Login

माझं काय चुकलं भाग १

ही कथा आहे एका आईची.. आई मुलाच्या नात्याची..

माझं काय चुकलं??..भाग - १ 

"लाज वाटते मला तुला आई म्हणायची.." पोटच्या मुलाच्या या वाक्याने सीमा पुरती कोसळली..सुमेध तावातावाने बोलत होता..,"काय केलंस तू माझ्यासाठी? तुझ्याकडे कधी वेळ होता माझ्यासाठी? तु नेहमीच इतर गोष्टींना प्राधान्य दिलंस.मला नाही.. आई म्हणून तू माझ्यसाठी काय केलंस??" मुलाच्या या प्रश्नांनी सीमा क्षणभर स्तब्ध झाली. कोणीतरी कडेलोट करावा आणि डोक्याची शंभर तुकडे व्हावे तसं वाटलं तिला. सिसे वितळवून तो गरम रस कोणीतरी कानात ओतत आहे असं वाटून गेलं..अन अश्रूंचा बांध फुटू लागला.डोळे झरू लागले.. सुमेध तिच्याशी भांडत होता..मागचा पुढचा विचार न करता तोंडाला येईल ते बडबडत होता. सीमाच्या डोळ्यात पाणी होतं. सीमाच्या डोक्यात विचारांचे वादळ उठलं होतं. आणि भूतकाळाची पानं अलगदपणे तिच्या समोर उलगडत होती..आणि ती सगळं निमुटपणे उघड्या डोळ्यांनी पाहत होती.काय चुकलं होतं तिचं तिलाच समजत नव्हतं.. संपूर्ण भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला..

एक मध्यमवर्गीय कुटुंब..डोक्यावर कायम पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा.. कायम घरातल्या स्त्रीला दुय्यम दर्जा. घरचे मोठे पुरुष जे बोलतील तसंच वागायचं.. अगदी उठण्या बसण्या पासून, खाण्या-पिण्या पासून, कपडे वापरण्यापासून सगळे पुरुषांचे नियम.. सीमाचे आजोबा घरातले जेष्ठ पुरुष त्यामुळे ते म्हणतील तो कायदा.. या कुटुंबात मुलगा झाला तर आनंदोत्सव आणि मुलगी झाली तर सुतकी वातावरण..ही परंपरा.  मुलगाच हवा म्हणून असलेला अट्टहास.. वंशाला दिवा हवा नाहीतर वंश बुडेल ही धारणा.. त्यामुळे घरात वाढणारी मुलांची संख्या.. वाढलेली खाणारी तोंडं त्यामुळं होणारी आर्थिक ओढाताण.. घरातला मोठा मुलगा म्हणजे सीमाचे बाबा एका खाजगी कंपनीत कामगार म्हणून काम करत होते..त्यांचे दोन भाऊ म्हणजे सीमाचे काका शिक्षणासाठी त्यांच्याच जवळ..चाळीतल्या एका छोट्या घरात असलेला त्यांचा संसार.. सगळी सत्ता पुरुषांच्या हाती बायकांना दोन रुपयेही दिले जायचे नाही.. त्यामुळे नेहमी पुरुषांच्या पुढे हात पसरावे लागायचे.. तेही  मिळायचे नाहीत.. पदोपदी होणारी अवहेलना, कुचंबणा.. नेहमीचंच..

अश्या कुटुंबात सीमाचा जन्म झाला...सीमा तीन बहिणीच्या पाठीवर झालेली नावडती मुलगी..तिचा जन्म झाला तेंव्हा कोणी फारसं खुष नव्हतं.. आई वडिलांना, आजी आजोबांना किंबहूना घरातल्या सर्वांनाच मुलगा हवा होता. मुलगा हवा या हव्यासापोटी तीन मुलींचा झालेल्या जन्म.. आणि आता तीन बहिणींच्या पाठीवर पुन्हा एकदा झालेलं चौथं नावडतं अपत्य.. आजी हिरमुसली होती. तिच्या जन्माच्या वेळीस मोठ्याने गळा काढला होता..घरभर सुतकी वातावरण झालं होतं. मग काही दिवसांनी देवाची मर्जी म्हणून तिच्या जन्माचा स्वीकार केला.. सीमा हळूहळू मोठी होत होती सीमा दोन वर्षांची असताना तिच्या आईला पुन्हा दिवस गेले.. आणि तिच्या पाठीवर एका मुलाने जन्म घेतला.. मुलाच्या जन्माने घरात आनंदी वातावरण आलं.चार बहिणीच्या पाठीवर झालेला एकुलता मुलगा.. जणू काही घरात सोहळाच.. मुलगा व्हावा म्हणून आणि गावच्या देवीला नवस बोलली होती.. मग आजी गावी जाऊन नवस पूर्ण करून आली..अगदी परिस्थिती नसताना गावजेवण घातलं गेलं..कर्ज काढून मोठं बारसं घातलं..'प्रसाद' नाव ठेवलं त्याचं..

प्रसाद अगदी लाडात वाढत होता.. तो जरा रडला तर लगेच त्याच्यासाठी सगळे उभे असायचे.. साधी शिंक आली तरी लगेच दवाखान्यात घेऊन जायचे.. तळ हाताच्या फोडाप्रमाणे सगळेच जपत होते त्याला.. काही दिवस सीमाच्या पाठीवर झाला म्हणून तिचे पण लाड झाले पण काही दिवसच.. नंतर त्या चौघी बहिणी दुर्लक्षित झाल्या त्या कायमच्याच.. नेहमी प्रसादला जास्त जपलं जात होतं.. नवीन कपडे प्रसादसाठी..आई तिच्या जुन्या वापरलेल्या साड्यातून तिच्या बहिणींना फ्रॉक शिवायची आणि नंतर तेच वापरलेले फ्रॉक  सीमाला मिळायचे.. कायम बाकीच्या बहिणींनी वापरलेले कपडेच घालायची ती..पायातल्या चप्पला मोठ्या बहिणींच्या, बाबांनी खाऊ आणला तरी पहिला प्रसादला मिळायचा.. जेवायला बसलं की गरम गरम ताजे जेवण प्रसाद साठी.. बहिणींना शिळं रात्रीचं उरलेलं जेवण द्यायचे..दूध दही-तूप प्रसादसाठी दिलं जायचं आणि मुलींनी मागितलं तर "तुम्हाला कशाला?? मुलगा आहे तो बाहेर जातो तुम्ही घरातच असता ना!! दही तूप खाऊन जाड व्हाल मग लग्न कशी जमायची पुढे जाऊन.?" आजी,आई बोलायची.. आश्चर्य म्हणजे त्या स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला हीन वागणूक द्यायच्या. एवढ्याश्या चिमुरड्या वयात खाऊन पिऊन जाड होऊ नये म्हणून  केवढी काळजी. असमानतेचे धडे तेथेच गिरवले जायचे..

अश्या वातावरणात सीमा वाढत होती..हळूहळू लहानाची मोठी होतं होती.. 

पुढे काय होईल? सीमाच्या आयुष्यात सुख येईल का पाहूया पुढील भागात..

क्रमशः..

© ® निशा थोरे..

कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही.. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी..

0

🎭 Series Post

View all