जलदकथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय:- तिची बाजू
कथेचे शीर्षक - माझा आवाज - ३
विषय:- तिची बाजू
कथेचे शीर्षक - माझा आवाज - ३
तिच्या मनात उठलेलं प्रश्नांचं वादळ तिला शांत बसू देत नव्हतं. आणि एक दिवस तिच्या अस्मितेला धक्का देणारी एक घटना घडली.
तो रविवारचा दिवस होता. सासूबाईंनी त्यांच्या माहेरच्या लोकांना घरी आमंत्रित केलं होतं. नातेवाईक, ओळखीची मंडळी घरात पाहुण्यांची अगदी वर्दळ होती. चहाच्या कपांबरोबर सर्वांचं हसणं-खिदळणंही सुरू होतं. अवंती सकाळपासून स्वयंपाकघरात राबत होती. बाहेरच्या खोलीत नेहमीप्रमाणे तिच्या नावाचं कौतुक सुरू होतं.
“टीव्हीवर काल वहिनी दिसल्या होत्या हं! खूप छान बोलतात. त्यांचं बोलणं खरंच खूप प्रभावी आहे बरं.. खूप मोठ्या प्रवक्त्या आहेत आपल्या वहिनी..”
अवंतीला क्षणभर हायसं वाटलं; पण तो आनंद फार काळ टिकला नाही. तिच्या चेहऱ्यावरचं समाधान दुसऱ्या क्षणाला मावळलं. अवंती सर्वांना चहा देत असताना सासूबाईंनी खसकन तिच्या हातातून ट्रे खेचून घेतला आणि हसत हसत पण सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजातच म्हणाल्या,
“अगं अवंती, हे सगळं नंतर कर. आधी इथे आमच्याबरोबर येऊन बस बरं.. पाहुण्यांसमोर उगाच धावपळ कशाला? लोकांना वाटेल, आम्ही तुला विनाकारणच कामाला जुंपलंय..”
खोलीत हशा पिकल्या. अवंती जागीच स्तब्ध उभी राहिली. त्यांच्या त्या वाक्यात उपकाराची भावना होती आणि त्याचबरोबर त्या तिला अपमानित करत होत्या. गोड बोलून टोमणे मारण्याचा कार्यक्रम सुरू होता. कोणीतरी लगेच पुढचं वाक्य जोडलं,
“हो ना, एवढी मोठी समुपदेशक आहे ती.. घरकामासाठी थोडीच जन्माला आलीय?”
तो टोमणा हसण्यात मिसळला. पण अवंतीच्या मनाला मात्र चटका लावून गेला. तिचे डोळे पाण्याने गच्च भरले. काहीच न बोलता अवंती पटकन आतल्या खोलीत आली आणि तिने धाडकन खोलीचं दार लावून घेतलं. तिचा श्वास थोडा वाढला होता. हातपाय थरथरत होते. डोळ्यांतून उष्ण धारा वाहू लागल्या.
“मी नेमकी कोण आहे इथे? सून? शोभेची वस्तू? की कौतुकासाठी ठेवलेली बाहुली?”
इतक्यात बाहेरून सासूबाईंचा आवाज आला,
“अहो, जाऊ द्या हो.. तिला चेष्टा मस्करीची सवय नाहीये. तिच्या आईवडिलांनी तिला फार लाडात वाढवलीये.”
ते वाक्य तिच्या थेट काळजात एखाद्या बाणाप्रमाणे घुसलं.
“म्हणजे एवढं सगळं करून पुन्हा मीच दोषी? माझ्या सोबत माझ्या आईवडिलांना सुद्धा दूषणं लावत आहेत.”
अवंतीला खूप वाईट वाटत होतं. आशुतोष तिथेच होता; पण तो काहीच बोलला नाही. आणि तेच अवंतीला जास्त बोचत होतं. पहिल्यांदाच अवंतीला जाणवलं,
इथे प्रश्न तिच्या कामाचा नव्हता. इथे प्रश्न तिच्या मर्यादांचा होता. ज्या मर्यादा अजून तिने स्वतःच आखल्या नव्हत्या. संध्याकाळी पाहुणे गेले. घर पुन्हा शांत झालं. अवंती स्वयंपाकघरात उभी राहिली. भांडी धुताना तिच्या डोळ्यांत पाणी येत होतं. डोळ्यांतली आसवं तिच्या अपमानाची होती. आणि त्या अपमानातून काहीतरी ठाम, काहीतरी नवं आकार घेत होतं.
“आज मी जर अपमान सहन करत मूग गिळून गप्पं राहिले तर उद्याही मला असंच अपमान, अवहेलना सहन करत मूग गिळून गप्पं बसावं लागेल.”
अवंती शांत होती पण तिची ही शांतता येणाऱ्या वादळापूर्वीची होती आणि अशी शांतता वादापेक्षा जास्त धोकादायक असते हे तिथे कुणालाच कळत नव्हतं.
दिवस सरत होते. तडजोडीचं आयुष्य जगता जगता अवंती दिवसेंदिवस अबोल होऊ लागली होती. माहेरी ती हे सगळं सांगू शकली असती आणि कदाचित आईवडिलांनी तिला अंतरही दिलं नसतं; पण तिनेच तिच्या नात्याला वेळ द्यायचं ठरवलं होतं. आज ना उद्या आशुतोषला सत्य समजेल, तो तिला आणि तिच्या कामाला समजून घेईल, त्याच्या बायकोला घरात आणि घराबाहेर दोन्ही गोष्टी सांभाळताना तिची तारेवरची कसरत होतेय हे त्याच्या लक्षात येईल असं तिला वाटलं होतं. त्याच्यासाठी आई आणि बायको दोन्ही नाती जरी महत्वाची असली तरी जे चुकीचं आहे ते तो विचारपूर्वक पाहील. तो त्याच्या आईला समजावून सांगेल पण तसं कधीच घडलं नाही आशुतोष तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होता. तिची बाजू समजून न घेता तिच्यावरच डाफरायचा. तिच्यावरच ओरडत रहायचा. या सगळ्या गोष्टींना अवंती फार कंटाळली होती.
आणि एक दिवस रखरखीत उन्हात पावसाची एक सर यावी आणि तृषार्त मनाला थंडावा मिळावा अशी एक बातमी अवंतीला समजली. ती आई होणार होती. एक नवीन पाहुणा तिच्या आयुष्यात येणार होता. अवंती खूप आनंदून गेली. त्या चिमुकल्याच्या येण्याने तरी दिवस बदलतील असं तिला वाटलं आणि काही अंशी तसं झालंही.. अथर्वच्या जन्माने घरात आनंदाचं वादळ आलं. पहिला नातू, पहिला वारस झाला. देशमुख घराण्यात उत्साहाला उधाण आलं. अवंतीच्या अंगाखांद्यावरचं ओझं काही काळ हलकं झाल्यासारखं वाटलं. सासूबाईंचा आवाज जरा सौम्य झाला, नातलगांच्या नजरेत तिच्यासाठी नव्यानं आदर आला. त्या क्षणी अवंती फक्त समुपदेशक किंवा सून नव्हती, आई झाली होती ती. ती एका जीवाची संपूर्ण दुनिया होती. पण हा दिलासाही फार काळ टिकला नाही.
रात्री मुलाला पाजताना, झोपवताना, अवंतीचा फोन वाजायचा. क्लायंट्सचे मेसेज, कधी कॉल्स यायचे. अवंती कॉल्स उचलायची नाही. फक्त पाहून मोबाईल ठेवून द्यायची. पण त्या कॉल्समुळे आशुतोषच्या मनात मात्र संशयाने शिरकाव केला होता. आशुतोष तिचे ते मेसेजेस, कॉल्स पाहायचा आणि लक्षात ठेवायचा. कधीतरी उद्रेक होऊन अवंतीला विचारायचा.
“इतक्या रात्री कुणाचे मेसेज असतात?”
त्याचा आवाज साधा असायचा; पण नजरेत प्रश्न असायचा.
“क्लायंट आहे. उद्या सेशन आहे.”
अवंती सहज उत्तर द्यायची; पण ‘सहज’ तिच्यापुरतंच होतं. हळूहळू आशुतोषच्या प्रश्नांना धार येऊ लागली.
“तू ऑफिसमध्ये इतका वेळ का थांबतेस?”
“हे लोक तुला जरा जास्तच कॉल करत नाहीत का?”
“समुपदेशनाच्या नावाखाली काय काय चालतं देव जाणे!”
पहिल्यांदा हे शब्द ऐकले तेव्हा अवंती हादरली. तिला वाटलं,
“कदाचित आशुतोषला कामाचा व्याप, जबाबदाऱ्यांचा ताण यामुळे थकवा येत असेल. अथर्व लहान आहे त्यामुळे त्याला असुरक्षित वाटत असणार.. आपणच त्याला समजून घेतलं पाहिजे. मुलाला जन्म देऊन आईबाबा होणं कदाचित शक्य होऊ शकेल पण ती जबाबदारी निभावणं वाटतं तितकं सोप्पं नाहीये. आपणच जरा सबुरीनं घेऊ..”
अवंती नेहमीप्रमाणे आताही आशुतोषला समजून घेऊ लागली; पण हीच तिची चूक होती. एखाद्याच्या मनातल्या संशयाला आपण समजून घेत राहिलो तर मनातला संशय कमी होत नाही तर दिवसेंदिवस बळावतो. आशुतोष अधूनमधून तिच्या फोनची तपासणी करू लागला. तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. एखादा पुरुष क्लायंट असेल तर त्याच्या नावावर जरा जास्त वेळ नजर स्थिरावलेली राहायची.
क्रमशः
© अनुप्रिया
© अनुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा