Login

माझं घर कोणतं ...परकी भाग-3अंतीम

एका स्त्रीची व्यथा
माझं घर कोणतं...
परकी भाग-3अंतीम

ती अस्वस्थ होतीच.तिच्यासमोर तिचा भूतकाळ फेर धरून नाचु लागला होता.एकीकडे दुहिता म्हणतात मुलीला आणि दुसरीकडे...

ती आपल्या माहेरात अगदी तिच्या बालवयात पोचली होती.ती दहा वर्षांची असेल तेव्हाची आठवण.जवळच्या गावात मोठी यात्रा भरली होती.मिताने भावासोबत ट्रीपला जाण्यासाठी आईला लाडीगोडी लावली.पण बाबा तयार झाले नाही.तो काय पोरगा कुठेही जाईल .पोरीच्या जातीला नाही पाठवायचं आणि ती काय परक्याचंच धन.लग्न होऊन आपल्या घरी गेल्यावर कुठेही जा बाई.
नुकतंच समजायला लागलेलं तेव्हाच बाबांचे हे शब्द कानावर पडले.
म्हणजे या घरी मी परकी आणि ज्या घरी लग्न होऊन जाईल तेही परक्याचंच घर?मग माझं घर कोणतं ?त्यावेळी मनात आलेला विचार लगेच मावळून गेला कारण बालवय.खेळण्यात विसरून गेले.

थोडी मोठी झाली.शिक्षणाचा विषय आला.भावाला मेडीकलला पाठवलं पण माझ्याबाबतीत हुशार असूनही गावात बीए ला अ‍ॅडमिशन घेतली.पुन्हा तेच पोरीची जात परक्याचे धन काय करायचे जास्त शिकवून .

बीए प्रथम श्रेणीत पास केलं.सहज म्हणून एल.आय.सी.चा इंटरव्हू दिला आणि घरबसल्या नोकरी चालून आली.बाबा म्हणाले," माझ्या घरी खायला कमी नाही.नवर्‍याच्या घरी गेल्यावर गरज असली आणि नवर्‍याने परवानगी दिली तर करशील नोकरी."
'माझं घर,नवर्‍याचं घर' तेव्हा कळलाच नाही अर्थ त्यांच्या शब्दांचा. आता कळतोय.

आईचे तर रोजचेच बाईच्या जातीला सगळी कामं आली पाहिजे.परक्या घरी जायचं तर माहेरचा उद्धार नको व्हायला.
एक दिवस मी पोळ्या लाटायला बसली तर पोळी थोडी वाकडीतिकडी आली. तर आई म्हणते," हे काय कोणत्या देशाचा नकाशा.परक्या घरी आईचाच उद्धार होईल.

मला समजत नाही मी ज्या घरात जन्म घेतला,ज्या अंगणात बालपण खेळलं,यौवन बहरलं तेच घर माझ्यासाठी परकं?... का ? का...?

आणि लग्न होऊन ज्या घरी जाणार तेही परक्याचंच घर ?

लग्न होऊन घरी आले.आता वाटले होते आपण 'आपल्या' घरी आलो.
मी मोकळेपणाने सगळीकडे वावरत होते आपलेपणाने.
तर एक दिवस सासरे सासुबाईंना म्हणाले," आपण चार दिवस तीर्थाटनाला जाऊयात.आता आहे सुनबाई घर बघायला."

तर सासुबाई म्हणतात," ती काय परक्याचं पोर आता चार दिवस झाले घरात येवून तर लगे विश्वास ठेवून घराची जबाबदारी सोपवणार का ?"

माहेरी आईबाबा म्हणतात 'परक्याचं धन' सासरी आले तर सासू म्हणते 'परक्याची पोर'

आता नवर्‍यासोबत नोकरीच्या ठिकाणी आले, तिथे घर बांधले तर नवरा म्हणतो ,"माझ्या पैशानी बांधलं घर"
नेमकं माझं घर कोणतं ?

ही माझीच अवस्था असेल की माझ्यासारख्या सगळ्याच स्त्रियांसमोर असेल हा प्रश्न ?
स्त्री मग ती शिकलेली असो की अडाणी ती कितीही स्वयंपूर्ण असेल पण खरेच किती घरं आहेत अशी की तिला आपल्या कुटुंबातील एक महत्वपूर्ण घटक म्हणून प्रत्येक लहान मोठ्या निर्णयात सामिल करुन घेतले जाते.तिची आवड निवड विचारात घेतली जाते.तिला मानसन्मानाने वागवले जाते ...
वागवले जात असेल काही घरात पण तरी घरात तिचे स्थान दुय्यमच.
ती मोठी अधिकारी असेल पण बाहेर . घरात ती स्वयंपाक काय करु हे विचारूनच करते.हीच परिस्थिती आहे सामान्यतः घरात.

ती उठली मनाशी निश्चय करून हे चित्र मी बदलणार.
तेवढ्यात मिहीर आला. ती म्हणते," येते मी ,जरा फ्लॅट बुक करायचाय."
नवरा आश्चर्याने बघतच राहिला. तर ती म्हणते," हे घर तुझ्या पैशांनी बांधलय बाबा तू.
काय भरोसा उद्या मला म्हणशील ,"जा इथे राहू नकोस. हे माझं घर आहे."
तेव्हा कुठे जाणार मी ?
तेव्हा माझंही घर असावं स्वतःचं.जिथून कुणी हाकलू शकणार नाही मला नाही का?"
आणि त्याचं उत्तर न ऐकताच ती निघालीसुद्धा.
समाप्त
©®शरयू महाजन

🎭 Series Post

View all