Login

माझा आवाज - ४

माझा आवाज.. कथा एका न उमजलेल्या बाजूची.. तिच्या आवाजाची..
जलदकथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय:- तिची बाजू
कथेचे शीर्षक - माझा आवाज - ४

“आई झाल्यावर तरी बदलायला हवं होतं तू.. मुलावर लक्ष दे, संसारावर लक्ष दे. हे बाहेरचं जग तुला आपलं वाटत असेल पण ते कायमचं आपलं नसतं. कारण ते काही आपले नातेवाईक, आप्तस्वकीय नाहीत. तर ते फक्त क्लायंट आहेत समजलं? सर्वात आधी आपलं कुटुंब मग तुझं समुपदेशन.. ते कितीही महत्वाचं असलं तरी!”

एके दिवशी आशुतोष चिडून म्हणाला. त्या वाक्याने अवंतीला आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटलं.

‘आई झाल्यावर मी एक माणूस नसते? फक्त ‘आई’ एवढीच उरते?’

तिच्या मनाला तो विचार शिवला. अथर्व तिच्या कुशीत शांत झोपला होता. त्याचा श्वास तिच्या हृदयाजवळ लागत होता. त्याचक्षणी अवंतीच्या मनात भीती दाटून आली.

‘या घरात माझ्या अस्तित्वाचं मोल फक्त मुलापुरतंच राहणार आहे का?’

आशुतोषचा संशय आता आवाजातच नव्हता तर तो नात्यात उतरू लागला होता. आणि हा संशय प्रेमातून जन्माला आला असला तरी त्याची वाढ हळूहळू मनाने हिंसक होत चालली होती. अवंतीला हे सारं खूप स्पष्ट कळत होतं; पण आता प्रश्न फक्त तिचा नव्हता तर तिच्या कुशीत निजलेल्या एका लहान जीवाचाही होता. म्हणूनच ती पहिल्यांदाच स्वतःशी म्हणाली,

“मी गप्प बसले तर माझा मुलगा काय शिकेल? मी त्याच्यावर अन्याय सहन करण्याचे संस्कार करणार? नाही मी शांत बसणार नाही. मी अन्याय सहन करणार नाही. मला आता स्वतःसाठी उभं रहावंच लागेल. आता मला काहीतरी ठोस पाऊल उचलायला हवं.”

एक दिवस पुन्हा आशुतोषने तिच्यावर संशय घेऊन भांडण उकरून काढलं. अवंती एका क्लायंटसोबत समुपदेशन सेशन घेत होती. सेशन सुरू असतानाच आशुतोष खोलीत आला. तो रागाने थरथरत होता.

“काय चाललंय तुमचं? घर आहे की काय आहे? तिकडे अथर्व रडतोय.. माझी आई कशीबशी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतेय. आणि तू? इथे या पुरुषासोबत गप्पा मारत बसलीयेस? बंद कर तुझी ही थेरं..”

आशुतोष रागाच्या भरात तोंडाला येईल ते बडबडत होता. तिला काय बोलावं समजत नव्हतं. आजवर त्याच्या संशयाला समजून घेतल्याची शिक्षा तिला मिळत होती. तिच्या समजून घेण्याने आशुतोषच्या मनातला संशय बळावत गेला आणि त्या संशयाने आज हे रौद्र रूप धारण केलं होतं. अवंतीने वेळीच या संशयाला आळा घातला असता, आशुतोषच्या बोलण्याला तेंव्हाच वेसण घातलं असतं तर आज ही वेळच आली नसती; पण आता वेळ निघून गेली होती. आशुतोष तिच्या क्लायंटसमोर तिचा अपमान करत राहिला. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत राहिला. शब्दाला शब्द लागत गेला. दोघांचेही स्वर चढत गेले. भांडण विकोपाला गेलं. त्याचा उद्रेक झाला आणि रागाच्या भरात आशुतोषने खाडकन तिच्या कानशिलात वाजवली. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. ते पाहून बिचारा क्लायंट घाबरून तिथून निघून गेला. हा अपमान अवंतीला सहन झाला नाही. अखेर अवंतीने अथर्वला सोबत घेऊन तिचं सासरचं घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि तसं तिने आशुतोषला सांगितलं.,

“आता एक क्षणही मी या घरात राहणार नाही. जिथे माझा मान ठेवला जात नाही, तिथे मला राहायचं नाही. स्वतःचा आत्मसन्मान गमावून मला काहीही नकोय.. अगदी तुझं नावही नकोय.”

“ठीक आहे.. तुला जायचं असेल तर खुशाल जा. असंही तुला नवऱ्याची गरज काय? बाहेरख्याली करण्यासाठी स्वातंत्र्य हवं असेल तुला. खुशाल जा.. पण जाण्यापूर्वी जसं माझं नाव टाकायचंय ना तर मग तसंच माझ्या मुलालाही टाकून जा.. मी त्याला तुझ्याबरोबर पाठवणार नाही. कधीच नाही..”

असं म्हणून तो अथर्वला तिच्या कुशीतून ओढून घेऊ लागला. ती अथर्वला उराशी कवटाळून होती तर तो तिच्या हातातून तिला खेचत होता. त्यांच्या खेचाखेचीत अथर्व घाबरून रडू लागला. अथर्वच्या रडण्याच्या आवाजाने, त्या दोघांच्या भांडणाच्या आवाजाने सासूसासरे त्यांच्या खोलीत आले; पण त्यांनीही काहीही समजून न घेता आपल्या मुलाचीच बाजू घेतली. अवंतीलाच दोष दिला. सासूबाईंनी रागाने तिच्या कुशीतून अथर्वला ओढून घेतलं. तिची बॅग घराबाहेर टाकून दिली. तिला अक्षरशः घरातून हाकलून दिलं आणि धाडकन दार लावून घेतलं. अवंती अथर्वासाठी दार ठोठावत राहिली. मुलासाठी रडत राहिली; पण त्यांना कोणालाच तिची दया आली नाही.

अखेर नाईलाजाने अवंती अथर्वशिवाय तिथून निघून गेली आणि आपल्या माहेरी पोहचली. तिच्या आईवडिलांना जेव्हा हा सारा प्रकार सांगितला, तेंव्हा त्यांना धक्काच बसला. पण करंदीकर कुटुंबीयांनी आपल्या मुलीचीच साथ दिली. त्यांनी सरळ पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ त्याची दखल घेतली. अवंती आपल्या आईबाबांसोबत पोलिसांना घेऊन आशुतोषच्या घरी आली. सुरुवातीला आशुतोष गुर्मीत बोलत होता पण पोलिसांनी आपल्या पोलिसी खाक्या दाखवताच तो वरमला आणि त्याने अथर्वला अवंतीच्या स्वाधीन केलं. पण तरीही तो पुन्हा तिच्यावर गुरगुरलाच,

“आता माझ्या अथर्वला घेऊन जातेयस पण लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे. मी कोर्टात जाईन. तुला तुझी जागा दाखवेन आणि माझ्या अथर्वला माझ्याकडे घेऊन येईन.. आता मी बघतोच तुला.”

अवंती काहीच बोलली नाही. तिने फक्त मान डोलावली आणि अथर्वला कुशीत घेत तिच्या आईबाबांच्या सोबत तिथून निघून गेली.

माहेरी पोहोचल्यानंतरही अवंतीच्या कानात अथर्वच्या रडण्याचा आवाज घुमत राहिला पण तो आवाज आता तिच्यासाठी प्रश्न बनून होता.

“आई, तू अशीच गप्प बसणार का?”

अवंती विचारात गढून गेली होती. इतक्यात तिची आई तिथे आली. अलगद तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाली,

“आता तू एकटी नाहीस अवंती. आम्ही आहोत.”

आईच्या स्पर्शाने ती भानावर आली. डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली,

“आई, तुम्ही मला साथ देऊ शकता, आधार देऊ शकता; पण आई, ही लढाई माझी आहे. ती मलाच लढायची आहे. कारण हा प्रश्न फक्त संसाराचा नाहीये, तर प्रश्न तो माझ्या अस्तित्वाचा आहे. तेंव्हा मला लढावंच लागेल. पण आई, घाबरू नकोस.. मी लढेन.. नक्की लढेन. माझ्या अस्तित्वासाठी.. माझ्या मुलाच्या निर्भयतेसाठी..”

दुसऱ्याच दिवशी वर्तमानपत्रात मथळा झळकला,

‘सुप्रसिद्ध समुपदेशक अवंती करंदीकर यांचा कौटुंबिक वाद न्यायालयात..’

नाव मोठं होतं पण बातमी लहान नव्हती. फोन खणखणू लागला. क्लायंट्स, पत्रकार, ओळखीचे, अनोळखी, कोणी सहानुभूतीने, कोणी कुतूहलाने, तर कोणी संशयाने बोलत होतं.

“मॅडम, तुम्ही खरंच त्या रात्री?”

“तुमचं प्रोफेशन आणि हे सगळं… लोक काय म्हणतील?”

अवंती शांतपणे फोन बंद करायची. आज तिला कुणालाच समजावून सांगायचं नव्हतं. कारण पहिल्यांदाच तिला स्वतःला समजून घ्यायचं होतं. कोर्टाची नोटीस आली. आशुतोषने मुलाच्या कस्टडीसाठी दावा दाखल केला होता. त्याच्या अर्जात शब्द होते.

‘बायको चारित्र्यहीन आहे’, ‘कामाच्या नावाखाली पुरुषांशी अनैतिक संबंध’, ‘मुलासाठी असुरक्षित वातावरण..’

कागद हातात घेताच अवंतीच्या हाताला कंप सुटला.
कोर्टाच्या नोटीशीप्रमाणे आज पहिल्या सुनावणीचा दिवस होता. पहिल्या सुनावणीच्या दिवशी कोर्टरूम गच्च भरलेली होती. माध्यमांचे कॅमेरे, कुजबुज, नजरांचे भाले जणू तिचाच ठाव घेत होते. आशुतोष आत्मविश्वासात होता.

“माझी बायको समुपदेशक आहे. पण तिला स्वतःचं आयुष्य सांभाळता आलं नाही. समुपदेशनाच्या नावाखाली तिचं अफेअर सुरू होतं.”

तो ठामपणे म्हणाला. हे आरोप तिच्यावर नव्हते तर ते तिच्या संपूर्ण आयुष्यावर होते.