Login

माझा आवाज -५ (भाग अंतिम)

माझा आवाज.. कथा एका न उमजलेल्या बाजूची.. तिच्या आवाजाची..

जलदकथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय:- तिची बाजू
कथेचे शीर्षक - माझा आवाज - ५ ( अंतिम)

“डॉ. अवंती करंदीकर, तुम्हाला काही सांगायचं आहे का?”

न्यायाधीशांनी तिच्याकडे नजर वळवत विचारलं तसं अवंती भानावर आली. भूतकाळाच्या गर्तेत अडकलेलं मन पुन्हा वर्तमानात आलं. आज पहिल्यांदाच तिला स्वतःची बाजू मांडायची संधी मिळाली होती.

“आज मी गप्प बसले, तर उद्या माझ्या रुग्णांना काय सांगणार? माझ्या मुलाला काय शिकवणार?”

तो क्षण अवंतीसाठी न्यायालयातल्या न्यायाचा नव्हता, तर स्वतःच्या स्वाभिमानाचा होता. एक स्त्री म्हणून असलेल्या न्यायाचा होता. क्षणभर तिने ओठ घट्ट मिटले. समोर बसलेला तो पुरुष म्हणजे आशुतोष, बाहेर उभा असलेला मिडिया, आणि घरी आईकडे असलेला तिचा चिमुकला अर्थव सगळ्यांची चित्रं तिच्या डोळ्यांसमोर तरळून गेली. तिने पाण्याच्या बॉटलमधून थोडसं पाणी प्यायलं आणि बोलण्यासाठी ती पिंजऱ्यात येऊन उभी राहिली. बाहेर, कोर्टाच्या भिंतीआड मिडियाचा गोंगाट वाट पाहत होता. पण अवंतीला पहिल्यांदाच त्याची भीती वाटत नव्हती. दिव्याने तिला शांतपणे विचारलं,

“तुम्ही घाबरल्या आहात?”

“नाही मी मुळीच घाबरलेली नाही. खरंतर मी दुखावलेली आहे. आणि दुखावलेली माणसं गप्प बसली तर अन्याय अजूनच वाढतो.”

“माय लॉर्ड..”

अवंतीने बोलायला सुरुवात केली. कोर्टरूममधली कुजबुज थांबली.

“मी आज इथे कुणाला दोषी ठरवायला उभी नाही. मी फक्त माझा अनुभव सांगायला उभी आहे. जजसाहेब, मी अवंती करंदीकर, लग्नानंतर अवंती देशमुख झाले. लग्नानंतर पहिल्या काही वर्षांत माझ्या कामाचं कौतुक झालं होतं; पण हळूहळू ‘तुला सगळ्यांचं समजतं, पण घरच्यांना वेळ देता येत नाही.’ ‘इतक्या बाहेरच्या स्त्रियांना ऐकतेस मग घरातलं का ऐकत नाहीस?’ अशी दूषणं मिळू लागली. तेंव्हापण मी स्वतःलाच दोष द्यायला लागले. कदाचित मीच कमी पडतेय असं वाटू लागलं. मग मला मुलगा झाला, तेंव्हा मीडियाने अभिनंदन केलं; पण घरात माझं अस्तित्व आईपुरतं मर्यादित झालं. मी कधी रात्री उशिरा कामावरून आले की, माझ्या थकव्याला किंमत नव्हती कारण प्रतिष्ठित स्त्रिया थकत नाहीत असं समाजाला वाटायला लागतं.”

अवंती क्षणभर थांबली आणि सर्वत्र एक नजर फिरवली. सर्वजण शांतपणे तिचं बोलणं ऐकत होते.

“मी प्रतिष्ठित, सुप्रसिद्ध, पुरस्कार विजेती समुपदेशक आहे, हो.. पण त्याआधी मी एक माणूस आहे. मी आई आहे, बायको आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी स्वतःची ओळख असलेली स्त्री आहे. लोक म्हणतात, इतकी समजूतदार स्त्री, इतकं ज्ञान असलेली व्यक्ती, मग घर कसं तुटलं? कारण ज्ञान असूनही प्रेमात माणूस गप्प बसतो.. सहन करतो. जजसाहेब, आशुतोष मला कधीच मारहाण करत नव्हता म्हणूनच कुणालाच त्याच्याबद्दल संशय आला नव्हता; पण रोज कमी लेखणं, माझ्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह, आणि माझ्या मौनाची शिक्षा हे सगळं कुठे मोजायचं? मी एका टप्प्यावर समुपदेशक राहिले नाही, मी स्वतःची पेशंट झाले.”

ती स्पष्ट बोलत होती. कोर्टात शांतता पसरली. एक प्रतिष्ठित स्त्री कमकुवत असल्याचं कबूल करतेय? हे मीडियाला हे अपेक्षित नव्हतं. ती पुढे म्हणाली,

“महोदय, माझ्या कामामुळे मला माझ्या नवऱ्याने संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं. माझ्या शांततेचा गैरफायदा घेतला आणि जेव्हा मी आवाज उठवला, तेव्हा तो आवाज दाबण्यासाठी त्याने माझ्यावर हात उचलला. आज मी इथे माझ्या नवऱ्याविरुद्ध उभी राहिलेली नाही. मी त्या विचारसरणी विरुद्ध उभी आहे, जिथे स्त्रीने सगळं सहन करायचं, गप्प बसायचं, आणि मातृत्वाच्या नावाखाली स्वतःला विसरायचं हे ठरवूनच टाकलं आहे. आजवर वर्षानुवर्षं मी समुपदेशक म्हणून लोकांना सांगत आले हिंसा फक्त हाताने होत नाही. शब्दांनी होते, दुर्लक्षाने होते; पण जेव्हा तीच गोष्ट माझ्या आयुष्यात घडू लागली, तेव्हा थोडं अजून सहन कर… तू समजूतदार आहेस असं मी स्वतःलाच सतत समजावत राहिले. लोकांनी मला विचारलं,

“माझ्याकडे सगळं होतं तरीही मी घर का सोडलं? कशाची कमतरता होती?’ साहेब, त्या सर्वांना मला हेच सांगायचंय की, सगळं असूनही माझ्याकडे माझी स्वतःची बाजू ऐकून घेणारं कोणीच नव्हतं.”

तिचा आवाज थरथरत होता; पण ठामपणे ती तिचं म्हणणं मांडत होती. समोरच्या बाकावर बसलेला आशुतोष अस्वस्थ होत होता. ती पुढे म्हणाली,

“आज मिडिया मला आई म्हणून अपयशी ठरवत आहे. पण माझ्या मुलाने रोज भीतीत वाढावं, वडिलांचा राग पाहत झोपावं, हे मी कसं मान्य करू? हो, मी घर सोडलं. परिस्थितीला घाबरून पळून जाण्यासाठी नाही तर माझ्या मुलाला आणि स्वतःला त्या मागास विचारसरणीपासून वाचवण्यासाठी आणि माझ्या मुलाने आई म्हणून मला हरवलेलं पाहू नये असं मला वाटलं म्हणून मी तिथून बाहेर पडले.”

न्यायाधीशांनी तिच्याकडे रोखून पाहिलं. अवंतीला जाणवलं, आज पहिल्यांदाच तिचा आवाज कुणीतरी ऐकत होतं. तिच्या डोळ्यांसमोर अर्थवचा गोंडस चेहरा आला.

“मी हरले तरी चालेल, पण माझ्या मुलाने त्याच्या वडिलांनी आरडाओरडा केला आणि त्यावेळी आई गप्पं राहिली म्हणजे ते सगळं बरोबर होतं आणि आई चुकीची होती असा विचार करत कधीच मोठं होऊ नये.”

अवंती मनातल्या मनात म्हणाली. तिने नजर वर करून पाहिलं. कोर्टात शांतता पसरली.

“महोदय, एक शेवटचंच मला सांगायचंय, हा लढा अजूनही संपलेला नाहीये; पण एक गोष्ट मात्र नक्की की, आता माझा आवाज कोणीच दाबू शकत नाही. जजसाहेब, आज मीडिया इथे आहे कारण मी ओळखीची, एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे; पण उद्या जेव्हा एक सामान्य, नाव नसलेली स्त्री अशाच नात्यात अडकते, तेव्हा तिची दुसरी बाजू कोण ऐकणार? तिला न्याय कसा मिळणार?”

तिच्या प्रश्नाने कोर्टात ती केस ऐकणारे सर्वजण भारावून गेले होते. दुपारपर्यंत निर्णय राखून ठेवण्यात आला. बाहेर पत्रकार पुन्हा जमले. आता त्यांचे प्रश्न बदलले होते.

“तुम्ही इतकी वर्षं गप्पं का होता?”

तेंव्हा अवंतीने उत्तर दिलं.

“कारण प्रतिष्ठा वाचवताना मी स्वतःला हरवत गेले होते. आपलीही एक बाजू आहे हे विसरूनच गेले होते.”

क्षणभर ती थांबली. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशमध्ये तिच्या डोळ्यांतली ओल चमकून गेली; पण त्या ओलपलीकडे एक विचित्र शांतता होती, तिच्या निर्णयाची, तिच्या स्वीकाराची..

“आज मी बोलतेय, कारण उद्या कुणीतरी बोलायचं धाडस करावं. मी गप्प राहिले म्हणून माझ्या वेदना कमी झाल्या नाहीत; उलट त्या वाढत गेल्या. आज मी माझ्यासाठी बोलतेय; पण हे बोलणं फक्त माझ्यासाठी नाहीये.”

पत्रकारांना पुढचा प्रश्न विचारायची संधीच मिळाली नाही. अवंतीने माईक बाजूला केला आणि आत परत निघाली. कोर्टाच्या पायऱ्या उतरतानाच तिला जाणवलं, आज ती केस जिंकली की हरली, हे निकाल सांगेल; पण स्वतःच्या नजरेत ती आज नक्कीच जिंकली होती. आईकडे असलेल्या अर्थवचा विचार तिच्या मनात आला. पहिल्यांदाच तिच्या मनात अपराधीपणाची भावना नव्हती, उलट आपल्या मुलासाठी आपण चुकीचं उदाहरण ठरत नाहीये याचं एक ठाम समाधान होतं. कोर्टाच्या भिंतीआड अजूनही गोंगाट होता, वाद होते, चर्चाही होणार होत्या; पण अवंतीसाठी तो दिवस एका शांत निष्कर्षावर येऊन संपला होता.

“आवाज मिळवणं म्हणजे वाद नाही. स्वतःचं अस्तित्व मान्य करणं म्हणजे बंड नाही आणि सहनशीलतेचं ओझं झुगारून देणं म्हणजे अपयश नाही. आज नाही तर उद्या पण आता माझा आवाज माझ्याच सोबत कायम असणार आहे.”

ती स्वतःशी पुटपुटली. तिच्या डोळ्यांत एक प्रकारचं समाधान होतं. दुपारनंतर कोर्टरूम पुन्हा भरू लागली. आधीचा गोंगाट आता दबक्या आवाजातल्या कुजबुजीत बदलला होता. सगळ्यांच्या नजरा न्यायाधीशांच्या आसनावर खिळल्या होत्या. अवंती शांतपणे आपल्या जागेवर येऊन बसली होती. आता तिच्या हातातल्या फाईलपेक्षा तिचं मन हलकं होतं कारण जे सांगायचं होतं, ते सांगून झालं होतं. न्यायाधीश आत येऊन त्यांच्या खुर्चीत बसले आणि न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली. क्षणभर त्यांनी समोरच्या कागदांकडे पाहिलं. मग थेट अवंतीकडे नजर वळवली. त्या नजरेत चौकशी नव्हती, सहानुभूती नव्हती; फक्त तिला समजून घेतल्याची जबाबदारी होती. त्यांनी बोलायला सुरुवात केली,

“ही केस फक्त कौटुंबिक वादाची नाही. ही केस घराच्या चार भिंतीत न दिसणाऱ्या हिंसेची होती.”

कोर्टरूममध्ये शांतता पसरली.

“हिंसा म्हणजे फक्त शारीरिक मारहाण, असा समज आपण अनेक वर्षं करत आलो आहोत पण सातत्याने कमी लेखणं, संशयाच्या नजरेने पाहणं हे सगळं मानसिक हिंसेचेच प्रकार आहेत आणि ते सिद्ध करायला जखमा लागत नाहीत; तर मनावर दिसणारे परिणाम लागतात.”

आशुतोष अस्वस्थ झाला. त्याचे वकील काही बोलायला उठले पण न्यायाधीशांनी हातानेच थांबवलं.

“डॉ. अवंती करंदीकर यांनी इथे स्वतःला पीडित म्हणून नव्हे, तर एक जागरूक नागरिक म्हणून उभं केलं आहे. त्यांच्या साक्षीत कोणतीच विसंगती नाही, अभिनय नाही फक्त दीर्घकाळ चाललेला मानसिक थकवा जाणवतो आहे. या न्यायालयाचं असं स्पष्ट मत आहे की, केवळ ‘प्रतिष्ठित कुटुंब’, ‘यशस्वी पती’ किंवा ‘बाहेरून सुखी दिसणारं संसार’ या कारणांवर कुठल्याही स्त्रीकडून सहनशीलतेची अपेक्षा करता येणार नाही.”

अवंतीचे हात नकळत एकमेकांत गुंफले गेले. तिच्या डोळ्यांत पाणी होतं, पण ते आज वेदनेचं नव्हतं. न्यायाधीश पुढे म्हणाले,

“सध्याच्या परिस्थितीत, मुलाच्या मानसिक सुरक्षिततेला प्राधान्य देणं आवश्यक आहे. त्यामुळे अर्थवचा प्राथमिक ताबा आईकडे देण्यात येत आहे. वडिलांना नियमानुसार भेटीचा अधिकार राहील; पण समुपदेशन बंधनकारक असेल.”

कोर्टरूममध्ये कुजबुज उसळली.

“आणखी एक महत्त्वाची बाब, ही केस समाजाला एक संदेश देणारी आहे. गप्प बसणं ही ताकद नसते; ती अनेकदा परिस्थितीने लादलेली भीती असते.”

न्यायाधीशांनी आवाज थोडा कठोर केला आणि ते थेट अवंतीकडे पाहून म्हणाले,

“डॉ. करंदीकर, न्यायालय तुमच्या निर्णयाशी सहमत आहे, ‘घर सोडणं हे पळून जाणं नव्हतं, तर स्वतःला आणि मुलाला वाचवण्यासाठी घेतलेलं पाऊल होतं. अंतिम निर्णय दुपारनंतर लिखित स्वरूपात दिला जाईल; पण आज इतकंच स्पष्ट आहे, ही स्त्री इथे हारलेली नाही.”

क्षणभरासाठी अवंतीला श्वास घ्यायला विसरल्यासारखं वाटलं. हे शब्द केवळ निर्णय नव्हते; ते तिच्या वर्षानुवर्षांच्या अपराधीपणाच्या भावनेला दिलेलं उत्तर होतं.

जजसाहेब जागेवरून उठले त्याचबरोबर अवंतीसह त्या खोलीतली सर्व माणसं उठून उभी राहिली आणि न्यायाधीश महोदय गेल्यानंतर एकेक करत सर्वजण बाहेर पडली. अवंती क्षणभर तशीच बसून राहिली. डोळ्यांतून पाणी वाहत होतं. दिव्याने अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवला.

“अभिनंदन मॅडम.. तुम्ही जिंकलात. तुम्हाला न्याय मिळाला.”
अवंतीने किंचित हसून पाहिलं आणि म्हणाली,

“दिव्या मॅडम, न्याय मिळाला म्हणजे सगळं ठीक झालं असं नाही तर न्याय मिळवणं म्हणजे आता गप्प राहायची गरज नाही, बोलण्याची, स्वतःचं मत मांडण्याची आहे.”

दिव्याने हसून मान डोलावली. आज पहिल्यांदाच अवंतीला कोर्टाच्या त्या दरवाजातून बाहेर पडताना मनावर कसलाच भार नव्हता. एकदम मनामनाचं ओझं उतरलं होतं. समोर मिडिया होता, पत्रकार होते आणि आज सर्वांना तिची कोणाला न कळलेली बाजू समजली होती.

समाप्त.
© निशा थोरे (अनुप्रिया)