माझं काय चुकलं? भाग - ६
पुर्वाध:- आपण मागील भागात पाहिलं की, सीमाचं कॉलेज छान सुरू होतं. घरातलं सगळं उरकून ती कॉलेजला जात होती. परागमूळे तिचं पुढील शिक्षण घेण्याचं स्वप्नं साकार होणार होतं त्यामुळे सीमाच्या मनात परागविषयी जिव्हाळा वाढू लागला. तिला पराग आवडू लागला होता. परागच्या मनातही सीमा बद्दल प्रेम निर्माण होत होतं. आणि एक दिवस परागने सीमा समोर आपलं प्रेम व्यक्त केलं आणि तिला लग्नाची मागणी घातली. सीमाने त्याच्या प्रेमाला होकार दिला आता पुढे..
माझं काय चुकलं? भाग - ६
सीमाला परागच्या रूपाने थोडासा प्रेमाचा झरा मिळाला.ती त्या सुखात नाहून निघाली होती. सीमा आनंदी राहू लागली. घरातली कामे संभाळून ती कॉलेजला जात होती.
एकीकडे सीमाचं कॉलेज सुरू होतं. आणि दुसरीकडे घरात होणारा त्रास संपत नव्हता. कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरून काहीच आर्थिक मदत होत नव्हती. कॉलेजची फी इतर खर्च भागत नव्हता. प्रत्येक वेळी परागकडून पैसे घेणं तिला योग्य वाटत नव्हतं. म्हणून तिने परागला तिच्यासाठी पार्टटाइम जॉब बघायला सांगितलं.
परागने आपल्या मित्राला पार्ट टाईम जॉब साठी विचारणा केली. एका वकिलांच्या ऑफिसमध्ये टायपिस्टची जागा भरायची होती. सीमाने दहावीनंतर टायपिंग इन्स्टिट्यूट मधून टायपिंगची परीक्षा दिली होती. त्यात ती चांगल्या गुणांनी पास झाली होती. त्यामुळे सीमाला तो जॉब लगेच मिळाला.
बारावी पास झाल्यानंतर सीमाने रात्रीच्या उच्च महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यामुळे तिला दिवसभर नोकरी करता येणार होती. पूर्णवेळ काम केल्याने पूर्ण वेळेचा पगार मिळणार म्हणून सीमाने रात्र कॉलेजला जाण्याचा निर्णय घेतला. सीमा आपल्या करियरच्या दृष्टीने विचार केला. अकाउंटिंग क्षेत्रातला अनुभव येण्यासाठी त्याच क्षेत्रातला जॉब बघण्यास सुरुवात केली. परागला त्याची कल्पना दिली. परागला सीमाचा निर्णय योग्य वाटत होता. आणि एक दिवस सीमाने वकिलांच्या ऑफिस मधला जॉब सोडून दिला. पटवर्धन अँड असोसिएट या सी.ए. फर्ममध्ये ती पूर्णवेळ काम करू लागली. त्यामुळे शिक्षणासोबत सीमाला कामाचा अनुभवही मिळत होता. संध्याकाळी सात ते रात्री दहा अशी कॉलेजची वेळ होती. सीमाच्या पगारातून तिची कॉलेजची फी भागत होती. दिवसभर नोकरी आणि त्या नंतर रात्रीचं कॉलेज. सीमा खूप दमून जायची. प्रचंड मेहनतीने सीमा आपल्या ध्येयाच्या दिशेने आगेकूच करत होती. एक ध्येयवेड्या मुलीचा रक्तबंबाळ प्रवास.
सीमाने किती कौतुकाने पहिल्या पगारातून आईसाठी साडी आणि वडिलांना शर्टाचं कापड घेतलं होतं! घरी मिठाई घेऊन आली होती. बहिणीला मोत्यांच्या बांगड्या, आणि परागसाठी हातातलं घड्याळ. सगळ्यांसाठी काहींना काही भेटवस्तू घेतल्या होता. पण स्वतः साठी काहीही घेतलं नव्हतं. उरलेल्या पगार तिने वडिलांच्या हातात दिला होता. तिची पहिली कमाई त्यांच्या हातावर ठेवताना किती आनंदी होती ती! पण अजून खूप मोठा वेदनेचा प्रवास बाकी होता. क्रूर नियती अजूनही तिचा पाठलाग सोडत नव्हती.
काही दिवसांनी परागच्या ओळखीच्या पाहुण्यांमुळे सीमाच्या मोठ्या बहिणीचंही लग्न झालं. सगळे आनंदी होते. सीमा पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती. काही दिवसांतच तिचं पदवीधर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार होतं. त्या क्षणांची ती खूप आतुरतेने वाट पाहत होती. सीमा पहाटे पाच वाजता घर सोडायची अकाउंटचा क्लास होता नंतर दहा ते संध्याकाळी सहापर्यंत ऑफिस आणि त्या नंतर सात ते रात्री साडे नऊ पर्यंत कॉलेज. पहाटे उठून बाबांच्या डब्याची तयारी, क्लास, नोकरी आणि तो मुंबईच्या लोकल ट्रेनचा प्रवास. तिची खूप दमछाक व्हायची. पण सीमा न कंटाळता सर्व कामे उरकून त्यानंतर अभ्यासाला बसायची. दमायची पण शिकण्याची जिद्द तिला स्वस्थ बसू देत नव्हती. सोबतीला परागचं प्रेम होतंच. तो घरी आला की एक चैतन्य संचारायचं तिच्यात. आनंद तिच्या वागण्या बोलण्यातून दिसू लागायचा. अधून मधून बाहेर भेटी होऊ लागल्या. प्रेमाची, लग्नाची, एकत्र जीवन व्यतीत करण्याची स्वप्नं सजू लागली.
आणि एक दिवस सगळं छान सुरळीत सुरू असतांना अचानक दुःखाने सीमाचा दरवाजा ठोठावला. सीमाच्या सुखाला ग्रहण लागलं सीमाने इतके दिवस सर्वांपासून लपवून ठेवलेलं तिचं प्रेम घरच्यांसमोर उघडकीस आलं. पराग आज सीमाक्सच्या प्रेमाची कुणकुण तिच्या घरच्यांना लागली. आणि घरात वादळ आलं. सीमाच्या वडिलांनी घर डोक्यावर घेतलं. संपूर्ण घराण्यात आजवर कोणी असं प्रेमप्रकरण केलं नव्हतं. सर्वांना हा एक धक्का होता. सीमाला तिच्या वडिलांनी खूप मारलं. घराण्याच्या नावाला काळिमा फासला म्हणून खूप शिवीगाळ केली. सीमाच्या वडिलांनी तिचं घराच्या बाहेर जाणं बंद केलं. बरेच दिवस तिला घरातच कोंडून ठेवलं. ऑफिसलाही जाऊ दिलं नाही. सीमाच्या वडीलांनी परागला घरी येण्यास बंदी घातली. सीमा आणि परागचं भेटणं अश्यक्यच झालं.
सीमाच्या प्रेमाला,भावनांना सुरुंग लागला होता. काय करावं? सीमाला काहीच सुचत नव्हतं. पण सीमा हरली नव्हती. सीमाचं परागवर खूप प्रेम होतं. आधीच बंडखोर स्वभाव तीही हट्टाला पेटली. “ लग्न करेन तर फक्त परागशी” तिनेही घरच्यांना ठणकावून सांगितलं कारण तिचा प्रचंड विश्वास होता परागवर, त्याच्या प्रेमावर.. आणि तो तिच्याशी नक्की लग्न करेल ही खात्रीही. ती परागच्या येण्याची वाट पहात होती. पण सगळं अघटित घडलं.
सीमाच्या घरातल्या लोकांचं वागणं पाहून परागने त्याच्या घरी सीमा बद्दल सांगण्याचं ठरवलं. कारण परागला सीमाही लग्न करायचं होतं. आयुष्यात तीच जोडीदार म्हणून हवी होती.
एक दोन दिवसांनी परागने त्याच्या घरी सीमाबद्दल सांगितलं. पण सीमा काळी होती परागच्या घरी ती कोणालाच पसंत नव्हती..त्याच्या घरच्यांनी त्याच्या पसंतीला नकार दिला. परागच्या घरीही काही वेगळी स्थिती नव्हती. परागच्या आईने रडून गोंधळ केला होता. त्याच्या वडिलांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. कोणी त्याच्याशी नीट बोलत नव्हतं. त्याच्या आईने एक प्रभावी अस्त्र काढलं. आणि त्या अस्त्राच्या वाराने पराग आणि सीमाच्या प्रेमाला सुरुंग लागला होता. आणि त्यात पराग हतबल झाला. आईच्या हट्टापुढे त्याचं काहीच चाललं नाही.
परागला सीमाला भेटायचं होतं. मनातली व्यथा सांगायची होती. सीमाची एक जवळीची मैत्रीण कुसूम परागला ओळखत होती. परागने तिची मदत घेण्याचं ठरवलं. आणि मग त्याने कुसूमकरवी सीमाला भेटण्याचा निरोप पाठवला.
कुसूम सीमाच्या घरी आली आणि तिच्या आईला म्हणाली,
“काकू, मी आईला बरं वाटत नाहीये.आणि घरातला किराणा संपलाय. दहा मिनिटांसाठी मी सीमाला सामान भरायला घेऊन जाऊ का? लगेच येतो”
सीमाची आई आणि कुसुमची आई खूप जवळच्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे तिला नकार देणं थोडं कठीण झालं. ‘किमान शेजारधर्म म्हणून तरी मदत करायला हवी’ सीमाच्या आईने विचार केला.
“बरं, बरं.. पण लवकर या. तिचे बाबा घरी आले आणि सीमा घरात दिसली नाही तर ते मलाच रागवतील. त्यामुळे दहा मिनिटात तुला परत यायचं आहे हे लक्षात असू दे”
आई सीमाला बजावत होती.
दोघींनीही होकारार्थी माना डोलावल्या. आणि मग कुसूम सीमाच्या आईला महत्वाचं काम आहे. “दहा मिनिटांत परत येते” असं सांगून सीमाला घराबाहेर घेऊन आली. बाहेर आल्यावर कुसूम सीमाला म्हणाली,
“सीमा, परागला तुला भेटायचं होतं. म्हणून तुला मी सामान भरण्याचं निम्मित सांगून तुझ्या घराबाहेर घेऊन आलीय. पराग तुझी बागेत वाट पाहतोय. मी दहा मिनिटात परत येते तू त्याच्याशी बोलून घे. आपल्याला दहा मिनिटांत परत घरी जायचं आहे हे लक्षात असू दे”
कुसूम सीमाला बजावत तिथून निघून गेली.
जवळच एक छोटी बाग होती. पराग आधीच तिथे पोहचला होता. बागेतल्या एका बाकावर बसून सीमाच्या येण्याची वाट पहात होता. सीमाला पाहून त्याला आनंद झाला. सीमाच्याही डोळ्यांतून पाणी वाहू लागलं..
पुढे काय होतं? सीमा आणि परागचं काय बोलणं होत? पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© ® निशा थोरे..
कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही. साहित्यचोरी हा गुन्हा आहे. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा