माझा अभिमान भाग - 2.

Marathi Story


स्वाभिमान
माझा अभिमान भाग - 2.

पुढे एकापाठोपाठ सागर आणि महेश चे ही लग्न झालं.
सागरच्या बायकोचे नाव सुवर्णा आणि महेश च्या बायकोचे नाव मनीषा होते. सागर नोकरी मध्ये सेट झाला होता पण महेश काही एका नोकरीत टिकत नव्हता. राजेशला त्याची चिंता होती. शेवटी त्याने त्याच्यासाठी एक रेस्टॉरंट काढायचे ठरवले.आपली सगळी सेविंग त्याने या नव्या धंद्यामध्ये लावली. एक रेस्टॉरंट सुरू झाले त्याची जबाबदारी महेश वर सोपवली होती.सुरुवातीला राजेश ऑफिस मधून आल्यावर रेस्टॉरंट मध्ये जात होता. रेस्टॉरंट सुरळीत चालू झाल्यावर त्याने लक्ष काढून घेतले.

सुवर्णा एक नंबर ची आळशी होती तर मनीषा फटकळ. घरात छोट्यामोठ्या कुरबुरी चालू झाल्या होत्या पण मीरा सगळं सांभाळून घेत होती.त्यात दोघे भाऊ राजेश च्या शब्दाबाहेर नव्हते म्हणून या दोघींनाही मीराचा शब्द नाईलाजाने का होईना पण पाळावा लागत होता.
दिवस सरत होते. आपल्या घराचे नंदनवन झालेले पाहून सुमतीताई भरून पावल्या होत्या.ईश्वरी आणि लावण्याला आता पाच भावंड मिळाली होती.
सागर आणि सुवर्णा ला दोन मुलं होती.आकाश आणि अमित तर महेश आणि मनिषाला एक मुलगा आणि एक मुलगी.राजेश आणि मीराला ही अजून एक मुलगी झाली होती.तिचे नाव राजेश ने नंदिनी ठेवले होते.

काळाचे चक्र फिरत होते. मुलं मोठी होत होती.
ईश्वरी आणि लावण्या ने बारावीची परीक्षा दिली होती आणि नंदिनी नववीला होती.

एक दिवस अचानक ऑफिस मधून येताना राजेश च्या गाडीचा एक्सीडेंट झाला. डोक्याला मार लागल्याने डॉक्टर त्याला वाचवू शकले नाही. राजेश चे असे जाणे मीराच्या जिव्हारी लागले होते. तो गेल्यापासून ती तिच्या रूम मधून बाहेर यायला तयार नव्हती. एक घास तिच्या घशाखाली उतरत नव्हता. आपल्याबरोबर असे काही घडले आहे यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. कधी, कधी वेड्यासारखी ती घरभर राजेशला शोधायची तर कधी ऑफिसमध्ये फोन करून त्याची चौकशी करायची. ईश्वरी आणि लावण्याला तर समजत नव्हते की आईला कसे सावरावे. सुमती ताई तर आधीच थकल्या होत्या. मुलाच्या निधनाने तर अजूनच खचल्या.

इकडे मीराचे स्वतःला कोंडून घेणे सुवर्णा आणि मनीषा च्या पथ्यावरच पडले होते. दोघी आता त्यांच्या मनाप्रमाणे वागू लागल्या. जाणून बुजून ईश्वरी आणि लावण्याला घरातील काम करायला लावून स्वतः मात्र दिवसभर आरामात पडून राहायच्या. नंदिनीला प्रत्येक गोष्टीवरून टोकू लागल्या. कधी खाण्याच्या तर कधी खेळण्याच्या.
त्या दोघींनी हळूहळू आपल्या नवऱ्यांना भडकवायला सुरुवात केली. राजेश आता राहिला नाही त्यामुळे त्यांच्या तीन मुलींच्या शिक्षणाचा,लग्नाचा सगळा खर्च आपल्याला करावा लागेल हा विचार दोघींनीही सोयीस्करपणे आपल्या नवऱ्यांच्या डोक्यात उतरवला.
आपल्या मोठ्या भावाने आपल्यासाठी काय काय केले ते दोघे भाऊ ही विसरले.
काका काकूंच्या वागण्यातील बदल हळूहळू ईश्वरी आणि लामन्याच्या लक्षात येऊ लागला. कितीतरी वेळा ईश्वरी आणि लावण्याने आईला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला पण मीरा मात्र दुःख कवटाळून बसली होती. तिने स्वतःला एका रूममध्ये कोंडून घेतले होते.

आज मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. महेश आणि सागर ने तिला न सांगता ईश्वरीसाठी एक स्थळ आणले होते. ईश्वरी चे अजून शिक्षण पूर्ण झाले नव्हते, वयानेही ती लहान होती पण तरीसुद्धा शिक्षणाचा खर्च वाचावा म्हणून मनीषा च्या सांगण्यावरून दोघांनी हे पाऊल उचलले होते. एवढ्यावरच न थांबता हुंडा द्यावा लागू नये म्हणून अक्षरशः अर्ध्या वयाच्या माणसाबरोबर ते तिचं लग्न लावून द्यायला निघाले होते. मीराच्या मानसिक स्थितीचा अशाप्रकारे ते फायदा घेत होते.
काका काकूंनी केलेल्या ह्या प्रकारावर लावण्याने आवाज वाढवला.लावण्याचा आवाज ऐकून मीरा बाहेर आली आणि तिला घडत असलेला प्रकार समजला. त्या क्षणी तिचे डोळे खाडकन उघडले. आपलेच लोक आपल्या विरुद्ध कटकारस्थान करताय हे तिच्या लक्षात आले. सागर ने केलेल्या या कृत्यावर तिने त्याच्या एक जोरात थोबाडीत लावली होती आणि लगेच घर सोडण्याचा निर्णय घेतला होता.

"आई, आई सांग ना आपण कुठे चाललो आहे? हे आपले पण घर आहे ना मग का जातोय आपण."
नंदिनीच्या या बोलण्याने मीरा आपल्या विचारातून बाहेर आली.

" बाळा, घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात ग. तिथल्या आपल्या प्रेमाच्या माणसांनी घर बनत असतं. आपला आता इथं कोणीही नाही."
मीरा आपल्या लाडक्या नंदिनीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली.

मीराचे हे बोलणे ऐकून लावण्या म्हणाली,

"आई,मला नाही पटत इथून जाणे.हे आपले पण घर आहे.कायद्याने याच्यावर आपलाही हक्क आहे."

"लावण्या आत्ता नाही. इथे असं लाजिरवाणं राहणं मला पटणार नाही. काही झालं तरी मी माझा स्वाभिमान सोडणार नाही. माझ्या मुलींचा मला अभिमान आहे. ह्या लोकांना माझी आणि माझ्या मुलींची अडचण वाटू लागली आहे हा विचारच मला इथे थांबू देत नाही.
तुमचे आवरले असेल तर आपण आजीला भेटून येऊया."

एवढे बोलून मीरा मुलींना घेऊन सुमती ताईंच्या खोलीत गेली. मीरा ने त्यांना घडलेली हकीगत सांगितली. त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. त्यांना खूप काही बोलायचे होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. थरथरत्या हाताने त्यांनी मीराच्या आणि तिन्ही नात्यांच्या तोंडावरून हात फिरवला. त्यांना मनापासून वाटत होते की मीराने घर सोडून जाऊ नये. त्यांच्या भावना ही निराला समजत होत्या पण मीराला आता तिचा स्वाभिमान तिथे राहू देत नव्हता.

मुलींना घेऊन ती निघाली होती पण कुठे जाणार? भावाकडे? तिच्या डोक्यात विचार चालू असतानाच ईश्वरी म्हणाली,
"आई आजचा दिवस मामाकडे राहायचं का?"

मीरालाही हेच वाटत होते. ती भावाला फोन करणार तोच त्याचाच फोन आला. मीरा काही बोलायच्या आतच तिकडून आवाज आला,
"तुला कोणी शहाणपणा करायला लावला? तीन तीन मुली घेऊन घर सोडून निघाली. कुठे जाणार आता? जरा तरी विचार करत जा. आणि काय केले ग त्यांनी एवढे तुझ्या मुलीच्या लग्नाचा विचार केला ना."

भावाचे हे शेवटचे वाक्य ऐकून मीराला कळून चुकले की भाऊ सुद्धा आता आपल्या राहिला नाही.

"बास झालं.. मी काय करायचे हे तू मला शिकवू नकोस? आणि काळजी करू नकोस तुझ्याकडे तर मी मुळीच येणार नाही."

तिने फोन कट केला.

'आपल्या मुलींचा सगळ्यांना एवढा त्रास. हा विचार तिला अस्वस्थ करत होता. राजेश ला किती अभिमान होता आपल्या या तीन मुलींवर. हो.. मलाही माझ्या तीन मुलींवर अभिमान आहे. मी त्यांना काहीही कमी पडू देणार नाही. माझ्या मुली कोणासाठीही अडचण नाही हे सगळ्यांना दाखवून देणार.'
तिने हे मनाशी पक्क केलं. आपल्या एका मैत्रिणीच्या सहाय्याने त्या दिवशी तिने घर शोधलं आणि त्या दिवसापासून चौघींनी एका नवीन जीवनाची सुरुवात केली.
क्रमशः
सुजाता इथापे