Login

माझं काही चुकलं का? भाग २

कथा एका निष्पाप मुलाची
माझं काही चुकलं का? भाग २

मागील भागात आपण पाहिले की सम्यकच्या तोंडात तीळही भिजत नाही. बघू पुढे काय होते त्याचे ते.


"हा आमचा सम्यक... इंजिनियर आहे. खूप मोठ्या पोस्टवर आहे." आत्या सांगत होती.

"हो.. ते तुम्ही पाठवलेल्या माहितीत होतंच. तुम्हाला मुलीला काही विचारायचे असेल तर विचारा." मुलीचे वडील म्हणाले. सम्यक तोंड उघडणार तोच शोभाताईंनी विचारले,

"स्वयंपाक जमतो का? म्हणजे आजकाल ते स्वीगी, झोमॅटोचं भूत आहे ना.. म्हणून विचारले."

" हो.. अगदी पुरणपोळीपासून सगळं करता येतं आमच्या पियुला.." मुलीची आई ठसक्यात म्हणाली.

"या दोघांना एकमेकांशी काही बोलायचे असेल तर गच्चीवर जाऊ देत का?" बोलणी भलत्याच दिशेने चालली आहेत हे बघून मुलीच्या वडिलांनी विचारले. पण ते ऐकून सम्यकच्या घरातल्यांचे तोंड उतरले.
समयसूचकता दाखवून आत्या म्हणाली,

"म्हणजे काय?? बोलल्याशिवाय का लग्न जुळतात? चला.. आपण गच्चीवर जाऊ." आत्या सम्यकला उठवत म्हणाली.

"अहो पण आत्या.. त्या दोघांना जरा.." मुलीचे बाबा चाचरले.

"त्याचं काय आहे.. आमचा हा सम्यक आहे खूप लाजरा. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडला तर शपथ." आत्या कसनुसं हसत म्हणाली.

"आत्या, मी बोलतो ना.." लाडक्या भाच्याने आत्याला विनवले. भाच्याच्या विनंतीने आत्या विरघळली. पण त्याच्या कानात कुजबुजली,

"मुलगी आवडली असेल तर उपकार कर.. आणि नको ते बोलू नकोस." आत्याची परवानगी घेऊन सम्यक उठला आणि त्याच्या पाठोपाठ पियुही उठली. दोघेही गच्चीवर गेले. तिथे गेल्यावर काय बोलावे, हे सम्यकला सुचत नव्हते. म्हणजे सुचत खूप होते पण ते बोलायचं की नाही माहित नव्हतं. सम्यक बोलत नाही हे बघून पियुने बोलायला सुरुवात केली.

" तुमच्या घरातले तुम्हाला खूप जपतात वाटतं?" तिच्या प्रश्नाने सम्यक खुलला आणि दिलखुलासपणे बोलायला लागला.

"तसं नाही काही.. जपतात म्हणजे त्यांना असं वाटतं मी काही चुकीचं बोललो म्हणजे?"

"चुकीचं?? ते कसं काय बुवा?" ओठांचा चंबू करत, डोळ्यांच्या पापण्यांची फडफड करत पियुने विचारले.. ते बघून सम्यकची गाडी एक्स्प्रेसच्या वेगाने धावू लागली.

" म्हणजे.. आता बघा.. तुमची आई मगाशी म्हणाली ना की तुम्हाला पुरणपोळीपासून सगळा स्वयंपाक येतो. मला ना तेव्हा बोलावंसं वाटत होतं की कटाची आमटी येते का? म्हणजे मस्त मसालेदार आमटी.. साजूक तूप सोडून केलेली खमंग गोड पुरणपोळी. आहाहा.. स्वर्गसुख.." सम्यक पुरणपोळीत घुसला होता.

"त्यासोबत भजी, कुरडई चालेल का?" पियुने हसत विचारले.

"चालेल? धावेल.. तुम्ही कराल हे माझ्यासाठी? माझी ना एकच इच्छा होती.. म्हणजे आहे.. मी थकूनभागून कामावरून आलो आहे. मी बेल वाजवतो. माझी बायको हसतमुखाने दरवाजा उघडते. मग ती मला गरमागरम चहानाश्ता देते.. आणि मग आम्ही.." बोलता बोलता सम्यक थांबला. त्याने समोर बघितले तर पियु पोट धरून हसत होती.

"काय झाले?" त्याने तोंड पाडून विचारले.

"कोणत्या जगात आहात तुम्ही? तुम्ही कामाला जाणार आणि बायको घरी राहणार? की बायकोने कामालाही जायचे आणि असा चहानाश्ता तयार ठेवायचा तुमच्यासाठी?"

"तो विचारच केला नाही." सम्यकचा पडलेला चेहरा अजून वर झाला नव्हता. हे ही लग्न मोडलं असं समजून तो गप्प झाला.

"मला आवडलात तुम्ही.." सम्यकच्या कानावर शब्द आले.

"काय?" त्याचा विश्वास बसत नव्हता.

"हो.. मला आवडलात तुम्ही. तुमचं निष्पाप मन.. मी काही जास्त स्थळं बघितली नाहीत. पण जी बघितली ती सगळी फार एकसुरी वाटली. त्या सगळ्यांमध्ये तुम्ही वेगळे वाटलात मला." पियु बोलत होती आणि सम्यकला इथे जोरजोरात ओरडून म्हणावेसे वाटत होते..

"पटली रे पटली.. पोरगी पटली."

दोघांचाही होकार येताच आत्याने आग्रह करून लगेचच साक्षगंधाचा कार्यक्रम उरकून घेतला. देणेघेणे, मानपान याची काही अपेक्षा नव्हतीच. थोडक्यात आणि झटपट लग्न उरकायचे हाच विचार डोक्यात होता. त्याप्रमाणेच तयारी सुरूही झाली. आता तुम्ही म्हणाल की बघण्याचा कार्यक्रम झाला काय आणि लग्न झालेसुद्धा? त्याचं काय आहे.. सम्यकची खरी गोष्ट लग्नानंतर सुरू होणार आहे. पियुला निष्पाप वाटणारा नवरा लग्नानंतर सुद्धा निष्पाप वाटेल का, बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all