Login

माझं काय चुकलं भाग ५

ही एक सामाजिक कथा आई मुलाच्या नात्याची एक आगळी वेगळी गुंफण..

माझं काय चुकलं??..भाग - ५

पुर्वाध:- आपण मागील भागात पाहिलं की सीमा शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाली. घरातून तिच्या पुढील शिक्षणाला विरोध झाला पण सीमाच्या हट्टापुढे कोणाचेच चालले नाही. आणि परागच्या सहकार्याने तिने कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. एका नवीन विश्वात प्रवेश केला. आता पुढे..


 

माझं काय चुकलं??..भाग - ५

अगदी प्रतिकूल परिस्थितीत सीमा आपलं पुढील शिक्षण पूर्ण करत होती. घरातली सर्व कामे उरकून मग ती कॉलेजला जायची. मन लावून अभ्यास करायची. मुळातच हुशार असल्याने फार कमी अवधीत सीमा सर्व प्रोफेसरांची लाडकी विद्यार्थिनी बनली होती. परागही तिला वेळोवेळी मार्गदर्शन करत होता. मदत करत होता. आस्थेने विचारपूस करत होता.  कॉलेजमध्ये हुशार विद्यार्थ्यांमध्ये तिची गणती होऊ लागली. विद्यार्थ्यांमध्येही ती प्रिय बनली. सर्व मुलं तिच्याजवळच्या नोट्स मागण्यासाठी बोलू लागले. अभ्यासात तिची मदत घेऊ लागले. सीमा खूप आनंदात होती. इतके कष्ट असतानाही तिच्या शिक्षणातली गोडी तसूभरही कमी झाली नव्हती. उत्तरोत्तर तिची प्रगती वृद्धिंगत होत होती. 

परागने सीमाच्या वडिलांना दिलेल्या शब्दांप्रमाणे आपलं वचन पाळलं त्याच्या ओळखीने सीमाच्या मोठ्या दोन बहिणींची लग्न झाली. तीन नंबरच्या बहिणीसाठी वरसंशोधन चालू होतं. मुलींची शिक्षणं कमी म्हणून अशीच शेतीवाडी असणारी, खाजगी नोकरी करणारी मुलं पाहण्यात आली. सीमाच्या वडिलांनी अगदी साध्या पद्धतीने विवाह करून दिला. तिच्या आईवडिलांच्या डोक्यावरचं एक ओझं कमी झालं होतं. पराग आता सीमाच्या  तीन नंबरच्या बहिणीसाठी मुलाच्या शोधात होता. 

पराग सीमाच्या आयुष्यात आला आणि तिचं अवघं आयुष्याचं बदलून गेलं. पराग सीमाच्या आयुष्यात एक देवदूत बनून आला होता. त्याच्यामूळे तिचं पुढचं शिक्षण होऊ शकलं होतं. दिवसेंदिवस सीमाच्या मनात त्याच्या विषयी आदर वाढत होता. त्याच्या रूपाने तिच्या जीवनात सुख आलं होतं. तिचं शिकून मोठं होण्याचं स्वप्नं पूर्ण होणार होतं. 

सीमाला रोज काहींना काही कारणावरून ओरडा पडायचा. कधी मार पडायचा. परागलाही खूप वाईट वाटायचं. तो तिला प्रेमाने मायेने समजून सांगायचा. ‘हेही दिवस जातील’ असं म्हणून एक आशेचा दीप सदैव तिच्या मनात तेवत ठेवायचा. तिला आधार द्यायचा. कळत नकळत सीमाला पराग आवडू लागला होता. तिच्या अजाणत्या वयात  असं वाटणं  साहजिक होतं. 

कधी सीमाला वडिलांकडून मार मिळायचा. पराग तिच्या जखमांवर फुंकर घालायचा. मलम लावून द्यायचा. इवल्याशा प्रेमाच्या झऱ्यानेही सीमा खुश व्हायची.  सीमाला पराग आवडू लागला होता. ‘कोणी आपली काळजी करतं, समोरच्याला वेदना होतात’ हे पाहून सीमा हळवी व्हायची. तिला अजूनच रडू यायचं. परागच्या आपुलकीच्या वागणुकीमुळे सीमाच्या मनात प्रेमाचं बीज अंकुरायला सुरुवात झाली होती. ती त्याच्याकडे ओढली जात होती. मनात प्रीतीची फुलं उमलू लागली होती. या वयात हे सारं नैसर्गिक होतं. 

सीमा पराग घरी येण्याची वाट पाहत बसायची. त्याच्या साठी मुद्दाम त्याच्या आवडीचे पदार्थ करून त्याला खाऊ घालू लागली. त्याच्या प्रेमाची छटा तिच्या चेहऱ्यावर दिसू लागली. आरश्यात स्वतःचंच उमलणारं रूप पाहून लाजायची.  त्याच्या आठवणी आठवून उगीच हसायची. अजाणतेपणे होणाऱ्या परागच्या स्पर्शाने मोहरून जायची. टीव्ही समोर चित्रपट पाहत असताना चित्रपटातील प्रत्येक नायक नायिकेच्या रुपात तिला ती आणि पराग दिसू लागायची. परागच्या स्वप्नांत ती गुंगून जायची. परागचा विषय निघाला की अगदी लाजेने अगदी चुर व्हायची.  

परागलाही तिचं प्रेम जाणवत होतं. त्यालाही सीमा आवडत होती. दुःखाशी कसं लढायला हवं? हे तिच्याकडून खरंच शिकण्यासारखं, तिची शिक्षणाची आवड, ती धडपड, ती जिद्द त्याला आवडत होती. परागचंही लग्नाचं वय झालं होतं. त्याला सीमा त्याच्यासाठी योग्य मुलगी  वाटत होती. सीमासारखी सुशील, संस्कारी, घराला, घरातल्या प्रत्येकाला सांभाळून घेणारी अशीच मुलगी त्याला जोडीदार म्हणून हवी होती. सीमा रंगाने काळी होती. हा काही तिचा दुर्गुण नव्हता. सीमा दिसायला फार सुंदर नसली तरी गुणी होती. प्रेमळ होती.  म्हणूनच की काय! पराग तिच्याकडे आकर्षित झाला होता. पण सीमाला त्याच्या मनात तिच्याविषयी असलेलं प्रेम सांगण्याचं धाडस मात्र होत नव्हतं. 


 

एकदा काय झालं. आईने सीमाला रात्रीचा स्वयंपाक करून ठेवायला सांगितला होता. पण सीमाला बरं वाटत नव्हतं.अंगात कणकण जाणवत होती. म्हणून ती आईला म्हणाली, 

“आई, मला आज बरं वाटत नाहीये. खूप अंग दुखतंय. आज मी नाही करत स्वयंपाक. आजच्या दिवस तू करशील का स्वयंपाक? नाहीतर सुलूताईला सांगशील का?”

सीमाचं बोलणं ऐकून सीमाची आई तिच्यावर भडकली. तिला वाटलं,‘ सीमाला काम करायला नको म्हणून ती खोटं बोलतेय’ 

आईने रागाने तिला ओरडायला सुरुवात केली. सीमाच्या बाबांच्या कानावर तिच्या आईचे स्वर पडत होते. सीमाच्या  बाबांना खूप राग आला. जणू मारण्यासाठी त्यांना कारणच हवं होतं! मग काय! रागाच्या भरात बाबांनी तिला बेदम चोप दिला. तसंच रडत रडत अंगात कणकण असतानाही सीमाने स्वयंपाक बनवला. सगळ्यांची जेवणं झाली.  पण सीमा जेवलीच नाही. तिने रात्रीची भांडीकुंडी आटोपुन ती आणि तिचा भाऊ प्रसाद तिच्या खोलीत अभ्यासाला बसली. वाणिज्य शाखेत असल्याने 'अकाउंटिंग' विषय होता. त्या विषयाचा अभ्यास करणं गरजेचं होतं. सीमाचा धाकटा भाऊ प्रसाद नववीत होता. पराग दोघांनाही शिकवत होता. अभ्यास करता करता प्रसादला झोप येऊ लागली. तो पेंगू लागला. प्रसादला पेंगुळलेल्या अवस्थेत पाहून पराग त्याला म्हणाला,

“प्रसाद, तुला फार झोप आलीय. जा झोप जा. उरलेला अभ्यास आपण उद्या करूया”

प्रसादने मान डोलावली आणि झोपण्यासाठी तो बाहेरच्या खोलीत निघून गेला.

आता त्या खोलीत सीमा आणि पराग दोघेचं होते.  सीमा अभ्यास करत होती. पण तिचं अभ्यासात अजिबात मन लागत नव्हतं. डोळ्यांतून सारखं पाणी येत होतं. पराग तिच्या बाजूला येऊन बसला.

परागच्या लक्षात आलं होतं सीमाच्या डोळ्यात पाणी.. म्हणजे नक्कीच काहीतरी घडलं असावं. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, 

“काय झालं सीमा? का रडतेस? काकांनी तुला पुन्हा मारलं का ग?” 

परागचे शब्द कानावर पडताच सीमाच्या आसवांचा बांध फुटला. आणि रडत रडत तिने घडलेली पूर्ण घटना सांगितली. परागच्या डोळ्यात पाणी आलं त्याने तिचा हात अलगद हातात घेतला. हातावर लागलेल्या जखमेवर फुंकर घालू लागला. सीमाचे अश्रू अनावर झाले आणि एकदम ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. परागने तिला जवळ घेतलं पाठीवरून हात फिरवत राहिला. त्याने तिला मोकळं होऊ दिलं. 

पहिल्यांदाच एका पूरुषाच्या बाहुपाशात ती शांतपणे विसावली होती. आणि पराग तिच्या केसांवरून हात फिरवत होता. प्रेमाने तिला गोंजारत होता. त्याच्या त्या आश्वासक उबदार मिठीत तिला सुखरूप वाटत होतं. परागच्या त्या स्पर्शाने ती मोहरली.

परागने एका हाताने सीमाची हनुवटी किंचित उचलून डोळ्यातले पाणी त्याच्या ओठांनी टिपून घेतलं. सीमाची काया रोमांचित झाली, शहारली. तिने डोळे बंद करून घेतले. मग परागने अलगद तिच्या कोमल ओठांवर आपले ओठ टेकवले.. एक दीर्घ चुंबन.. श्वास श्वासात मिसळलेला. तो मंतरलेला क्षण ती दोघेही जगत होती. पराग पुन्हा पुन्हा तिला चुंबीत राहिला. ती त्याच्या बाहुपाशात विरघळत होती. जणू या क्षणांची तिचं दुःखी मन मागणी करत होतं. तिची मिठी अजून घट्ट होत होती. परागचं ते चुंबन करणं तिला त्याच्या अजून जवळ घेऊन जात होतं. एका स्वर्गीय सुखाची सीमाला आणि परागला  अनुभूती होत होती.

सीमा भानावर आली. परागच्या मिठीतुन दूर जात ती स्वतःला सोडून घेऊ लागली. त्याच्या पासून दूर होण्याचा प्रयत्न करू लागली. पण पराग तिला पुन्हा जवळ ओढत होता. परागची मिठी अजून घट्ट होत गेली. त्याने पुन्हा एकदा दीर्घ चुंबन घेतलं. पुन्हा एकदा ती विरघळली. परागने सीमाचा हात हातात घेत म्हणाला,

“सीमा तू मला खूप आवडतेस, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. माझ्याशी लग्न करशील?” 

या अनपेक्षित प्रश्नाने सीमा भांबावून गेली. पण मनातून अत्यंत आनंदी झाली होती. जणू पराग तिच्याच मनातलं बोलून गेला होता!  तिलाही परागबद्दल खूप प्रेम वाटत होतं. 

आणि नजरेनेच गोड स्मित हास्य करत तिने होकारार्थी मान डोलावली.

सीमाच्या आयुष्यात बरंच परिवर्तन झालं होतं. ती हसू लागली होती. परागच्या प्रेमळ बोलण्याने ती सुखावली होती. त्याच्या प्रेमात नखशिखांत नाहून निघाली होती. सगळं तिला स्वप्नावत वाटत होतं. एक गोड स्वप्नं! खूप हवंहवंसं! घरात इतका त्रास असूनही ती इतकी आनंदी कशी राहतेय? घरच्यांना किंबहुना सगळ्यांनाच संभ्रमात टाकत होतं. एक नवीन तेज चेहऱ्यावर दिसत होतं.


 

पुढे काय होतं? सीमा आणि परागचं नातं टिकेल का? पाहूया पुढील भागात.. 

क्रमशः

© ® निशा थोरे..

कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही.. साहित्यचोरी हा गुन्हा आहे.. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी..

0

🎭 Series Post

View all