माझा अभिमान - भाग 1

Marathi Story

विषय - स्वाभिमान
माझा अभिमान - भाग 1

"नंदिनी...हो नंदिनीच!... माझं पक्क ठरलं.
मीरा आपल्या या राजकन्येचे नाव नंदिनी ठेवायचं."
राजेश हॉस्पिटलमध्ये बघायला आलेल्या आपल्या चिमुकलीला दोन्ही हातात उचलून घेत म्हणाला.

"हम्म... तुम्ही म्हणाल तसे"
मीरा, राजेश ची बायको म्हणाली.

तिची ही संथ प्रतिक्रिया ऐकून, चिमुकलीला घेऊन राजेश मीरा जवळ गेला
"काय झाले? तुला बरं वाटत नाहीये का ?डॉक्टरांना बोलावू का?"

"नको,मी ठीक आहे." मीरा म्हणाली.

"अग मग, तुझा चेहरा का सुकला आहे."

मीरा च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.ती म्हणाली
"तुम्ही खूप नाराज झाला असाल ना; यावेळी ही मुलगीच झाली म्हणून... फक्त मला वाईट वाटू नये म्हणून असं बोलताय ना!"

"काय? काहीतरीच काय मीरा... तू असा विचार पण कसा करू शकते. आधी डोक्यातून हे विचार काढून टाक. अगं आज पुन्हा एकदा लक्ष्मी आली आहे आपल्या घरी. समोर आलेल्या या क्षणाचा आनंद घे. मीरा, तुला सांगतो या माझ्या तीन मुली माझा अभिमान आहेत. त्या माझं नाव मोठं करणार बघ... लिहून ठेव हे तू तुझ्या डायरीत."

राजेश चे हे शब्द मीराच्या कानात आज जसेच्या तसे घुमत होते. तिच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहत होते.आपले सामान पॅक करत असतानाच तिच्या मनात विचार चालू होते..
'किती अभिमान होता आपल्या तीन मुलींचा राजेशला. मुलींना थोडासुद्धा त्रास झालेला बघवत नव्हता त्यांना आणि आज त्यांच्या या लाडक्या राजकुमारींवर काय वेळ आली आहे ही.नाही, पण मी नाही काही कमी पडू देणार माझ्या मुलींना...राजेश तुम्ही नाहीत पण मी काही कमी पडू देणार नाही त्यांना.कोणीही तुमच्या राजकुमारीं बरोबर चुकीचे वागू शकणार नाही. त्यांची आई समर्थ आहे. आपल्या या तीन मुली आपल्या दोघांचाही अभिमान आहे. मी त्यांना स्वाभिमानाने च जगायला शिकवणाऱ.'

राजेश, सागर आणि महेश हे तिघे भाऊ.त्यांच्यापैकी राजेश सर्वात मोठा होता. वडिलांचे आजारपणाने लवकर निधन झाले त्यामुळे लहान वयातच राजेश वर आपल्या घराची आणि आपल्या दोन भावंडांची जबाबदारी पडली होती. राजेश जॉबला लागल्यानंतर पुढे आपली आई सुमतीताईंच्या आग्रहाखातर त्याने मिराशी लग्न केले. मीरा एका साधारण घरातील मुलगी. मनमिळावू आणि शांत स्वभावाची. ती एक शिक्षिका होती. मिराची आपल्याला मदतच होईल या गोष्टीमुळे ही राजेश तिच्याशी लग्न करायला तयार झाला होता. आपले दोन भावंड आपल्यासाठी सगळ्यात आधी आहेत हे त्याने मीराला आधीच सांगून टाकले होते.
राजेश आणि मीराने दोन्ही भावंडांना काही कमी पडू दिले नाही. सागर नोकरीला लागेपर्यंत मीरा ही नोकरी करत होती. लग्नानंतर चार वर्षानंतर पहिल्या प्रेग्नेंसी दरम्यान तिने नोकरी सोडली. मीरा आणि राजेश च्या आयुष्यात दोन कळ्या उमलल्या होत्या. मीराने छान गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला होता. आपल्या दोन कळ्यांना पाहून तर राजेशचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे त्याला झाले होते.आपल्या मोठ्या लेकीचे नाव त्याने 'ईश्वरी' आणि काही मिनिटांच्या अंतराने लहान असलेल्या लेकीचे नाव 'लावण्या' ठेवले होते.
आपल्या नातींना बघून सुमतीताई ही खूप खुश होत्या.
देवाने नवऱ्याला लवकर नेऊन दुःख दिले पण आभाळ एवढं सुखही पदरात घातले असे त्यांना मीराकडे पाहून नहेमी वाटे.
दोन्ही काका ही आपल्या पुतण्यांचे भरपूर लाड करत होते.

क्रमशः
सगळं काही चांगले असताना काय झाले असेल मीराच्या आयुष्यात? वाचू पुढच्या भागात.

सुजाता इथापे.