Login

माझा आवाज - २

माझा आवाज.. कथा एका न उमजलेल्या बाजूची.. एका आवाजाची.
जलदकथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय:- तिची बाजू
कथेचे शीर्षक - माझा आवाज - २

‘इतकं सगळं इथे कधीच आणायचं नव्हतं मला.. घरातलं दुःख घरातच राहिलं असतं तर?’

तिच्या मनात विचार आला. पण लगेच पुढचा दुसरा विचार डोकं वर काढून उभा राहिला,

‘पण आवाज दाबून ठेवणं हासुद्धा एक अपराधच आहे.’

दिव्याने हळूच तिच्या हातावर हात ठेवला. खरंतर तिला धीर देण्याचा तिचा तो केविलवाणा प्रयत्न होता.

“काही काळजी करू नका. मला खात्री आहे, आज तुम्हाला नक्कीच बोलायची संधी मिळेल.”

दिव्या अवंतीकडे पाहून हळू आवाजात पुटपुटली. इतक्यात न्यायमूर्ती आत आले. ते येताच कोर्टातले सारेजण पटकन जागेवरून उठून उभे राहिले. न्यायाधीश महोदय आपल्या जागेवर विराजमान होताच उभे राहिलेले सर्वजण खाली बसले आणि न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली. सुरुवातीचे औपचारिक मुद्दे मांडले गेले. समोरच्या बाजूच्या वकिलाने आपली बाजू मांडायला सुरुवात केली.

“माय लॉर्ड, माझ्या क्लायंटच्या पत्नीने त्यांचं राहतं घर सोडलं, मुलाला वडिलांपासून दूर ठेवलं आणि आपल्या प्रतिष्ठेचा गैरवापर करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.”

पत्रकारांनी आपल्या डायरीत ओळी उमटवल्या. ती शांतपणे ऐकत होती. आरोप, संशय, तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्हं, ‘आई म्हणून अपयश’ अशी अनेक लेबलं तिच्यावर लावण्यात आली. प्रत्येक वाक्य तिच्या मनात खोलवर रुतत होतं.

“मी इतक्या वर्ष लोकांना समजावत होते, नात्यांतली हिंसा ओळखा, मौन तोडा, स्वतःचा सन्मान जपा आणि आज मीच आरोपी म्हणून इथे आरोपीच्या पिंजऱ्यात आहे.”

अवंती खिन्नपणे हसत स्वतःशीच पुटपुटली. समोरच्या वकिलाचं बोलणं संपलं तशी दिव्या बोलण्यासाठी जागेवरून उठून उभी राहिली. तिचा आवाज स्थिर होता.

“माय लॉर्ड, या प्रकरणात केवळ कौटुंबिक वाद नाही, तर एका स्त्रीच्या आवाजाचा प्रश्न आहे. समाजात आदर्श मानल्या जाणाऱ्या स्त्रीने अन्याय सहन केला तर तो अन्याय ठरत नाही असा समज इथे निर्माण केला जातोय.”

कोर्टरूममध्ये क्षणभर शांतता पसरली. दिव्या पुढे बोलत राहिली, पण अवंतीचं लक्ष मात्र त्याच्याकडे गेलं. तिच्यावर घाणेरडे आरोप करणारा तोच होता ज्याने कधीकाळी तिच्यावर नितांत प्रेम केलं होतं. अवंतीला सुरुवातीचे दिवस साद घालू लागले.

“किती छान दिवस होते ते!”

जुन्या आठवणींनी गर्दी करायला सुरुवात केली.

“अरे व्वा आशुतोष! तुला तर लॉटरीच लागली. एवढी देखणी, सुशिक्षित, सुप्रसिद्ध समुपदेशक, प्रतिष्ठित मुलगी तुझी पार्टनर म्हणून मिळाली. नशिबवान आहेस मित्रा!’

आशुतोषच्या मित्रांनी लग्नात त्याचं कौतुक केलं. त्याच्या चेहऱ्यावर अभिमानाची लाली पसरली.

“अहो देशमुख वहिनी, तुम्हाला सुनबाई किती सालस आणि समजूतदार मिळाली आहे, असणारच म्हणा, एवढी सुप्रसिद्ध प्रवक्ता आहे म्हटल्यावर ते गुण आपोआप उतरलेच असतील ना? आता काय बाई, सुनसोबत तुम्हीही प्रसिद्ध होणार म्हणा की..!”

बायकांत हास्याचे कारंजे उडाले. आशुतोषची आई सुनेच्या या कौतुकाने भारावून गेली. अवंतीच्या आईवडिलांनी मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं होतं. सासरच्या लोकांना योग्य तो मानपान केला होता. हुंडा नाही म्हणता म्हणता बरंच सामान त्यांनी आंदण म्हणून अवंतीसोबत पाठवणीच्यावेळी पाठवलं होतं. सुरवातीचे दिवस छान होते. सासरच्यांनी सुरुवातीला खूप कोडकौतुक केलं. नातेवाईकात अवंतीला घेऊन मोठ्या दिमाखात मिरवलं; पण हळूहळू नव्याची नवलाई सरू लागली आणि सासरच्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली. नव्या नवलाईची चमक ओसरत गेली तसं घरातल्या अपेक्षांचं ओझं वाढू लागलं. सुरुवातीला लहानसहान टोमणे सुरू झाले,

“अवंतीबाई, एवढ्या मोठ्या समुपदेशक आहात; पण घराकडेही लक्ष द्यायला हवं ना?”

“आज पुन्हा उशीर? ऑफिस ऑफिस… संसारही काही आपोआप चालत नाही बाई.”

अवंती हसून दुर्लक्ष करायची. तिला वाटायचं, हा काळ जाईल. नव्याने लग्न झालंय म्हटल्यावर थोडीफार तडजोड करावीच लागते; पण हळूहळू त्या वाक्यांमागचा सूर बदलत गेला. आता तो सल्ला राहिला नव्हता; तो आदेश बनू लागला होता. आशुतोष मात्र सुरुवातीला सगळ्या गोष्टी ‘इतकं मनाला लावून घेऊ नकोस’ या एका वाक्यात संपवायचा.

“आईचं वय झालंय आता.. बोलते कधी कधी. तूच मोठं मन करून थोडं समजून घे ना.”

अवंतीने आशुतोषचा सल्ला मानला. सासूबाई काहीही बोलल्या तरी ती उलट उत्तर देत नव्हती. त्यांना समजून घेत होती; पण समजून घेण्याच्या या प्रक्रियेत अवंतीचं अस्तित्व हळूहळू कुठेतरी हरवू लागलं. तिच्या यशाचं कौतुक आता घरात अस्वस्थता निर्माण करत होतं. पेपरमध्ये आलेली मुलाखत, टीव्हीवरचा कार्यक्रम हे सगळं सासरच्या माणसांना ‘जास्तीचं’ वाटू लागलं. दिखावा वाटू लागलं.

“बायको इतक्या उशीरपर्यंत घराबाहेर थांबते म्हटल्यावर लोकांना काय वाटत असेल, हे लोकांना कितपत रुचत असेल, देवच जाणो!”

तिच्या सासऱ्यांनी हळूच आशुतोषच्या डोक्यात संशयाचं पिल्लू सोडलं. त्यांचं बोलणं तिच्या मनाला बोचत होता. पहिल्यांदाच तिला जाणवलं,

‘समुपदेशक म्हणून हजारो लोकांचे संसार वाचवणारी अवंती स्वतःच्या घरात मात्र निःशब्द होत चालली होती. आणि त्या निःशब्दतेतूनच, कुठेतरी आत खोलवर, पहिली तडा गेलेली भावना जन्माला येऊ लागली होती.’

अवंती रात्री उशिरा आरशासमोर उभी होती. दिवसभर चेहऱ्यावर मिरवलेलं आत्मविश्वासाचं हसू आता कुठेतरी मावळत चाललं होतं. आरशात दिसणारी ती स्त्री तिला ओळखीची होती; पण तरीही तिला परकी, अनोळखी वाटत होती.

“मी इतरांचे संसार वाचवणारी अवंतीच आहे ना? मग मी इतकी कमजोर कधी झाले?”

तिने स्वतःलाच प्रश्न विचारला. ऑफिसमध्ये लोक तिच्या शब्दांवर विश्वास ठेवायचे. कोणाच्या तरी विस्कटलेल्या संसाराला दिशा देताना तिचा आवाज ठाम असायचा. डोळे निश्चयी असायचे.

“तुम्ही स्वतःला विसरू नका. सीमा आखणं म्हणजे स्वार्थ नाही.”

हे सल्ले देताना तिच्या आवाजात जराही कंप नसायचा; पण घरी आली की तीच अवंती कुठेतरी मागे हरवलेली असायची. स्वयंपाकघरात उभी राहून भाजीत मीठ कमी-जास्त झालं तरी मन धास्तावायचं. सासूबाईंच्या नजरेतला तो सूक्ष्म असमाधानाचा कटाक्ष तिच्या संपूर्ण दिवसाभराच्या आत्मविश्वासावर भीतीचं सावट पसरवायचा.

“इतक्या मोठ्या समुपदेशक आहात, पण घरातल्या साध्या गोष्टी जमत नाहीत वाटतं.”

सासूबाईंचं हे वाक्य खूप वेळ कानात घुमत राहायचं. ती स्वतःशीच भांडायची.

“हे सगळं मीच वाढवून घेतेय का? लग्न म्हणजे तडजोडच असते ना? मग ती फक्त स्त्रीनेच करायची असते का? आई-बाबांनी एवढ्या विश्वासाने मला पाठवलंय मग मी त्यांचा विश्वास सार्थ ठेवू शकेल ना? पण तडजोड आणि स्वतःचं अस्तित्व पुसून टाकणं यात बराच फरक असतो अवंती..”

मनात द्वंद्व सुरू व्हायचं. आशुतोषचा विचार आला की, ती हळवी व्हायची.

“आशुतोष माझ्यावर खूप प्रेम करतो, याबद्दल मला शंका नाही; पण तो कधीच माझ्या बाजूने उभा राहत नाही. सासूबाईंचं चुकलं तरी तो काहीच बोलत नाही. इतक्या मोठ्या कुटुंबात मी मात्र एकटीच.. इथे कोणीच माझं नाही.”

कधी कधी अवंतीला स्वतःचीच भीती वाटायची. कारण ती जे सहन करतेय, ते चुकीचं आहे हे ठाऊक असूनही ती शांत का आहे याचं उत्तर मिळत नव्हतं.

त्या रात्री खूप दिवसांनी तिने डायरी उघडली. पहिलंच वाक्य लिहिलं,

“आज मी समुपदेशक नाही. आज मी फक्त एक गोंधळलेली स्त्री आहे.”

अवंतीच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ते अश्रू कमकुवतपणाचे नव्हते तर ते एका जाणीवेचे होते. आणि त्या जाणीवेने हळूहळू एकेक प्रश्न जन्माला घालायला सुरुवात केली होती,
“मी इतरांना जगायला शिकवते; पण स्वतःसाठी जगायचं धाडस कधी करणार? मी स्वतःसाठी उभी कधी राहणार?”