माझं कुठे चुकलं??..भाग - १२
पुर्वाध:- आपण मागील भागात पाहिलं की, सीमा समाजातील दृष्ट प्रवृत्तीवर मात करत यशाचा मार्ग शोधत होती.. नोकरी करता करता तिने पदवीची परीक्षा देऊन उत्तीर्ण झाली.. सीमा पदवीधर झाली.. जुनं घर विकून त्यातून आलेल्या रकमेतून नवीन मोठं घर घेतलं आता पुढे...
माझं कुठे चुकलं??..भाग - १२
सीमा आता एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होती. सुमेधला तिच्या आईवडिलांकडे ठेवुन चार वर्षे झाली होती. सुमेध आत्ता दुसरीला गेला होता. सीमा वेळच्यावेळी प्रत्येक महिन्यात पैसे पाठवत होती. याच कालावधीत तिचा धाकटा भाऊ नोकरीला लागला. आणि तिथेच ऑफिस मधल्या शर्वरी नावाच्या एका मुलीवर प्रेम झालं. आणि त्याने तिच्याशी लग्न केलं. प्रेमविवाह असल्याने कोणाला काहीच बोलता येत नव्हतं.. दोघांच्या घरच्यानां हे लग्न मान्य होतं. त्यात शर्वरी एकुलती एक असल्यामुळे भरपूर हुंडा मिळाला होता. सीमाचे आईवडील खुश होते त्यामुळे तिच्या आईवडिलांनी मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं.
आता घरात नवीन सुनेचं राज्य आलं. आणि तिला सुमेधची अडचण होऊ लागली. सुमेध थोडासा अवखळ, मस्तीखोर असल्यामुळे घरात खटके उडू लागले. कधी कधी मामाच्या हातचा मार मिळू लागला. सीमाने सुमेधसाठी फोन केला की सुमेध रडत घरात घडलेल्या घटना सांगू लागला. मामी कसा त्रास देते ते सांगू लागला.. शेवटी ते आईचं मन. मुलाला झालेल्या वेदना तिच्या पर्यंत पोहचायच्या. ती एकटीच रडत बसायची. सीमाची वहिनी सीमालाच वाईट बोलू लागली.
"मुलाला आमच्याकडे ठेवून स्वतः मस्त राहत आहेत एकट्या..!!"
अस बरंच काही सासू सासऱ्यांना म्हणजेच सीमाच्या आईवडिलांना सुनावू लागली. हे सगळं सुमेध सीमाचा फोन आला की तिला सांगायचा. शेवटी सुमेधही मोठा होत होता. त्यालाही सीमाच्या कष्टाची, आईच्या मेहनतीची जाणीव व्हायला हवी असं सीमाला वाटू लागलं. आणि तिने सुमेधला आपल्या घरी परत आणण्याचा निर्णय घेतला.
सीमा सुमेधला स्वतःसोबत घेऊन आली. सुमेधच्या पालनपोषणात काहीच कमी पडू नये म्हणून तिने तो येण्याआधीच सगळ्या गृहोपयोगी वस्तू आणल्या होत्या. फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह एक एक वस्तू तिने एक एक पैसा जोडून हप्त्याने घेतल्या होत्या. सुमेध सीमा सोबत आल्यानंतर तिने चांगल्या शाळेत त्याचं नाव दाखल केलं. तरीही तो लहानच होता. एकटं ठेवायला तिला भीती वाटायची. पण हळूहळू सुमेधला याची सवय लागत होती. सीमा त्याला काहीही कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेत होती. त्याचं हरवलेलं बालपण आठवून व्यथित व्हायची. सुमेधही कमी वयात जबाबदारी पडल्याने समंजस झाला होता. सीमाची मात्र मुलगा आणि नोकरी यांची तारेवरची कसरत सुरू झाली होती. सीमाच्या नोकरीमुळे तिला सुमेधला जास्त वेळ देता येत नव्हता. तरीही जितका वेळ मिळेल ती त्याच्या सोबत घालवत होती. नोकरीची गरज होती. म्हणून तिच्यासाठी तिचं पहिलं प्राधान्य हे नोकरी होतं. स्पर्धात्मक जगात टिकून राहणं ही तिची गरज होती.
सुमेध अभ्यासात प्रचंड हुशार होता. शाळेत नेहमी पहिला असायचा. त्याला संगीताची आवड होती. तो तबला, मृदुंग छान वाजवायचा, आवाजही छान होता. त्याची ही कला जोपासावी म्हणून दर रविवारी ती सुमेधला तबला, गायनाच्या क्लासला घेऊन जायची. त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायची. त्याला काहीच कमी पडू देत नव्हती. पण सुमेधला ते नको होतं त्याला आई त्याच्याजवळ हवी होती. एका गृहिणी सारखी आई सतत त्याच्या मागे असावी त्याला नेहमी वाटायचं. आईने त्याचा अभ्यास घ्यावा. छान छान पदार्थ करून घालावेत.पालकसभेला हजर राहावं. फिरायला घेऊन जावं, चित्रपट पहायला घेऊन जावं असं सुमेधला नेहमी वाटायचं. पण सीमाला हे शक्य नव्हतं. आई आणि बाबा या दुहेरी भूमिका ती पार पाडत होती. यात एक आई म्हणून तिची फार फरफट होत होती. पैसा कमवण, मुलाचं संगोपन करणं, त्याला कोणतीही उणीव भासू न देणं, त्याचं चांगलं उज्ज्वल भविष्य घडवणं हेच तीचं उद्धिष्ट होतं. कर्जाची परतफेड करण गरजेचं होतं. म्हणून तिने आपलं सगळं लक्ष कामावर केंद्रित केलं.
सुमेध दहावीच्या परीक्षेत शाळेतून दुसरा आला. सीमाला खूप आनंद झाला. मुलाने तिच्या कष्टाचं चीज केलं. पूर्ण ऑफिसमध्ये तीने पेढे वाटले. ज्या कंपनीच्या संस्थापकांनी वेळोवेळी तिला साथ दिली होती. त्या सर्वांचे आभार मानत होती. सुमेधही खूप खुष होता. सुमेधला संगीताची आवड होती. त्याला कला शाखेतून पुढचं शिक्षण करायचं होतं.पण सुमेधच्या बाबांना उमेशला त्याला इंजिनीयर करायचं होतं. त्याचं स्वप्नं पूर्ण करायचं हे सीमाचं ध्येय होतं. म्हणून तिने सुमेधला विज्ञान शाखेतून बारावी करायला सांगितलं,
तिने सुमेधला समजावून सांगितलं,
"संगीत आवड म्हणून ठीक आहे पण तुझ्याकडे आर्थिक स्थेर्य मिळवण्याचं साधन हवं. तू माझ्या नंतर कधी उपाशी राहता कामा नये. तुझ्या बाबांचं स्वप्न होतं तू इंजिनीयर व्हावं. तुझ्या भल्या साठीच सांगतेय”
सीमाने समजावल्यावर सुमेध तयार झाला.त्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.
सुमेध मुळातच हुशार असल्याने त्याला फारसं कठीण गेलं नाही. बारावीलाही तो चांगल्या मार्कानी पास झाला. सी.ई. टी म्हणजेच इंजिनिअरिंग च्या प्रवेशापुर्वीची परीक्षाही तो उत्तम गुणांनी ऊत्तीर्ण झाला. आता सुमेधला नवीन कॉलेज चे वेध लागले होते. इंजिनिअरिंगचं सर्वात नामांकित कॉलेजमध्ये त्याला प्रवेश हवा होता. सीमापुढे कॉलेजच्या फीचा यक्षप्रश्न होता. वर्षाला अंदाजे प्रत्येकी एक लाखभर रुपये लागणार होते. चार वर्षे होती इंजिनिअरिंगची.
सीमाने अजून नवीन कर्ज काढलं. मुलाची फी भरली. अजून जास्त काम करावं लागणार होतं. पण सीमा मोठ्या हिंमतीची. ती खचली नाही. नव्या जोमाने काम करू लागली. सुमेधला बस च्या प्रवासाचा त्रास नको म्हणून तिने त्याच्या साठी दुचाकी गाडी घेतली. मोठ्या कॉलेजमध्ये जात होता म्हणून त्या पद्धतीचं त्याचं राहणीमान होत गेलं. नवीन आधुनिक कपडे, महागडा लॅपटॉप, महागडा मोबाइल फोन. सगळं उपलब्ध करून देत होती. स्वतः कर्जात राहून मुलाला सुख देत होती.
सगळं सुमेधच्या म्हणण्या प्रमाणे असताना सुमेधला का इतका राग होता आईवर? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© ® निशा थोरे...
कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही.. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा