Login

माझं काय चुकलं भाग ८

ही एक सामाजिक कथा..आई मुलाच्या नात्याची एक आगळी वेगळी गुंफण

माझं काय चुकलं? भाग - ८


 

पुर्वाध:- आपण मागील भागात पाहिलं की   पराग आणि सीमा यांच्या प्रेमाची कुणकुण घरी लागली आणि घरात वादळ उठलं.. दोन्ही घरातून प्रंचड विरोध होत होता. परागचं सीमाच्या घरी येणं बंद झालं. परागच्या आईने आत्महत्येची धमकी दिल्याने परागने माघार घेतली आणि तो सीमाच्या आयुष्यातून निघून गेला. सीमाच्या काकांनी तिच्यासाठी उमेशचं स्थळ पाहिलं होतं आता पुढे..


 

माझं काय चुकलं? भाग - ८


 

सीमाच्या काकांनी उमेशच्या घरच्यांना होकार कळवून टाकला. कोणीही सीमाच्या पसंतीचा विचार केला नाही. सीमाच्या वडिल सरळ लग्नाची तारीख काढून मोकळे झाले होते. डोक्यावरचा भार कमी करायचा इतकाच त्यांचा हेतू होता. सीमानेही फार विचार केला नाही. तसही पराग नंतर सीमाने तरी कुठे विचार केला होता लग्नाचा! जोडीदार कसा असावा याचा! ती फक्त देहाने जगत होती मन तर केंव्हाच मरून गेलं होतं. ज्या दिवशी तिच्या आणि परागच्या प्रेमाचा शेवट झाला. त्याच दिवशी तिच्या भावनांचा, स्वप्नांचाही  चुराडा झाला होता. पण तिला या सगळ्या नात्यांपासून दूर जायचं होतं. सुटका हवी होती या साऱ्यांपासून.  म्हणून तीही लग्नाला तयार झाली होती.

सीमा आणि उमेशचा विवाह सुनिश्चित झाला.  घरासमोर मांडव सजला. हार फुलांची तोरण चढली. सनई चौघड्याचे स्वर उमटू लागले. दारात रांगोळीची उधळण झाली. सीमा आणि उमेशचा खूप साध्या पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. मोजक्याच पाहुण्यांच्या साक्षीने विधीवत कार्य पार पडलं. सीमा उमेशची धर्मपत्नी झाली. सीमाच्या वडिलांचा एक भार कमी झाला. मुलींना ओझं समजणाऱ्या वडिलांना याचाच आनंद झाला होता. लग्न पार पडलं. जो तो आपापल्या घरी निघून गेले.

सीमाचा गृहप्रवेश झाला. देव दर्शन, पूजा अर्चा सगळे विधी झाले. एवढया मोठ्या कुटुंबाची तिला आधीपासूनच सवय होती. सासू सासरे, चार दिरं, मोठी जाऊबाई, त्यांची दोन मुलं. अगदी गोकुळ. सीमाच्या सासरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. पण गरीब असूनही कसली तक्रार नव्हती. सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते. लग्नाआधी उमेश नोकरी निमित्ताने मोठ्या शहरात असायचा. मोठ्या कष्टाने स्वतः च्या हिमतीने बी.एस. सी. झाला. मोठ्या शहरात येऊन स्वबळावर नोकरी मिळवली.शहरात राहून त्याला बाकी कोणतंही वाईट व्यसन नव्हतं. नोकरी करत असूनही उमेश स्वतःचा स्वयंपाक तो स्वतःच करत होता. आपल्या धाकट्या भावासोबत भाड्याने घर घेऊन राहत होता.  त्याने कधीच वायफळ पैसा खर्च केला नाही, कधी जीवाची चैन केली नाही. गरजेपुरतेच पैसे तो वापरत असे. बाकीचे घरी वडिलांना देत असे. गादीखर्च जायला नको म्हणून तो सायकलवरून कामावर ये जा करत होता. आता सीमाशी लग्न झालं होतं. त्याची काळजी घेणारी, त्याच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालणारी, सुखदुःखात भागीदार असणारी त्याची पत्नी सीमा त्याला मिळाली होती. थोडे दिवस सासूसासरे, दीर जावा यांच्या सोबत राहून आता सीमाही उमेशसोबत शहरात जाणार होती. 

सीमाच्या सासरच्या लोकांनी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा घातली. सीमा आणि उमेश देवदर्शना साठी कुलदेवतेला तुळजाभवानी देवीला साकडं घालून, दर्शन घेऊन आले. पण अचानक उमेश कंपनीतून तातडीचं बोलावण आलं आणि तो एकटाच पुढे निघून आला आणि कामावर रुजू झाला. खरंतर नुकतंच लग्न झालं होतं. अजून सहजीवनाला नीट सुरुवातही झाली नव्हती. उमेशलाही सीमाला आपल्या पत्नीला एकटं सोडून जाणं जीवावर आलं होतं. पण त्याचा नाईलाज झाला आणि तो पुढे येऊन कामावर रुजू झाला.

इकडे मात्र सीमा हळूहळू आपल्या सासरी रुळली. आपल्या गोड स्वभावाने सीमाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती. मुलांची लाडकी काकू झाली होती. एक गुणी सून, लाडकी वहिनी, आणि नवऱ्याची प्रिया झाली. गृहकर्तव्यदक्ष गृहिणी झाली. सीमा आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडत होती. पण अजूनही परागची आठवण येत होती. मनातला पराग अजून डोकावत होता. पण आता सगळं संपलं होतं. त्याचंही लग्न झालं होतं. त्याचा संसार सुरू झाला होता. तिनेही सगळं मागे टाकलं होतं. पण मन अजूनही त्याच्या आठवणीत झुरत होतं. तिने स्वतःची समजूत काढली,

“आता सगळं संपलंय. मला परागला विसरायला हवं. माहीत आहे खूप कठीण आहे पण अशक्य नाही. प्रेमापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ठरतं हेच खरंय. राधेनेही केलाच न संसार..श्रीरंगावर प्रेम असूनही अनय सोबत नातं निभावलंच ना! मलाही तेच करायचं आहे. परागला दिलेलं वचन आयुष्यभर पाळायचं आहे”

सीमाने मनोमन ठरवलं आणि तडजोडीच्या जीवनाला सुरुवात केली. उमेश खूप चांगला मुलगा होता. प्रेमळ नवरा होता. लहानपणापासून भोगलेल्या दुःखाची भरपाई म्हणून की काय परमेश्वराने तिला हे सुख आंदण केलं होतं. सगळे सासरचे लोक उमेश त्याचे इतर नातेवाईक मित्रपरिवार सगळे सीमावर खुश होते. कधी कधी उमेशचं प्रेम पाहून तिलाही गहिवरून यायचं. म्हणतात न..!! सहवासाने प्रेम वाढतं. नातं खुलत जातं अगदी तसंच हळूहळू तिच्या मनानंही उमेशला स्वीकारायला सुरुवात केली होती. जणू काही  उमेश तिला  परागचंच प्रतिबिंब वाटू लागला होता. उमेशबद्दल सीमाच्या मनात प्रेम निर्माण होऊ लागलं. परत नव्याने प्रेमांकुर उमलू लागलं होतं.

काही दिवसांनी उमेशला नोकरीवर रुजू व्हायचं होतं. तो सीमाला घेऊन मोठ्या शहरात आला. भाड्याचं का असेना   सीमाचं ते  नवीन घर तिला मनापासून आवडलं होतं. घरी आल्या आल्या तिने सारं घर स्वच्छ साफ करून नेटनेटकं केलं. सर्व भांडी समान जागच्या जागी लावून घेतलं. देव्हाऱ्यात छान  देव मांडले. सुगंधी फुलांनी सजवले. सायंकाळी दिवा लावला. धूप अगरबत्तीचा घमघमाट घरभर पसरला. नैवेद्य म्हणून गोड शिरा बनवला. रात्रीचं जेवण बनवून घेतलं आणि ती उमेशच्या येण्याची वाट पाहू लागली. रेडिओवर छान जुन्या गाण्यांचा सदा बहार हा कार्यक्रम सुरू होता. सीमाही तिच्या गोड आवाजात गाणं गुणगुणत होती.

नेहमीप्रमाणे ऑफिस सुटल्यावर उमेश घरी जाण्यासाठी निघाला. त्याचे मित्र त्याला चिडवत होते,

“काय मग! आज लवकर निघालास? वहिनी वाट पहात असतील ना. आज काय मज्जा आहे बाबा. रात्र छान रंगणार! दोघेच राजा राणी!” 

सगळेजण त्याची फिरकी घेत होते. उमेशनेही थोडं लाजत तिथून सर्वांचा निरोप घेतला. त्यालाही घरी जाण्याची ओढ लागली होती. लग्न झाल्यापासून ज्या मंतरलेल्या रात्रीची तो वाट पहात होता. ती रात्र, तो गंधाळलेला क्षण आज समीप येणार होता.

उमेश घरी पोहचला. दारात सुबक रांगोळी पाहून तो क्षणभर तेथेच थबकला. किती सुंदर रांगोळी काढली होती. सुरेख रंग भरले होते. क्षणभर वाटलं सीमाच्या येण्याने आपल्यालाही आयुष्यात असेच रंग भरले जातील. आयुष्य समृद्ध होईल. घरात प्रवेश करताच त्याला खूप प्रसन्न वाटलं. किती छान ठेवलं होतं घर!  उमेशची आई नेहमी म्हणायची,

“घरातल्या लक्ष्मीचा हात जिथे जिथे फिरतो तिथे देवी महालक्ष्मीचा वास असतो”

आज उमेशला त्याचा प्रत्येय  येत होता. तो आवरून जेवायला बसला. सीमाने छान ताट बनवलं. इतक्या दिवसानंतर पहिल्यांदाच इतकं साग्रसंगीत मेजवानीचं ताट होतं. भाजी पोळी, वरण भात, पापड लोणचं, गोड शिरा असा छान बेत होता आणि ते दोघेचं. पहील्यांदा ते असे एकतांत भेटत होते. उमेशने सीमाला जेवायला बसायला सांगितलं. ती स्वतः साठी ताट करणार इतक्यात उमेशने तिला अडवत तो म्हणाला,

“एका ताटात जेवूया ना आज”

 या त्याच्या बोलण्यावर सीमा थोडी लाजली. त्याने पहिला घास तिला भरवला. तिच्या मनात आलं,

“किती प्रेम करतो हा माझ्यावर!!”

डोळ्यांत पाणी तरळलं परागशिवाय इतकं प्रेम आजवर तिला कोणी दिलं नव्हतं. तिनेही लाजत त्याला घास भरवला. 

“किती रम्य सोहळा होता तो! “

ते सारे क्षण कवेत घ्यावेत असं सीमाला उगीचच वाटून गेलं आणि ती अजूनच मोहरली. 

दोघांचे जेवण आटोपलं. सगळी कामे उरकून सीमा झोपण्याची तयारी करू लागली. आणि तो क्षण समीप येत होता ज्याची ते वाट पाहत होते. खिडकीतून निळ्या नभात चांदण्याची फुले उमलली छान दिसत होती. आणि तो खट्याळ चांदवा त्यांचा पाठलाग करतोय असा भास होत होता.सीमा उमेशच्या शेजारी पलंगावर येऊन बसली आणि चांदण्यांनी भरलेलं आकाश न्याहाळू लागली. अलगद तिचा हात हातात घेत उमेश म्हणाला,

“सीमा माझ्या आयुष्यात येऊन तू  माझं जीवन समृध्द केलंस. तू खूप आवडतेस मला” 

 लाजून ती म्हणाली,

“ना रंग ना रूप ..!!,का आवडले मी?”

तिला जवळ घेत तिला म्हणाला,

“तुझे विचार, तुझे संस्कार तुझ्या आचरणातून दिसत होतं म्हणून आवडलीस” 

सीमा  लाजली आणि आपल्या दोन्ही हातानी तिने तिचा चेहरा लपवला. उमेश तिच्या जवळ आला अगदी कानाजवळ येऊन कुजबुजला,

“आय लव यु सीमा” 

ती शहारली. त्याने तिच्या भाळवर अलगद चुंबन केलं. तीही त्याच्या बाहुपाशात विसावली. तिच्या नाजूक ओठांच्या पाकळ्यावर आपले ओठ टेकवून उमेशने साखर पेरणी केली. सीमा मोहरली. ती त्याच्यात विरघळून जात होती. तिच्या अंगावरची वस्त्रे तिच्या नकळत दूर होत होती. तिच्या ओठांवर दीर्घ चुंबन घेत त्याने  तिला कवेत घेतलं. श्वासात श्वास मिसळून गेला. तिची काया थरथरली. तिने त्याला घट्ट मिठी मारली. गात्रे सैल झाली. तिने स्वतःला उमेशच्या स्वाधीन केलं. आणि दोन देह एक झाले. जन्माजन्मांतरीचे मिलन झाले. एक तृप्ततेची भावना दोघांच्या चेहऱ्यावर पसरली होती.  तिची रेशमाची मिठी सैल झाली.

आणि सीमा उमेशचा संसार सुरू झाला. राजा राणीचा सुखी संसार. उमेशच्या प्रेमात अगदी नाहून निघाली होती. मोहरून गेली होती.


 

पुढे काय होतं? सीमाच्या आयुष्यात कोणतं नवीन वादळ येतं? पाहूया पुढील भागात.. 

क्रमशः

© ® निशा थोरे..

कथा आवडल्यास नावासकट शेअर करण्यास काहीच हरकत नाही. साहित्यचोरी हा गुन्हा आहे. लेख नावाशिवाय किंवा दुसऱ्या नावाने आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

0

🎭 Series Post

View all