Login

माझा शाळेचा पहिला दिवस

शाळेत घडलेल्या घटना

माझा शाळेचा पहिला दिवस

सुरूवात न रडता झाली ज्याची
ओळख झाली आयुष्याच्या नवीन टप्प्याची
पुस्तक पाटी दप्तर अन् काळा फळा
मम प्रिय अशी माझी शाळा... ।।

खरोखरच प्रत्येकाला आपली शाळा खूप आवडत असते कारण ही तसचं असत ना.... नवीन आयुष्य , मित्र ,मैत्रिणी मिळण्याच एकमेव स्त्रोत. असो

अगदी लहान पणीच एवढं नाही आठवत पण साधारण इयत्ता पाचवीचा पहिला दिवस आठवतो. शाळेचा नविन गणवेश, नवीन दप्तर घेऊन मी आणि आई पहिल्या दिवशी शाळेत गेलो.

चौथीची शाळेची इमारत सोडून मी पाचवीला नवीन इमारतीत शाळेत गेले. शाळा तिच असल्यामुळे जरा दडपण कमी होतं. पण आता तू मोठी झाली ... पाचवीत गेली... हे सारखं ऐकून ऐकून थोडं दडपण येतचं होतं.

पहिल्या दिवशी आई मला सोडायला आली होती. चौथीतले ओळखीचे चेहरे होते पण काही नवे चेहरे दिसत होते. सगळे शिक्षक पण नवीन त्यामुळे मनात थोडी धाकधुक होती.

मी घाबरत घाबरत वर्गात गेले. आमची शाळा मुलींचीच. त्यामुळे दुसऱ्या शाळेतून आलेली एक मुलगी नवीन शाळा बघून रडायलाच लागली. तीच रडणं बघून माझी जीवलग मैत्रिण पण रडायला लागली. ती रडली म्हणून मी पण रडले थोडीशी. पण नंतर त्या दोघींना शांत केले आणि त्यादिवसापासून मी, गितांजली, कस्तुरी मैत्रिणी झालो.

नंतर शाळेची घंटा वाजली अन् आई मला सोडून गेली. आम्ही रांगेत परिपाठ म्हणायला उभं राहिलो होतो. परिपाठ चालू झाला होता. आमच्या वेळी आता सारख शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे स्वागत वगैरे करायची पध्दत नव्हती. त्यामुळे परिपाठ झाल्यावर आम्ही आमच्या वर्गात आलो.

ओव्हाळ मँडम आम्हाला इंग्रजी शिकवायला होत्या. त्याचं आमच्या वर्गशिक्षक असल्या कारणाने त्यांनी प्रत्येकाची नावे विचारली. सगळ्यांची नावे घेत असताना गितांजली अनिल जोशी आणि आरती अनिल जोशी अशी दोन नावे आली.

मग काय मँडमने विचारले च ,"काय ग तुम्ही सख्या बहिणी का ग ?" त्यावर दोघींनी माना हालवून नकार दर्शवला. मग आरतीच म्हणाली, " आमच्या वडिलांची नावे सारखी आहेत फक्त बाकी आम्ही बहिणी नाहीत. "

नंतर तासा मागे तास झाले. मधली सुट्टी झाली. गितांजली, आणि मी डबा खायला बसलो. आम्ही बेंचवर एकाच बसला होतो. त्यामुळे तिथेच डबा उघडून खायला सुरूवात केली. पहिला दिवस असल्यामुळे जुन्या मैत्रिणी होत्या त्या एकत्र बसल्या होत्या. नवीन कावरे बावरे होऊन कोणात जायचं ह्या गोंधळात . शेवटी आपल्याच बेंच पाशी बसल्या.

मधल्या सुट्टी नंतर घोटकर सर आले. ते आम्हाला गाणं शिकवायचे. मग काय त्यांनी वर्गात दोन गट पाडून भेंड्या घ्यायला सुरूवात केली.

भेंड्या खेळता खेळता मला झोप लागली आणि मध्येच हात सटकून मी बेंचवरून सरकले. मग काय वर्गात हसाहसा पिकला.

यानंतर एखाद दुसरा तास झाला असेल. पण फार काय अभ्यास न घेता मज्जा मस्तीच चालू होती. साधारण १२.३० ला शाळा सुटली.

असा थोडाशा रडका , थोडाशा मस्तीत आणि कुतूहलासह शाळेचा पहिला दिवस पार पडला. जाताना रिक्षा लावली होती त्या रिक्षेतून घरी जायचं म्हणून आम्ही सगळे रिक्षा पाशी आलो. त्या रिक्षेने घरी. ..

असा प्रकारे शाळेचा पहिला दिवस आठवणीत राहिला. आता मुलीच्या शाळेत पहिल्या दिवशी सोडायला गेल्यावर तिथले वातावरण पाहून शाळेची आठवण झालेली पण आज ती शब्दात मांडता आली.

धन्यवाद साहित्य विचारधारा समूह.

©® सौ. चित्रा अमोल महाराव