माझं काही चुकलं का?? भाग ४
मागील भागात आपण पाहिले की लग्न झाल्यावर आपला मुलगा दुरावतो का ही भिती शोभाताईंच्या मनात आहे. आता बघू पुढे काय होते ते.
"यायला उशीर केलास ते?" खोलीत मोबाईल बघत बसलेल्या पियुने विचारले.
"अग, मी ना ऐश्वर्या नारकर ते सुकन्या कुलकर्णी.. बदल बघत होतो.." सम्यक बोलला.
"म्हणजे?" परत पापण्यांचे फडफडणे आणि ओठांचे चंबू.. सम्यकची एक्स्प्रेस सुरू झाली.
"अग, ते सातव्या मुलीची सातवी मुलगी आणि रंग माझा वेगळा त्यामध्ये नाही का ती ऐश्वर्या नारकर आणि हर्षदा खानविलकर सतत प्लॅन करत असतात नायिकेला छळण्याचे.. आणि ते सुंदर आमचे घर मध्ये ती सुकन्या कुलकर्णी कशी आदर्श आई असते मुलासाठी हवं ते करणारी.. तेच..." सम्यक पुढे बोलणार तेव्हा अचानक त्याच्या डोक्यात बाबांनी सांगितलेले शब्द घुमू लागले.. 'बायको आणि आई या नात्यांमध्ये काळजी घ्यावी लागते.'
"त्याचं काय झालं?" ओठांच्या चंबूऐवजी कपाळावर आठ्या आल्या. सम्यकने सत्यनारायण देवाचे आभार मानले. बहुतेक त्यांची पूजा केल्यामुळेच असावे त्याला बाबांची वॉर्निंग योग्य त्यावेळी आठवली.
"अग, आत्या आणि आई खाली गप्पा मारत होत्या, त्याही मराठी सिरीयलवर. एका सिरीयलवरून दुसर्या, दुसर्यावरून तिसर्या.. बापरे.. मी बघतच राहिलो."
"हेच ना?" पियुच्या कपाळावरची आठी दिसेनाशी झाली.
"हो ग माझी बाबू." सम्यक लाडात आला.
"अच्छा.. मला वाटलं माझ्याबद्दल काही होतं का.." पियुने खडा टाकून बघितला.
"न्ना.. तुझ्याबद्दल कोण काय बोलेल?"
"मग कोणी काही बोललं तर मला सांगशील?" लाडेलाडे सम्यकच्या गालावर बोट फिरवत पियुने विचारले. लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोने केलेल्या विनंतीला सम्यक नाही कसा म्हणू शकणार होता. त्याने मान हलवून होकार दिला.
"आता कोण काय म्हणतं ते जाऊ दे ना.. आपण या दूधाकडे वळू या का?" हातातल्या दुधाकडे पियुचं लक्ष वेधून घेत सम्यक म्हणाला.
"अय्या.. तू घेऊन आलास? किती छान." पियु प्रेमाने म्हणाली. दोघेही त्या दुधात विरघळलेल्या साखर आणि केशराप्रमाणे एकमेकांत विरघळून गेले.
"काय मग आज एवढं काय स्पेशल?" सकाळपासून स्वयंपाकघरात काम करत असलेल्या शोभाताईंना श्रीकांतरावांनी विचारले.
"विसरलात का? आज सम्यक आणि पियु येणार आहेत ना हनिमूनवरून. म्हणून स्वयंपाक करून ठेवते आहे." शोभाताई कोथिंबीरवडी तळत म्हणाल्या.
"तो हनिमूनवरून येतो आहे , दुष्काळातून नाही. केवढं करून ठेवलं आहेस.. त्या नादात माझा सकाळचा चहाही विसरलीस तू."
"तुम्हाला चहाची पडलीये.. त्या बिचाऱ्याला तिकडे त्याच्या आवडीचे काही मिळालं असेल की नाही याचीच काळजी लागली आहे मला. पंधरा दिवस कसे काढले असतील बिचार्याने?"
"खाऊन पिऊन टुणटुणीत असेल तो. तो काय कुक्कुलं बाळ आहे का जेवणाचे हाल व्हायला? मला तर काळजी वाटते ती त्या पियुची.." श्रीकांतराव म्हणाले.
"तशी थोडी काळजी मलाही वाटते आहे. पण आपला लेक एवढाही आगाऊ नाही. फक्त बोलून जातो बिचारा. त्याच्या मनात तसं काही नसतं." शोभाताई काळजीने म्हणाल्या.
"हा विचार आता तुम्ही करा. पराचा कावळा नका करत जाऊ." श्रीकांतराव समजावणीच्या सुरात म्हणाले. शोभाताई पुढे काही बोलणार तोच सम्यकचा आवाज आला..
"आई, बाबा.. आम्ही आलो." लगेचच शोभाताई भाकरीतुकडा घेऊन बाहेर गेल्या. आणि सम्यकला बघून थबकल्या.
"हा रे काय अवतार?" दृष्ट काढायची सोडून त्यांनी सम्यकला विचारले.
"माचो.. दिसतो ना मी?" सम्यकने अभिमानाने विचारले.
"गचाळ दिसतोस. दाढी का वाढवली?" शोभाताईंने विचारले.
"मीच म्हटलं याला.. तुला दाढी छान दिसेल म्हणून." पियु म्हणाली. तोंड वाकडं करत शोभाताईंनी नव्या जोडप्याला घरात घेतलं.
"आई, मस्त वास येतो आहे.. काय केलं आहेस? तुला सांगतो, बाहेर जायचं म्हणजे तुझ्या हातचं जेवण विसरायचं. खूप भूक लागली आहे ग मला." सम्यक केविलवाणा चेहरा करत म्हणाला.
"सगळं तुझ्या आवडीचं केलं आहे बघ.. पुरी, भाजी, गुलाबजाम, पुलाव, कोथिंबीरवडी.." शोभाताई श्रीकांतरावांकडे बघत म्हणाल्या. त्याचा अर्थ समजून त्यांनी मान डोलावली.
"मी नंतरच जेवेन. रात्रभर प्रवास करून थकले आहे. थोडावेळ आराम करते." पियु आत जात म्हणाली. सम्यक मात्र हातपाय धुवून लगेच जेवायला बसला. त्याला पोटभर जेवताना बघून शोभाताई फुलून आल्या. त्यांनी हळूच विषय काढला..
"सम्यक, आईवर प्रेम आहे ना रे तुझं?"
"मग काय आई.. तुला सांगतो.. आता आम्ही हनिमूनला गेलो होतो, तिथे तर ही पियु मला सतत श्रावणबाळ म्हणत होती." बोलून गेल्यावर सम्यकने जीभ चावली.
"असं म्हणाली का ती? तुझं आईवर प्रेम असेल तर मला सांगत जाशील का ती माझ्यापाठी मला काय म्हणते ते?" शोभाताईंनी अतिप्रेमळ आवाजात विचारले.
समोरच्या स्वादिष्ट आवडत्या जेवणाला स्मरून सम्यकने आईचा हट्ट मान्य केला. एका बाजूला आई तर दुसरीकडे बायको.. दोघीही उत्सुक आहेत आपल्यापाठी काय बोलले जाते हे ऐकण्यासाठी. काय होईल यातून निष्पन्न.. कोण ठरेल सरस आई की बायको? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा