Login

माझा हक्क....

स्त्रीच्या पैशावर हक्क कुणाचा???
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा

शीर्षक:- माझा हक्क

"ह्या वयात काय गरज आहे तुला फोर व्हिलरची?? आणि एवढे पैसे कुठून आणणार???"

त्यांचा लेक त्यांच्यावर बरसला.

"होना हे वय तीर्थयात्रा करायच आहे, फिरण्याचं नाही."

त्यांच्या सुनेने देखील मध्ये तोंड घातलंच..


"अरे....! असे काय करता माझ्या रिटायरमेंटचे पैसे मिळणार आहेत त्यातूनच मी फेडन हे लोन.."


"तुझ्या रिटायर्डमेन्टचे पैसे खर्च करण्याचा अधिकार तुला कोणी दिला. आम्ही आधीच त्यातून प्लॅन केले आहेत. आयुष्यभर अक्कल नसल्यासारखी वागलीस. आता साठी जवळ आली तरी तेच..."


तिचा नवरा बोलला आणि ती एकदम सुन्न पडली.
ह्या आहेत सीमा परांजपे. वय ५८ वर्षं, सीमाताई गेली तीस वर्षं एका सरकारी ऑफिसात क्लार्क म्हणून काम करत होत्या. तस त्यांना अजून दोन वर्षांत निवृत्तीसाठी बाकी होत. पण सकाळी बस पकडणं, गर्दीत उभं राहून प्रवास करणं, नंतर ट्रेनचा प्रवास ती धक्काबुक्की,आणि संध्याकाळी रिक्षाची झगडणं, रिक्षाची वाट बघण्यात अर्धा तास जायचा, ह्यातच त्यांचं आयुष्य गेलं.

पण आता मात्र शरीर साथ देत नव्हतं. पाय दुखायचे, जिना चढताना धापा लागायच्या. ऑफिसमध्येही लक्ष लागत नसे, कामात गडबड व्हायची.

मागच्या आठवड्यातच तिची मैत्रीण मधुरा भेटली होती. तिने नुकतीच एक फोर-व्हिलर घेतली होती आणि त्यावर ड्रायव्हर ठेवला होता.


“सीमा, रोजची धावपळ सोड. तू पण आता स्वतःला थोडा आराम दे. बघ, मी ड्रायव्हर ठेवला, तो मला ऑफिस, बाजार, हवं तिथे घेऊन जातो. उगीच अंगावर ताण आणू नकोस,”

मधुराने तिला सांगितल ते तिला देखील पटलं.

"खरंच… मी आयुष्यभर घर, नवरा, मुलं, नोकरी  सगळ्यांसाठी झटले. पण आता शरीर साथ देत नाही. उरलेली दोन वर्षं तरी स्वतःसाठी आरामदायी हवीत. घरात सांगितलं तर सगळेच खुश होतील.”

ती मनाशी कार घेण्याचं गणित देखील मांडलं.


“माझ्या कष्टाच्या पैशातून मी कार घेईन. उरलेली दोन वर्षं कमीत कमी शांत, सुखकर असावीत. त्या पैशातून आरामात कार येईल… आणि मी स्वतःला दिलेला हा सगळ्यात मोठा गिफ्ट असेल. रिटायर्डमेंटच्या पैशामधून गादी घेतली तर कुणावर ओझ देखील होणार नाही.”


रात्री जेवताना खूप आनंदाने त्यांनी नवऱ्याला आणि मुलांना सांगितलं.


“मी कार घेतेय. ऑफिस, बाजार सगळीकडे सोयीचं होईल. माझी गुडघेदुखी पण कमी होईल.”

पण तिला त्यावर विरोध झाला. त्यांना वाटल होत सगळेच आनंदाने तिच्या ह्या निर्णयाचा स्वागत करतील पण इथे उलटचं झालं. सगळ्यांचे विचार ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.


" अहो, पण मला येता जाता त्रास होतो. रात्रभर झोप लागत नाही. थोडाफार आराम द्यावासा वाटतो मला माझ्या शरीराला. त्यात काय चुकलं? शिवाय तुम्हा कुणाकडून मी पैसे देखील मागत नाही.मग प्रॉब्लेम काय आहे. "

ती कातर आवाजात म्हणाली तस क्षणभर शांतता पसरली. पण नंतर मुलगा रागाने म्हणाला



“आई, काय बोलतेस तू! तुझ्या रिटायरमेंटच्या पैशाने आम्ही घर घ्यायचं ठरवलंय. मी किती दिवसांपासून प्लॅन करतोय. तू कार घेणार म्हणजे माझं स्वप्न बुडणार.”

त्यावर घाईघाईने नवरा पण लगेचच म्हणाला,

“आणि मला कित्येक वर्षांपासून परदेशात फिरायला जायचं आहे. मी ठरवलं होतं की तुझ्या रिटायरमेंट नंतर ते शक्य होईल. कार घेऊन सगळं वाया घालवायचं? हे बरोबर नाही.”

सीमा शांतपणे ऐकत होती. डोळ्यांत आलेले पाणी तिने आता मात्र रोखले,


“घर घ्यायला, परदेश फिरायला तुम्हाला हे पैसे हवे आहेत. ते सगळं ठीक आहे. पण हे पैसे माझ्या आयुष्यभराच्या कष्टाचे आहेत. सकाळ-संध्याकाळ गर्दीत धडपड करून मी हे कमावले. आता शरीर ऐकत नाही, आरोग्य ढासळतंय. दोन वर्षं मीही थोडा आराम मागितलाय… तर ते इतकं चुकीचं आहे का?”

मुलगा परत चिडून म्हणाला,


“आई, तू फक्त स्वतःचाच विचार करतेस. आमचं भविष्य, आमची स्वप्नं तुला महत्त्वाची नाहीत का?”

सीमाने डोळे पुसले आणि शांतपणे उत्तर दिलं,


“वीरू, मी आयुष्यभर फक्त तुमचाच विचार केला. तुमच्या स्वप्नांसाठी माझी स्वप्नं बाजूला ठेवली. पण आता उरलेली दोन वर्षं तरी माझ्यासाठी जगायची आहेत. ही कार माझ्यासाठीच नाही तर माझ्या स्वाभिमानासाठी देखील आहे.”



" म्हणजे आता तुला तुझ्या नवऱ्यापेक्षा आणि मुलापेक्षा तुझी मौजमज्जा जास्त महत्वाची आहे. "

नवऱ्याचा अहंकार दुखावला गेला होता, तोपण रागात म्हणाला.



" अजिबात नाही, मी माझं आयुष्य ह्यातच घातलं आहे. आज पहिल्यांदा मी स्वतःसाठी काहीतरी करत आहे. मी कार घेणारच. माझ्या रिटायर्डमेंटच्या पैशाचा निर्णय तुम्ही परस्पर घेतला, कारण आयुष्यभर तुम्ही हेच करत आले आहात. पण आता तस होणार नाही, बाकीच्या पैशाचं देखील काय करायचं ते मी बघेन. "


ते ऐकून तिच्या घरात गोंधळ माजला. राग, तिरस्कार, नाराजी सगळंचं तिला जाणवत होतं. पण सीमाने मनाशी ठरवलं होतंच, आता मी मागे हटणार नाही. पुढचे दोन तीन दिवस तिच्याशी कोणच बोलत नव्हते. नवऱ्याने समजावण्याचा प्रयत्न केला पण तिने तिचा निर्णय बदलला नाही. घर सांभाळून तिने नोकरी करत ही परीक्षा दिली, ज्यात ती उत्तीर्ण देखील झाली. पण ह्यात देखील नवऱ्याची साथ नव्हती. पगार झाला कि तो त्याच्या हातात घ्यायचा आणि हिला लागतील तेवढेच द्यायचा. त्यामुळे ती असा काही निर्णय घेईल ह्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.


घरातला वाद, राग, तिरस्कार  सगळ्यामुळे सीमाचं मन खिन्न झालं होतं. त्या रात्री ती खिडकीजवळ बसून बराच वेळ विचार करत राहिली. तिच पूर्ण आयुष्याच तिच्या समोर उभ राहील होत.


“आयुष्यभर घरासाठीच दिलं… आता स्वतःसाठी घेतलं तर मी स्वार्थी?”

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मधुरा भेटली. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून मधुरा म्हणाली,


“सीमा, काय झालं? एवढी खचलेली का दिसतेस?”

सीमाने सगळं सांगितलं. मुलाचा विरोध, नवऱ्याचा राग… सगळं काही.....
मधुरा काही क्षण शांत राहिली, तिला आधीपासून सीमाची ओढाताण माहित होती म्हणून ती ठामपणे तिला म्हणाली,


“सीमा, हा तुझा हक्क आहे. हे पैसे तू कमावले आहेत. घरच्यांना समजायला वेळ लागेल, पण तू मागे हटू नकोस. चल, मी आहे तुझ्या सोबत. आपण तुझी कार बुक करू.”

सीमाच्या डोळ्यांत अश्रू आले. तिने आता मधुराच ऐकायचं ठरवलं. त्या दोघी दुपारी शोरूममध्ये गेल्या. कार पाहून सीमाच्या चेहऱ्यावर बराच काळानंतर हसू उमटलं.
सेल्समनने विचारलं,

“मॅडम, कोणती कार बघायची आहे?”

सीमाने कारकडे बघून शांतपणे उत्तर दिलं,


“मला असा मॉडेल हवा, जो मला रोजच्या थकव्यातून मुक्त करेल… जो मला आठवण करून देईल की माझ्या कष्टांची किंमत मला मिळाली आहे.”

बुकिंग झालं. थोडे पैसे तिने FD मधून पैसे काढले गेले. बाकीचं लोन केल. मधुराने कागदपत्रं पाहून तिला मदत केली.
कार घेताना सीमाच्या डोळ्यांत आनंद होता. आता थोडा तरी माझ्या पायांना आराम भेटेल. ड्राइव्हर देखील मधुरानेच बघून दिला होता.


कार घरी आल्यावर घरातल वातावरण पुन्हा तंग झाला.
मुलगा चिडून म्हणाला,


“आई, तू खरंच आमचं ऐकलं नाहीस. स्वतःच्या मनाचं केलंस.”

नवरा उपरोधाने म्हणाला,

“हो, आता तू कार चालव. घर आणि परदेश सगळं विसरतो आम्ही, तुला काय फरक पडतोय म्हणा?”

सीमाने त्याकडे आता दुर्लक्ष केल.

काही दिवस गेले. सीमाने मधुराने दिलेला बघून ड्रायव्हर ठेवला. ऑफिसला जाणं येणे आता सोपं झालं होत , तब्येत देखील सुधारली,तिच्या चेहऱ्यावरचा थकवा कमी झाला होता. ऑफिसमध्ये सुद्धा ती लक्ष देत होती.


एकदा तिने मुलाला त्याच्या मीटिंगसाठी कारने सोडलं.
मुलगा कारमधून उतरतानाच थोडासा थांबला आणि हळूच म्हणाला,

“आई… तुझं कार घेणे योग्यच होतं.”

सून देखील एका दिवशी बाजारात जाताना म्हणाली,

" बर झालं आई, आता मला ऑटोची वाट नाही बघावी लागत. "


नवऱ्याला देखील त्यांच्या मित्रांसोबत सोडायची ती तेव्हा तो देखील म्हणाला,


“खरंच, या कारमुळे तुला आराम मिळतोय. आम्हीच चुकीचं समजलो. तुला आयुष्यात निर्णय मी कधीच घेऊन दिले नाहीत. पण तुझा हा निर्णय योग्य निघाला.”

सीमा हसली. तिच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू होते, पण आनंदाचे. आता ती आनंदाने आपल्या नातवाला शाळेत सोडायला जाते.