माझा अभिमान -भाग अंतिम

Marathi Story
माझा अभिमान -भाग 3

मागच्या भागात आपण वाचले मीराने आपल्या मुलींसह एका नवीन जीवनाची सुरुवात केली होती.

मीरा कडे तिच्या नोकरीचे सेविंग्स होते. तिने पुन्हा एकदा एका खाजगी शाळेत नोकरी करायला सुरुवात केली. ईश्वरी चे आणि लावण्याचे कॉलेज सुरू झाले.

काही दिवसातच मीराला अजून एक धक्का बसला. सागर आणि महेश ने राजेश चे नाव वगळून रेस्टॉरंट स्वतःच्या नावावर करून घेतले होते. रेस्टॉरंटच्या एका विश्वासू माणसाने मीरा ला ही बातमी दिली होती.
हे ऐकून मीरा शांत होती. पण ईश्वरी आणि लावण्या मात्र आपला हक्क परत मिळवायचाच हा विचार डोक्यात पक्का करून चालल्या होत्या.

मीरा ने हळूहळू नोकरीबरोबरच ट्युशन द्यायला ही सुरुवात केली होती. ईश्वरी ही तिला मदत करत होती. ग्रॅज्युएशन नंतर लावण्याने लॉ ला ऍडमिशन घेतले आणि ती वकील झाली. एव्हाना नंदिनीची ही बारावी झाली होती आणि ती मेडिकल चे शिक्षण घेत होती.

ट्युशन ची जबाबदारी आता पूर्णपणे ईश्वरीने स्वीकारली होती. तिने स्वतःची संस्थाच उभी केली. मुलांना शिकवायला वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक ठेवले होते.

मीराने पाहिलेले स्वप्न तिच्या मुलींनी साकार केले होते.
तिला तिच्या तिघी मुलींचा सार्थ अभिमान होता.
सर्व काही सुरळीत झाले असले तरीही झालेला अपमानाचा चा बदला आणि आपल्या बाबांचा हक्क मिळवायचा हे तिघी मुलींच्याही डोक्यात होते. आपली वकिलीची प्रॅक्टिस पूर्ण झाल्यावर लावण्याने सर्वात आधी कायद्याने रेस्टॉरंट च्या धंद्यामधील आपल्या बाबांचा हिस्सा परत मिळवला.
त्यादिवशी पळत येऊनच लावण्या आईच्या गळ्यात पडली
" आई, आज खऱ्या अर्थाने मला खूप आनंद झाला आहे."

" अग, हो.. हो.. काय झाले काय ते तर सांग."
मीरा ने विचारले.

" आई , आज आपण आपल्या रेस्टॉरंट मध्ये जाणार आहोत आणि तेही मालक म्हणून."

हे ऐकून मीराच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले
"काय ? खरं सांगतेस बाळा तू!"

"हो ...आई लवकर आवर मला जाम भूक लागली आहे. आज आपण आपल्या रेस्टॉरंट मध्येच जेवायला जाणार."
नंदिनी आपली बॅग ठेवत म्हणाली. तिच्या पाठोपाठ ईश्वरी ही आली. तिघींनी आईला घट्ट मिठी मारली.

थोड्याच वेळात तिघीही रेस्टॉरंट मध्ये पोहोचल्या.
मीरा आपल्या तिघी मुलींसह ताठ मानेनं रेस्टॉरंट मध्ये फिरत होती. तिला पाहून सागर आणि महेश ची मान मात्र शरमेनं खाली गेली होती.मीरा; सागर आणि महेश जवळ गेली आणि म्हणाली,
"मला खूप वाईट वाटते आहे की, ज्या भावाने तुमच्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले तो भाऊ गेल्यावर त्याच्या मुली तुम्हाला अडचण वाटू लागल्या. या तीन मुली तुमच्या भावाचा आणि माझा अभिमान आहेत हे कायम लक्षात ठेवा."
समाप्त
सुजाता इथापे