माझं काही चुकलं का??
" सम्यक, आज आत्या येणार आहे. तोंड उचकटून काही बोललास ना तर बघ. माझ्यासारखी वाईट कोणी नाही." शोभाताईंनी चहाचा कप देता देता सम्यकला दमही दिला.
" काय ते लेकराला बोलते आहेस असं घालूनपाडून.. चेहरा बघ किती उतरला आहे बिचार्याचा." श्रीकांतराव लेकाची बाजू घेत बोलले.
" लेकरू??? वेळेत लग्न झालं असतं तर आतापर्यंत चारचार लेकरांचा बाप झाला असता. लेकरू म्हणे." शोभाताई तणतणल्या.
" बाप होण्यासाठी आधी लग्न तर होऊ दे." सम्यक लाजत म्हणाला.
" लग्न.. आणि तुझं? कधी ठरेल ते परमेश्वरालाच ठाऊक." आकाशाकडे हात जोडत शोभाताई म्हणाल्या.
" एक मिनिट.. या सगळ्याचा आणि उमाताईचा काय संबंध आहे?" काहीच न समजून श्रीकांतरावांनी विचारले.
" घ्या.. अख्ख रामायण झालं आणि विचारत आहेत रामाची सीता कोण?" शोभाताईंनी डोक्यावर हात मारला.
" बरं.. आता तरी सांग. कोण होती रामाची सीता ते." श्रीकांतराव हसत म्हणाले.
" तुमची बहिण गेले चार महिने बोलत नव्हती.. ते आठवतं का?" शोभाताईंनी विचारलं.
" कसं विसरीन? किती मनधरणी करावी लागली होती मला तिची. त्याचे काय इथे?"
" हा तुमचा लेक तिला ढालगज भवानी म्हणाला होता." शोभाताईंनी सांगताच श्रीकांतरावांच्या तोंडातून चहाचा फवारा उडाला.
" काय?? आणि तू हे मला आता सांगतेस?" रागाने श्रीकांतराव म्हणाले.
"तेव्हा कसं सांगणार होते? आधीच वन्स चिडल्या होत्या. त्यात तुमची भर कश्याला?"
" ताई पण काही बोलली नाही."
" कशी बोलणार? लाडक्या भाच्याने शपथ घातली होती ना? निघाले मग वड्याचे तेल वांग्यावर. विनाकारण आपल्याशी अबोला धरला त्यांनी." शोभाताई सम्यककडे बघून रागाने बोलल्या.
" मग आज अचानक कशी येते आहे ?"
" एक स्थळ आहे त्यांच्याकडे. त्याची माहिती घेऊन येणार आहेत. म्हणूनच याला म्हटलं की तोंड बंद ठेव म्हणून."
" बाबा.. तुम्हाला वाटतं का माझं चुकलं?" आत गेलेल्या आईला बघून सम्यकने विचारले.
" तू ताईला ढालगज का म्हणालास?"
" त्याचं काय झालं बाबा.." उत्साहाने सम्यक बोलायला पुढे झाला. " त्या दिवशी आई आणि मावशी बोलत होत्या. तेव्हा आई म्हणाली, आमच्या घरीपण आहे एक ढालगज भवानी. त्यानंतर लगेचच दुसऱ्या की तिसर्या दिवशी आत्या आली होती. मग मी विचारले तिला, की बाई ढालगज भवानीसारखं वागणं म्हणजे नक्की कसं वागणं? तर हा प्रश्न विचारताच आईच्या चेहर्यावरचा रंग उडाला आणि आत्याचा रंग लाल झाला. मला सांगा यात माझं काही चुकलं का?" एवढंसं तोंड करून सम्यकने विचारले. श्रीकांतरावांना कसंतरीच वाटलं. त्यांनी त्याला जवळ घेतलं..
" बाळा, मला माहिती आहे लहानपणापासूनच तुझ्या पोटात काही रहात नाही. इकडचं ऐकलं की ते तिथे कधी बोलतो असं तुला होते. पण राजा तुझ्या या स्वभावामुळेच तुझे लग्न जुळत नाहीये हे कसं विसरतोस? आणि लग्नानंतर आई आणि बायको, बहिण आणि बायको या नात्यांमध्ये जरा जास्तच काळजी घ्यावी लागते रे. मला ना तुझं लग्न झाल्यावर काय होईल याचं आत्तापासूनच टेन्शन यायला लागले आहे." श्रीकांतराव म्हणाले.
"काहिही हं बाबा.. मी अजिबात काहीच बोलणार नाही. आणि चुकलं तरी सांभाळून घ्यायला तुम्ही आहातच ना?" बाबांना मस्का मारत सम्यक म्हणाला.
पोटात काहीच न राहणाऱ्या सम्यकचे लग्न ठरेल का? आणि झालं तर सगळं सुरळीत होईल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा