढे त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला आता पुढे...
माझं कुठे चुकलं? भाग - अंतिम
सीमाचा खडतर जीवनप्रवास पुढेही असाच सुरू होता. तिच्या संघर्षाला आता गोड फळ लागणार होती. आज सुमेधच्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षांचा निकाल होता. एक अनामिक भीती दाटून आली होती. सुमेधही थोडा चिंताग्रस्त दिसत होता. एका विषयाची त्याला भीती वाटत होती कारण एका विषयाचा पेपर त्याला थोडा कठिण गेला होता. आणि अखेरीस निकाल हाती आला.
सुमेध उत्तीर्ण झाला होता. इंजिनिअर झाला होता. मोठ्या आनंदाने त्याने आईला ही बातमी दिली. सीमाच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. उमेशच्या प्रतिमेकडे पाहून ती म्हणाली,
“आज तुमचं स्वप्न पूर्ण झालं. पहा आपला सुमेध इंजिनिअर झाला. तुम्ही असायला हवे होतात. मुलाचं हे यश पाहून तुम्ही आनंदाने नाचले असता”
सीमा रडत होती तिची तपश्चर्या फळास आली होती. सीमाने मनापासून सुमेधचं अभिनंदन केलं. शुभ आशिर्वाद दिला. आणि ईश्वराने दिलेल्या या सुखाबद्दल त्याचे मनःपूर्वक आभार मानले. देवापुढे दिवा लावला अगदी मनापासून. आज सीमाने रात्रीच्या जेवणात आवर्जून सुमेधच्या आवडत्या पदार्थांचा बेत केला होता. त्याच्या आवडीचे गोड गुलाबजाम बनवले होते. दोघेही खूप खुश होते.
कॉलेजच्या कॅम्पसमधून त्याला आधीच आय टी कंपनीतून नोकरीची ऑफर आली होती. मल्टिनॅशनल कंपनी, महिन्याला सहा अंकी पगार. सोन्याचे दिवस आले होते. सुमेधला अजून पुढे शिकायचं होतं. त्याला एम.बी.ए. करायचं होतं. सीमाने फी च्या रकमेची जमवाजमव करायला सुरवात केली. आणि त्याचं ऍडमिशन केलं. सुमेध पुढचं शिक्षण घेऊ लागला. सीमा आता थोडी निवांत झाली होती. सगळी कर्जे संपत आली होती. केसांत रुपेरी कडा डोकावू लागली होती. आत्ता तिच्या मागची दगदग संपली होती. आता फक्त नोकरी होती. घरी घरकामाला बाई होती. सुमेध त्याची नोकरी, त्याच्या मित्र परिवारात गर्क असायचा. त्याचं त्याला एक वेगळं विश्व होतं. आता सीमाकडे मोकळा वेळ होता पण सुमेध व्यस्त होता. आईसाठी आता त्याच्याकडे वेळ नव्हता. चित्र पालटलं होतं.
सीमाला कॉलेजमध्ये असल्यापासूनच साहित्याची, वाचनाची आवड होती. आता तिने आपले जुने छंद जोपासायचं ठरवलं. सीमा ऑफिसमधल्या मैत्रिणींसोबत मराठी नाटकं, साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला आवर्जून जाऊ लागली. साने गुरुजी वाचनालयाची सीमा सभासद झाली. घरी पुस्तकं आणून वाचू लागली. तिच्या ऑफिस मधल्या मैत्रिणीने “आपण ईबुक सुद्धा वाचू शकतो” ही नवी कल्पना तिला सांगितली. तिला फेसबुकची ओळख करून दिली. तिनेच सीमाचं फेसबुक खातं उघडुन दिलं. सीमाला आता वाचनासाठी भरपूर माध्यम उपलब्ध झाली होती. तिची आवड ती जोपासत होती. फेसबुकवर अनेक मित्रमैत्रिणी भेटल्या. वेगवेगळ्या फेसबुक ग्रुपशी जोडली गेली. नवीन लोकांत मिसळत होती. आभासी जग तीला आवडू लागलं. आता सीमा तिच्या छंदासाठी व्यस्त राहू लागली.
एक दिवस सीमाला एक फ्रेन्ड रिक्वेस्ट आली. नाव पाहताच तिला खूप आश्चर्य वाटलं. ती रिक्वेस्ट होती परागची. तिने त्याचं प्रोफाइल चेक केलं. हो.. तो तिचा परागच होता. तिचा मित्र.. प्रियकर.. तिचे डोळे भरून आले.
“आज त्याला कशी आठवण झाली?” तिच्या मनाला प्रश्न पडला.
रिक्वेस्ट स्वीकारावी की नाही अश्या संभ्रमात असताना तिने ती रिक्वेस्ट स्वीकारली. मग त्यांच मेसेंजरवर बोलणं होऊ लागलं. तीचं फेसबुक अकाउंट डिटेल्स त्याला तिच्या भावाच्या मित्र यादीतून मिळालं होतं. बऱ्याच दिवसापासून तो तिला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. पण धीर होत नव्हता. सीमा त्याच्यावर रागवेल असं त्याला वाटलं होतं. पण सीमा अजिबात रागावली नाही. झालं गेलं गंगेला मिळालं..!! त्यावेळची परिस्थिती तशी होती. ती त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली. एकमेकांचे नंबर देण्यात आले. संवाद होऊ लागला. कोणीतरी ऐकून घेणारं असलं की समोरचाही आपलं मन मोकळं करतो. तसाच काहीसा अनुभव सीमाला येत होता.
परागही आता वृद्धत्वाकडे झुकू लागला होता.. केस पांढरे झाले होते..थोडा स्थूल झाला होता. त्याच्या बोलण्यातून सीमाला समजले दोन वर्षा पुर्वीच त्याची पत्नी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने देवाघरी गेली होती. परागला दोन मुलं होती मुलीचं लग्न होऊन ती सासरी सुखात नांदत होती. मुलगा परदेशी गेला तिथेच नोकरी आणि लग्न करून स्थायिक झाला. त्याने परागला परदेशी येण्यास विनवले होते पण परागला आपला देश सोडून जायचं नव्हतं. त्यामुळे पराग एकटाच त्याच्या बंगल्यात राहत होता. सीमानेही तिची कर्मकहाणी परागला सांगून टाकली होती. ते ऐकून परागला खूप वाईट वाटलं होतं.. काय सीमाचं नशीब..!! अगदी जन्मापासून फक्त आणि फक्त दुःखच..!! पण सीमाची कसलीच तक्रार नव्हती. ते तीच नशीब होतं असं समजून तिने ते सगळं सोसलं होतं.
सीमा परागच्या येण्याने आनंदी झाली होती. या फेसबूक सारख्या आभासी जगातच तिला तिचा हरवलेला मित्र परत मिळाला होता. आजवर सोसलेल्या वेदनेवर जणू मलम लावण्यासाठीच ईश्वराने त्याला पुन्हा तिच्या आयुष्यात पाठवलं होतं. रोज बोलणं व्हायचं कधी मेसेंजरवर, कधी व्हाट्सअप्प तर कधी फोनवर. सीमा फक्त एक निखळ मैत्री म्हणून त्याच्याशी बोलत होती. तिने सुमेधलाही पराग विषयी सांगितलं होतं. परागने गणित शिकवल्यामुळेच ती ऊत्तीर्ण होऊ शकली असही ती हसत म्हणाली होती.
सीमा आता पूर्वी पेक्षा छान दिसू लागली होती. नवीन खरेदी होऊ लागली. नेहमी साधारण दिसणारी सीमा वेगळी भासू लागली. तिची वेशभूषा आता फॅशनेबल झाली. साडी नेसण्यासोबत ती जीन्स टॉप, सलवार कुर्ताही वापरू लागली. ती नियमित पार्लरला जाऊ लागली. केस कापून केशभूषा बदलून टाकली. आणि स्वतःचा वेगळा सुंदर चेहरा समोर घेऊन आली. ऑफिसला जाताना चेहऱ्यावर हलकासा मेकअप चढू लागला. वागण्या-बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास जाणवू लागला. तिच्यातला हा बद्दल सगळ्यांच्याच लक्षात येत होता. जास्त वेळ ती मोबाईल वापरू लागली. सोशल मीडियावर जास्त वावर दिसू लागला. त्या जगात ती रमू लागली. मित्र मैत्रिणींचे ग्रुप्स बनू लागले. प्रत्येकाशी संवाद वाढला. परागशी मैत्री वाढू लागली. त्याचे वारंवार फोन कॉल्स येऊ लागले. एकदा दोनदा पराग तिच्या घरी येऊन भेटून गेला होता. सीमाही त्याला भेटू लागली. भेटी वाढल्या आणि एक नवीन वादळ जे दबा धरून बसलं होतं ते तीव्र गतीने सीमाच्या दत्त म्हणून समोर उभं राहिलं. ज्याची सीमाला पुसटशी कल्पनाही नव्हती.
सुमेधला मात्र आईमध्ये अचानक झालेला बद्दल आवडला नव्हता.
इतकी वर्षे साधी दिसणारी आई एकदम इतकी कशी बदलली? या वयात तिला हे शोभतं का? हा मेकअप, हे सोशल मीडियावर जास्त बोलणं, असणं, इतकं व्यस्त राहणं शोभतं का? या वयात देव देव करायचं सोडून कसली ही नवीन थेरं सुचताहेत आईला?
त्याचेच त्याला प्रश्न पडायचे. परागशी वाढत चाललेला आईचा स्नेह त्याला खटकत होता. परागचं घरी येणं त्याला आवडलं नव्हतं..त्याला सीमाने "पराग फक्त एक चांगला मित्र आहे त्याची कंपनी आवडते मला. मी आनंदी असते तो सोबत असला की यापलीकडे काहीही नाही. " इतकं स्पष्ट सांगूनही त्याला समजत नव्हतं की समजून घ्यायचं नव्हतं. काहीच समजायला मार्ग नव्हता. तो ऐकत नव्हता. त्याला पराग आणि सीमा यांच्या नात्याबद्दल संशय येऊ लागला होता. तो सीमाचा राग राग करू लागला. त्याला आपली आई चुकीचं वागतेय असं वाटू लागलं होतं.
सीमा आणि सुमेध मध्ये शाब्दिक चकमक वाढू लागल्या.. आणि आज तर कहरच झाला. सुमेध कडाडून भांडत होता. रागात त्याच्या तोंडून निघालेले शब्द अंगार बरसवत होते.,
"तु माझ्यासाठी काय केलस.? तु नेहमीच नोकरीला प्राधान्य दिल. मला नाही. माझ्यासाठी तुझ्याकडे कधीच वेळ नव्हता.माझ लहानपण दुसऱ्याच्या दारात गेलं. तु आई म्हणून काय कर्तव्य केलस? मुलाचं लग्न करून द्यायच्या या वयात तुला तुझी लफडी सुचताहेत.. मला तुला आई म्हणायला लाज वाटते."
त्याला लाज वाटत होती. सीमाला आई म्हणण्याची का? इतकी वाईट आई होती का ती? तिलाच समजत नव्हतं. सीमाला कळत नव्हत तीच नेमकं काय चुकल? मुलासाठी सगळ तारुण्य वाहून दिलं. कायम त्याच्या सुखासाठी धडपडत राहिली. मुलासाठी तिने सगळयां सुखाचा त्याग केला. अश्या आईची त्याला लाज वाटत होती.
तिला अजूनही समजत नव्हतं तीच नेमकं काय चुकलं?
पुर्णविराम..
© निशा थोरे
मैत्रिणींनो, ही एक सत्यकथा.. आपल्या समाजातल्या एका पिडीत सीमाची. मुलगा मुलगी या असमानतेला बळी पडलेल्या मुलीची. स्वतःच्या रंगरूपाचा न्यूनगंड बाळगणाऱ्या एका तरुण मुलीची. काळ्या वर्णामूळे तिला नाकारणाऱ्या समाजाची. एक विधवा म्हणून तिच्याकडे फक्त एक भोगवस्तू म्हणून पाहणाऱ्या पुरुषी वृत्तीची. एक स्त्री म्हणून एका विधवा स्त्रीला सन्मान न देऊ शकणाऱ्या अन स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या स्त्री वृत्तीची..
मैत्रिणींनो, या कथेद्वारे मी वर्णभेद, लिंगभेद, या विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. खरंतर ही कथा नाहीच मुळी ही एक व्यथा. २१व्या शतकातही स्त्री म्हणून होणाऱ्या अवहेलनेची. खरंच काय चूक होती सीमाची? तिच्या लहानपणापासून असमानतेला का होतं खतपाणी? काळा रंग म्हणून का नाकारलं परागच्या घरच्यांनी? एक विधवा म्हणून तिला आधार देण्याऐवजी का तिचा उपहास?
खरंच इतकं कठीण का होतं? का एकटी स्त्री राहू शकत नाही? एक पुरुष राहू शकतो मग एक स्त्री का नाही? एका घराला नराचं संरक्षण इतकं गरजेचं का?
ज्या मुलासाठी तिने तीच संपूर्ण तारुण्य जाळून टाकलं. तरुणपणात लग्न करून सुखी होऊ शकली असती पण मुलाला सावत्रपणाचा जाच नको म्हणून ते सुखही तिने नाकारलं. तिला तर तिचं मातृत्वही छान जगता आलं नव्हतं. आईपणही नीट जगली नव्हती. तिला नसेल का वाटलं मुलाचं बोट पकडून त्याला शाळेत घेऊन जावं, मुलाचा अभ्यास घ्यावा, पालक सभेला हजर राहावं, मुलासाठी चांगले पदार्थ करून घालावेत. नाही जमलं तिला. रोज तिचं मन रुदन करत होतं. आई आणि बाबा या दोन्ही जबाबदाऱ्या पेलायच्या होत्या. मुलाला सगळी सुखं मिळावीत म्हणून झटणाऱ्या त्या माऊलीची काय चूक होती?
का जाणीव नसावी त्या मुलाला आपल्या आईच्या त्यागाची?
आयुष्याच्या उत्तरार्धात थोडा आनंद मिळवण्याचा तिने प्रयत्न केला. स्वतःच्या आवडीनिवडी जोपासल्या. ही तिची चूक होती का? एक स्त्री खूप उशीरापर्यंत ऑनलाईन दिसली म्हणजे ती वाईटच असते का? इतक्या वर्षांनी भेटलेल्या मित्रामूळे का आलं वादळ? का पुरुषाने तिच्या चारित्र्याची लखतरं वेशीवर टांगवी? का त्याला लाज वाटावी तिची आई म्हणायला? एका पुरुषाला अनेक मैत्रिणी असू शकतात मग स्त्रीला का नाही. एकटेपणाचा त्रास जसा पुरुषांना होतो तसा स्त्रियांना होत नाही का? मानसिक, शारीरिक आधाराची गरज जर पुरुषाला असते तर मग स्त्रीला नसतात का भावना?? का दुजाभाव तिच्यासाठी?
मैत्रीणींनो, मला पडलेल्या या प्रश्नांचा ससेमिरा काही संपला नाही. त्याची उत्तर मला मिळाली नाही..बघा तुम्हाला सापडतात का? बघा तुम्हाला तरी सांगता येईल का तिचं नेमकं काय चुकलं?
कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही.. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी..
© निशा थोरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा