Login

माझं काय चुकलं भाग ४

ही एक सामाजिक कथा आई मुलाच्या नात्याची एक आगळी वेगळी गुंफण

माझं काय चुकलं??..भाग - ४

पुर्वाध:- आपण मागील भागात पाहिलं की सीमाने घरातल्या वातावरणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यातून सुखरूप वाचल्यानंतर सीमा काही दिवस खूप शांत होती. सातवी नंतर शिक्षण बंद करून लग्नाची तयारी सुरू झाली. पण शिक्षणाच्या ध्यासाने पेटून उठलेल्या सीमाला त्यापलीकडे काहिच सुचत नव्हतं. पुढील शिक्षणासाठी तिने दोन घरची धुणीभांडी करू लागली. आणि त्यातूनच स्वतःच्या शालेय शिक्षणाचा खर्च भागवू लागली. परागच्या घरी शिकवायला येण्याने तिच्यात खूपच सुधारणा झाली होती. सीमाचा दहावीचा निकालाचा दिवस होता आता पुढे..



 

माझं काय चुकलं? भाग - ४

सीमा आणि पराग ज्या दिवसाची अतिशय उत्सुकतेने वाट पहात होते तो दिवस उगवला. आज तिच्या परीक्षेचा निकाल होता. सीमाच्या मनात धाकधूक होती.  म्हणून तिने परागला सोबत येण्याची विनंती केली. पराग यायला तयार  झाला. दोघे मिळून तिच्या शाळेत गेले. शाळेच्या फलकावर पास झालेल्या मुलांची यादी चिटकवली होती. दोघांनाही तिच्या निकालाची उत्सुकता होती. तिच्या निकालावरच तिचं भवितव्य अवलंबून होतं. पराग पुढे गेला आणि सीमाचे नाव शोधू लागला. आणि त्याने आनंदाने अक्षरशः उडी मारली. सीमाला मोठयाने आवाज देत तो ओरडला,

“अग ये सीमा, आहेस कुठे? बघ तुला फर्स्ट क्लास मिळाला आहे. ८०% गुणांनी तू  पास झालीस..खूप खूप अभिनंदन ग..!”

सीमा उत्तम गुणांनी पास झाली होती. ही आनंदाची बातमी परागने धावत येऊन सीमाला सांगितली. तिला अतिशय आनंद झाला. डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा तिने पार केला होता. आनंदानं तीने परागला कडकडून मिठी मारली. पण थोड्या वेळातच ती भानावर आली. ती त्याच्या पायांना स्पर्श करून नमस्कार करण्यासाठी खाली वाकली इतक्यात परागने तिला अडवले. आणि तिच्या हातात हात घेऊन तीच अभिनंदन केलं. सीमाला खूप आनंद झाला होता. ती धावतच बाजारात गेली  मिठाईच्या दुकानातून पेढे घेऊन आली. सर्वात प्रथम तिने परागला पेढा दिला. आणि मग सीमा तिच्या वर्गशिक्षकांना जाऊन भेटली.  सगळ्यांनाच खुप आनंद झाला होता. सगळ्यांनी तिचे अभिनंदन केलं.

आज सीमा खूप खुश होती. आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा तिने पार केला होता. सीमाच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं होतं. परागने तिच्यावर जी मेहनत घेतली होती  त्याचं चीज झालं होतं. सीमाच्या घरातल्या माणसांना  तितकासा आनंद किंवा आश्चर्य वाटलं नव्हतं.  त्यात काय नवल! अशी त्यांची प्रतिक्रिया होती.  पण तरीही परागला दाखवण्यासाठी ते खूप आनंदी असल्याचं भासवत होते. 

सीमाला अजून पुढे शिक्षण घ्यायचं होतं. पण तीच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं. तिच्या आधीच्या तीन बहिणी लग्नाच्या होत्या. तेच आईवडिलांना मोठं संकट वाटू लागलं होतं. त्यांनी सीमाच्या पुढील शिक्षणाला कडाडून विरोध केला. 

पण सीमाही काही कमी नव्हती. काहीही झालं तरी पुढील शिक्षण घ्यायचं तिने जणू निर्धारच केला होता. सीमा हट्टाला पेटून उठली होती. घरात खूप तिने आकांडतांडव केला.

परागने मोठ्या प्रयासाने तिच्या घरच्या लोकांची समजूत काढली. तो तिच्या बाबांना म्हणाला,

 “हे बघा काका, आपण आधी मोठ्या मुलींच्या लग्नाची तयारी करू. चांगलं स्थळ पाहून लग्न उरकून टाकून त्यांची लग्नं होईपर्यंत सीमा शिकत राहील. चांगला मुलगा भेटला की करून टाका लग्न. तो पर्यंत शिकू द्या. मी तुम्हाला  सर्व मुलींसाठी मदत करतो मुलगा शोधायला”

मग काय! सीमाच्या वडिलांना आनंदच झाला. त्यांना परागचं म्हणणं पटलं होतं. त्यांनी  थोडा विचार केला.

“असंही कुठे लगेच स्थळ आलंय? स्थळ येईपर्यंत घरात बसून राहण्यापेक्षा शिकेल.चार पैसे कमवून आणेल तर आपलाच फायदा होईल. आणि परागही मुलगा शोधायला मदत करेल” 

म्हणून त्यांनी  परागच्या बोलण्याला होकार दिला. 

 आधी घरातली सर्व कामे करून मग सीमाला पुढे शिकता येईल अशी त्यांनी अट घातली. सीमाला पुढे शिकायचं होतं. तिने क्षणाचाही विलंब न करता तिच्या वडिलांनी घातलेली अट मान्य केली. खरंतर सीमाला इंजिनिअरिंगला जायचं होतं. म्हणून तिला विज्ञान शाखेत प्रवेश घायचा होता.  पण ‘एक मुलगी इंजिनियर!’ त्यात विज्ञान शाखेची प्रवेश फीही जास्त होती. घरच्यांना नकार देण्यास चांगलीच संधी मिळाली. आणि त्यांनी फी भरण्याला नकार दिला. परागचा पगारही फार नव्हता. त्यामुळे फीची रक्कम त्याच्याही अवाक्याबाहेरची होती. शेवटी परागने सीमाला समजावून सांगितलं,

“सीमा, विज्ञान शाखेची प्रवेश फी माझ्याही आवाक्याबाहेरची आहे. तुझं पदवीधर होणं जास्त महत्वाचं आहे. म्हणून मला वाटतं की, तू वाणिज्य शाखेतून कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा. त्यामुळे तुला नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. आणि पुढील शिक्षण सुरू राहील. बघ विचार करून एकदा.” 

सीमाचा नाइलाज झाला. पण आर्थिकदृष्ट्या तिला परागचं म्हणणं पटलं आणि तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याची तयारी दाखवली. परागने दोन तीन कॉलेजचे फॉर्म्स आणले होते. त्याने स्वतः फॉर्म भरून कॉलेजमध्ये  देऊन आला. प्रवेशप्रक्रिया सुरू झाली. जवळच्याच कॉलेजमध्ये सीमाचा नंबर लागला. तिच्याच शाळेचं कॉलेज होतं. परागने सीमाच्या कॉलेजच्या पहिल्या वर्षाची प्रवेश फी भरली. आणि सीमाने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. सीमाचं कॉलेजमध्ये जाण्याचं स्वप्नं साकार झालं होतं. परागच्या कृपेने ती आता वेगळ्या विश्वात प्रवेश करणार होती. सीमा खूप आनंदात होती. 


 

सीमाचं कॉलेज सुरू झालं. कॉलेजचं पहिलं वर्ष. आज कॉलेजचा पहिला दिवस. शाळेतले बालपणीचे दिवस संपून तारुण्यात पदार्पण. खूप छान वाटत होतं आणि कुतूहलही. नवीन वेगळ्या विश्वात प्रवेश होता. अगदी फुलपाखरांचे भिरभिरण्याचे दिवस. नटण्या मुरडण्याचे दिवस. पुन्हा पुन्हा आरशात पाहण्याचे दिवस. आपल्याच प्रेमात पडण्याचे दिवस. सीमाच्या जीवनात या निमित्तानं थोडासा आनंद आला होता. सकाळचा स्वयंपाक करून घरातली धुणे भांडी, सगळी साफसफाई करून ती कॉलेजमध्ये यायची. तिच्या बरोबरीची मुलं कॉलेज जीवन आनंदानं जगत होती. तिच्या कॉलेजमधल्या मुली छान छान दिसण्यासाठी अनेक सौन्दर्य प्रसाधने वापरायच्या. छान पोशाख, निरनिराळ्या चप्पला पायात. सुंदर दिसावं म्हणून प्रयत्न करायचा.

सीमालाही मोह व्हायचा.. वाटायचं तिलाही आपणही त्यांच्या सारखं छान राहावं, दिसावं. पण पैश्याअभावी आणि घरातल्या बंधनामूळे ते शक्य नव्हतं. तिच्या बाबांना डोळ्यांत काजळ घातलेलं, केस मोकळे सोडलेलं, अजिबात आवडत नव्हतं. 

सीमा नाकी डोळी नीटसं असली तरी रंगाने काळी सावळी. दिसायला सर्वसाधारण होती.  कॉलेजमध्ये मुलांचा घोळका नेहमी सुंदर मुलींच्या भोवती असायचा.

“आपण सुंदर नाही कोणी आपल्याला पाहत नाही. किंमत देत नाही” असं तिला नेहमी वाटायचं. तो न्यूनगंड तिच्या मनात कायमचा घर करून राहिला. आणि त्या दडपणाखाली ती कॉलेजमध्ये वावरू लागली. एकटी राहू लागली. मित्र मैत्रिणींपासून दूर जाऊ लागली. 


 

सीमाचं कॉलेज हे तिच्या शाळेसोबतच जोडलं होतं..ज्या शाळेत शिकली तिथेच कॉलेज होतं म्हणून सगळे शाळेचे नियम लागू होते. अगदी गणवेशापासून. कॉलेजलाही गणवेश होता. ते घेण्यासाठीही तिच्या कडे पैसे नव्हते. घरून बाबांकडे मागण्याची सोयच नव्हती. त्यांनी कॉलेज सोडून घरी बसायला सांगितले असते म्हणून तिने त्याच कॉलेज मध्ये शिकणाऱ्या तीच्या शेजारच्या मुलीचा जुना गणवेश मागून घेतला. तोच स्वच्छ धुवून वापरू लागली. तो एक खर्च वाचला होता. 

एकच ध्यास होता. खूप शिकायचं. आणि जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतोच. तो सापडतो आपल्याला.. तसच सीमा शोध घेत होती. ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग गवसत होता. 


 

पुढे काय होतं? अजून कोणत्या संकटातून सीमाला जायचं होतं? पाहूया पुढील भागात.. 

क्रमशः

© निशा थोरे..

कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही.. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी..

0

🎭 Series Post

View all