Login

माझं काय चुकलं भाग ३

ही एक सामाजिक कथा..आई मुलाच्या नात्याची आगळी वेगळी गुंफण

माझं काय चुकलं??..भाग - ३

पुर्वाध:- आपण मागील भागात पाहिलं की सीमा घरातल्या वातावरणाला कंटाळली होती. पण त्यामुळे तिच्या स्वभाव चिडचिडा आणि बंडखोर झाला होता.. घरातल्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला..शेजारच्या लोकांनी तिला त्वरीत इस्पितळात घेऊन गेले. आता पुढे..


 

माझं काय चुकलं??..भाग - ३

सीमाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. तिची प्रकृती चिंताजनक होती. पोलीस केस होणार होती. सीमा घरच्या लोकांच्या विरुद्ध सांगेल की काय म्हणून सीमाचे आई बाबा घरातले सगळेच घाबरले होते. चोवीस तास उलटून गेले होते तरी सीमा शुद्धीवर येत नव्हती. पण इतक्यात का तिच्या वेदनांचा प्रवास संपणार होता? अजून खूप सोसायचं होतं.. इतक्यात त्याचं बोलावणं कसं बरं येईल..!!! 

शेवटी डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं होतं. तिच्या पोटात गेलेलं विष श्वास नलिकेद्वारे बाहेर काढण्यात आलं. हळूहळू सीमा शुद्धीवर येत होती. आणि अखेरीस सीमाने हलकेच डोळे उघडले. सीमा शुद्धीवर आली होती.

सीमा शुद्धीवर आलेली पाहताच तिचे बाबा तिच्याजवळ गेले. हळूच कानाजवळ येऊन धमकावणीच्या स्वरात म्हणाले, 

“घरातल्या गोष्टी जर पोलिसांना सांगितल्या तर तुझ्या बहिणींना घरी जाऊन मार देईन मी. आता तू ठरवं काय सांगायचं ते.” 

सीमाच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. पोलीस तिला भेटायला तिच्या खोलीत आले. सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं.जाता जाताही तिचे  बाबा एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकून गेले. पोलीस तिच्याशी बोलू लागले. 

“काय झालं होतं नेमकं?” त्यांनी प्रश्न विचारला.

सीमाच्या डोळ्यांसमोर तिच्या बहिणी मार खाताना दिसू लागल्या. सीमाच्या डोळे वाहू लागले. ती म्हणाली,

“ मला खोकला आला होता. खोकल्याचं औषध समजून मी चुकून ते औषध प्याले. कोणतंही वेगळं कारण नाही.”

सीमाने चुकीने औषध घेतल्याचा कबुलीजवाब दिला.  तिच्या या जबाबामुळे कोणतीच केस उभी राहिली नाही. चार दिवसांनी  सीमाला घरी सोडण्यात आलं.

सीमा घरी आली. काही दिवस घरातलं वातावरण शांत होतं. सीमाशी कोणी बोलत नव्हतं. सगळ्यांनी जणू तिला वाळीत टाकलं होतं. सीमाचा आत्महत्येचा प्रयत्न पूर्णपणे फसला होता. पण या प्रकारामूळे सीमाच्या आत्महत्येचं काय कारण असावं? लोकांच्या शंकेच्या नजरा तीच्या वडिलांना त्रास देत होत्या. तिच्या वडिलांची समाजात शरमेने मान खाली गेली होती. त्यामुळे घरातलं वातावरण तणावाचं होतं. तशी सीमाही थोडी शांत झाली होती. सगळं घरचं वातावरण पुर्ववत व्हायला एक महिना गेला.

यंदा सीमाचं दहावी वर्ष होतं. अत्यंत महत्वाचं वर्ष. शालांत परीक्षा. शैक्षणिक आयुष्यातला महत्वाचा टप्पा. तिच्या बाबांनी तिथेही भेद केला होता. मुलींना सरकारी मराठी शाळा आणि मुलाला खाजगी इंग्रजी माध्यम शाळा. सातवी पर्यंत मुली सरकारी शाळेत होत्या. आणि नंतर अचानक सातवीनंतर त्यांचं शाळेत जाणं बंद करण्यात आलं आणि लग्नासाठी स्थळं पाहण्यास सुरुवात झाली. पण सीमा पुढे शिकायचं म्हणून हट्ट धरून बसली होती. सीमाला शिक्षणाचा ध्यास होता. काही झालं तरी शिकायचंच. तिने मनाशी पक्कं ठरवलं होतं. आणि जिथे इच्छा असेल तिथे मार्ग सापडतोच. सीमा  हट्टाने सातवी नंतर पुढील शिक्षणासाठी खाजगी शाळेत जाऊ लागली. फी भरण्यासाठी पैशांची गरज होती म्हणून सीमा घरात कोणालाही न सांगता एक दोन घरी धुण्या-भांड्याच्या घरकामाला जाऊ लागली. पुढील शाळेचा खर्च, स्वतःची शाळेची फी स्वतः कमावलेल्या पैश्यातून भरू लागली. सीमा कधीच नापास झाली नव्हती पण तरीही तिला गणित हा विषय खूप अवघड जायचा. कोणताही खाजगी क्लास नव्हता. तशीच ती एकटी धडपड करत होती. आणि मग तिच्या आयुष्यात आलं एक  वादळ. तिला नेस्तनाबूत करण्यासाठी.

पराग नाव होतं त्याचं. नुकताच गावावरून शहरात आला होता. खूप देखणा राजबिंडा वगैरे असं काही नव्हता तरी चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास झळकायचा. घरची परिस्थिती हलाकीची असूनही मोठ्या कष्टाने तो पदवीधर झाला होता. स्पर्धापरीक्षा देत देत पुढे येत होता. भारत पेट्रोलियम मध्ये क्लार्क म्हणून नोकरीतही होता. शहरात आल्यावर तो त्याच्या काकांकडे राहत होता. त्याचे काका आणि सीमाचे वडील पक्के दोस्त. अगदी एकमेकांच्या घरी जाऊन जेवणाच्या पंगती उठायच्या. तिथेच पराग आणि तिच्या बाबांची ओळख झाली. तिच्या बाबांनी एकदा परागला विचारले,

“तुम्ही आमच्या मुलांना खास करून मुलाला शिकवाल का? त्याची फी सुद्धा देतो”

पराग हसून होकार देत म्हणाला,

 “हो चालेल ना.. मला तुमच्या कडून फी नको पण एक वेळच्या रात्रीच्या जेवणाची सोय झाली तर बरं होईल. तुमच्याकडे जे साधं जेवण बनत असेल तरी चालेल अगदी पिठलं भाकरी सुद्धा” 

दोघांनीही हसून होकार दिला आणि मुलांची शिकवणी सुरू झाली. पराग रोज दिवसभर कामावर जायचा आणि संध्याकाळी मुलांना शिकवायला यायचा. त्याचं सीमा दहावीला असल्याने तिच्याकडे थोडं जास्त लक्ष होतं. पराग खूप छान शिकवायचा. सीमा मुळचीच हुशार असल्यानं परागने शिकवलेला अभ्यास  ती लगेच आत्मसात करायची.

परागचं शिकवणीच्या निम्मितानं येणंजाणं होऊ लागलं. ठरल्याप्रमाणे शिकवणीच्या फीच्या ऐवजी रात्रीचं जेवण सीमाच्या घरी होऊ लागलं. मग जेवणानंतर रात्र रात्रभर जागून अभ्यास होऊ लागला. तो स्वतः तिथे मुलांच्या सोबत थांबू लागला. त्याचं त्यांच्या घरी राहणं होऊ लागलं. सीमाचा भाऊ अभ्यास थोडा कमजोर असल्याने त्याची फारशी प्रगती दिसत नव्हती. फक्त तिच्या  बाबांचा हट्ट असल्यामुळे पराग त्याला शिकवत होता.  सीमाचा भाऊ अभ्यास करता करता झोपी जायचा. पण सीमा मात्र रात्रभर जागून परागने शिकवलेल्या गोष्टींची उजळणी करत राहायची. गणित विषयाबरोबरच तो विज्ञान, इंग्रजी, इतर विषयांकडेही लक्ष देऊ लागला.

सीमाचं दहावीचं वर्ष असल्याने पराग सीमाच्या अभ्यासात स्वतः वैयक्तिक लक्ष घालत होता. तसा तो फार शिस्तीचा. अभ्यासाच्या बाबतीत कडक स्वभावाचा. त्याने दिलेला गृहपाठ, गणितं सोडवण्याचा सराव, सूत्रे पाठांतर नाही केलं तर तो शिक्षाही करायचा. पण खूप छान शिकवायचा. त्यामुळे सीमाला शिक्षेचं काही वाईट वाटायचं नाही. गणित जो तिचा नावडता विषय होता आता तिला त्यात रुची वाटू लागली होती. 

आणि सीमा पहिल्या घटक चाचणी परीक्षेत वर्गात पहिली आली. तिला गणितात छान मार्क पडले होते. सीमा खूप आनंदी होती. शाळेतले शिक्षकही तिच्यावर खूप खुष होते. पण घरात काहीच कौतुक होत नव्हतं. तिचं मन खट्टू व्हायचं.


 

परागलाही आता सीमाच्या घरच्या लोकांच्या वागण्याचा अंदाज आला होता.सीमा विषयी मनात एक कणव निर्माण झाली होती. घरातली ठरलेली वाटून घेतलेलं सर्व कामे आटपून ती अभ्यास करायची. घरातली तिच्या वाट्याची कामे नाही केली किंवा दुसऱ्या कोणी केली तर घरी तिला चांगलाच मार मिळायचा. इतक्या हुशार गुणी मुलीची होणारी फरफट  परागला स्पष्ट दिसत होती. पण कितीही झालं तरी तो परका होता. कोणाला काही सांगण्याचा त्याला काय अधिकार होता?  सद्याच्या परिस्थितीत शिकवण्याच्या बदल्यात त्याला एक वेळचं जेवण मिळत होतं हीच सुदैवाची गोष्ट होती. तो कोणालाच काही बोलायला जायचा नाही. तो त्याचं शिकवण्याचं काम करून निघून जायचा.

सीमाची दहावीची बोर्डाची परीक्षा होती. घरातली सगळी कामे करून ती रात्रभर अभ्यास करायची. सकाळी उठून ती परीक्षेला जायची. शेवटचा इतिहासाचा पेपर होता. घरातली सगळी कामे उरकली. जेवणं संपवून, भांडी घासून सगळं स्वच्छ केलं. घरातल्या बाकीच्यांना झोपायचं होतं. सीमा अभ्यासाला बसली. आणि तिच्या बाबांनी मुद्दाम घरातले दिवे मालवून टाकले. तिच्या अभ्यासात व्यत्यय आणण्यासाठी. का हा दुष्टपणा? तिला समजलं नव्हतं. पण 

तरी सीमा डगमगली नाही. त्या रात्री सीमाने अंगणात बसून रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात तिचा अभ्यास केला.ती परीक्षा देऊन घरी आली. सगळे पेपर्स खूप छान गेले होते. आता तिला निकालाचे वेध लागले होते.

पुढे काय होतं?  सीमा परीक्षेत उत्तीर्ण होईल का? अजून कोणत्या संकटातून सीमाला जायचं होतं??पाहूया पुढील भागात.. 

क्रमशः

© ® निशा थोरे..

कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही.. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी..

0

🎭 Series Post

View all