माझं काही चुकलं का?? भाग ३
मागील भागात आपण पाहिले की शेवटी एकदाचे सम्यकचे लग्न होते. आता बघू पुढे काय होते ते.
"शेवटी एकदाचे सम्यकचे घोडे गंगेत न्हाले." पदराने घाम पुसत आत्या म्हणाली.
"हो ना.. मलातर सप्तपदी होई होईपर्यंत भिती होती, हा काही पचकेल की काय? पण नाही.. आज पूजा पार पाडली आणि सुटल्याची फिलिंग आली." श्रीकांतराव बहिणीशेजारी बसत म्हणाले.
"हो रे.. एवढा गुणाचा पोर तो.. फक्त कुठे काय बोलायचे तेवढं समजत नाही." आत्या परत लाडक्या भाच्याची बाजू घेत म्हणाली.
"असं काही नाही हं आत्या.." बडीशेप द्यायला आलेला सम्यक आत्याला म्हणाला, "तू त्यादिवशी आईला भटकभवानी म्हणालीस.. विचार मी आईला सांगितले तरी का? विचारतेस का?" ते ऐकून श्रीकांतरावांनी सम्यकच्या तोंडावर हात ठेवला.
"हळू बोल ना घोड्या.. आत्ताच तुझं कौतुक केलं ना आत्याने?"
"अंअंअंअं..." सम्यक बोलायचा प्रयत्न करत होता.
"अरे सम्यक.. बडीशेप द्यायला आलास ते इथेच रमलास." शोभाताई बाहेर आल्या आणि पटकन थबकल्या. श्रीकांतरावांनी सम्यकच्या तोंडावर हात ठेवला होता आणि तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता.
"काय हे? अहो लग्न झालं आता त्याचं. तोंड का धरताय त्याचं असं? सूनबाई काय म्हणेल?" शोभाताई श्रीकांतरावांना दटावत म्हणाल्या.
"त्याला बोलू दिलं तर त्याच्या पूजेच्या दिवशी माझे लग्न मोडेल." श्रीकांतराव पुटपुटले.
"काय म्हणालात?" डोळे वटारत शोभाताईंनी विचारले.
"सूनबाई कुठे दिसत नाही ती?" भाच्यानंतर भावाला वाचवायला उमाताई परत मध्ये आल्या.
"ती तिच्या खोलीत आहे." शोभाताई उत्तरल्या.
"काय बाई या आजकालच्या मुली पण. म्हणजे आपण कसं सासरी जाताना पाठराखीणीशिवाय जात नव्हतो. पण ही बरी एकटी आली. आज आईबाबा निघाले तर डोळ्यात पाण्याचा टिपूस देखील नाही. आमच्या वेळेस असं नव्हतं. मी तर किती रडले होते.. बाई बाई.." उमाताई म्हणाल्या.
"हो ना.. भाऊजी तर म्हणाले होते की हिला आज राहू देत इकडेच. रडणं थांबलं की पाठवून द्या." श्रीकांतराव म्हणाले.
"काहीही.. मेल्या तू तर हसत होतास खिदीखिदी. मी जात असताना. पण आता विषय सूनबाईचा आहे.. आपला नाही." आत्याने मूळ मुद्दा सोडला नाही.
"हो ना.. मलाही आश्चर्यच वाटलं. पण आपण कसं बोलणार ना?" शोभाताई सुरू झाल्या. मुंबईच्या दिशेने येत असणारे वादळ गुजरातच्या दिशेला जाताना बघून मुंबईकर सोडतात तसा सुस्कारा श्रीकांतराव सोडणार तोच या दोघींचे बोलणे तन्मयतेने ऐकणारा सम्यक त्यांना दिसला.. आणि सुस्कारा परत आत गेला. पुढे येऊ शकणार्या चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन ते मध्ये पडले.
"काही म्हणा पण आपली सूनबाई एक्स्पर्ट आहे बाकी?" श्रीकांतराव म्हणाले.
"म्हणजे?" घरातल्या दोन बायकांनी पटकन त्यांच्याकडे बघितले.
"म्हणजे.. आता बघा ना.. एवढी शिकली आहे तरी पुरणपोळीपासून सगळा स्वयंपाक येतो." श्रीकांतराव सम्यककडे खूण करत म्हणाले. पण शोभाताईंनी त्या खुणेचा अर्थ वेगळाच घेतला. त्या सम्यकच्या जवळ गेल्या आणि त्याला मिठीत घेऊन रडू लागल्या.
"अग ए शोभा, तुझ्या मुलाचं लग्न झालं आहे. मुलीचं नाही." उमाताई दटावत म्हणाल्या.
"हो ताई.. पण आता माझा मुलगा मला दुरावलाच ना? मुलगी काय राजरोसपणे सासरी जाते. पण मुलं.. ही मुलं मात्र डोळ्यासमोर राहून परकी होतात. आता उद्यापासून याला आईच्या हातचा नाही बायकोच्या हातचा चहा लागेल. त्याची सकाळ आई आई करून नाही तर पियु पियु करून होईल.." शोभाताई बोलत होत्या.
"हेच होतं ग.. अगदी हेच होतं." उमाताई शोभाताईंची समजूत काढत म्हणाल्या. इतका वेळ हर्षदा खानविलकर आणि ऐश्वर्या नारकरसारख्या खाष्ट सासू होऊन नवीन मुलींच्या विरूद्ध बोलणार्या या बायका अचानक सुकन्या कुलकर्णीसारख्या सोशीक होऊन रडायला का लागल्या याचे गूढ न समजल्याने सम्यक विचारात पडला.
"तुम्ही इथे हा अश्रुपात करणार की सम्यकला वर जाऊ देणार?" श्रीकांतराव वैतागत म्हणाले.
"अरे हो.. असं कसं नाही जाऊ देणार? सगळी तयारी केली आहे म्हटलं. तेच सांगायला आले होते आणि इथे गप्पा मारत बसले. सम्यक आत दुधाचा पेला ठेवला आहे. घेऊन जा हो.." शोभाताई डोळे पुसत म्हणाल्या. दुधाचा पेला, पहिली रात्र म्हणताच सम्यकचे डोळे चमकले.
पार पडेल का सुरळित सम्यकची पहिली रात्र? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा