Login

माझी आत्मकथा

.
"रम्य ते बालपण, लहानपण देगा देवा!! अशा शब्दांमध्ये अनेक दिग्गज कवि, लेखकांनी बालपणातील दिवसांची निरागासतेची वर्णने आपल्या कथा कवितांमधून केलेली आहेत. खरेच बालपण!! हा आठवणींचा असा एक ठेवा आहे की प्रत्येकाच्या मनाच्या कप्प्यात त्याचे वेगळेच स्थान असते. जेव्हा पण आपण तो कप्पा उघडतो तेव्हा आपल्याला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते, त्यामुळे बेचव जगण्याला चव येते.

आत्मचरित्र लिहिण्याच्या निमित्ताने आज मला माझ्या मनातील तो कप्पा उघडा करून त्यातील रम्य आठवणींना उजाळा मिळालाय. तर मित्रांनो माझे बालपण ठाणे जिल्ह्यातील एका निसर्गरम्य गावात गेले. तेथील बऱ्याच आठवणी धूसर आणि पुसटपणे डोळ्यांसमोर तरळतात.....

आमचे ते भाड्याचे लहानसे कुडाचे घर, समोर शेणाने सारवलेले अंगण, पुढे श्रीमंत कोळ्यांची विटांची ऐसपैस घरे, घराच्या मागेच फुललेले भाज्यांचे मळे, फुलांचे ताटवे. घरासमोर सुकत घातलेल्या सुकट बोंबलाचा गंध, आणि घरात शिजणाऱ्या मासळीचा आणि तव्यावर खरपूस भाजणाऱ्या तुकड्यांचा गंध आठवून अजूनही तोंडाला पाणी सुटते.

पावसाळ्यातील भातशेती, शेतात जमा झालेल्या पाण्यात मिळणारे खेकडे, चिंबोऱ्या आणि लहान मासे पकडण्याची मज्जा मी कधीच विसरू शकत नाही. मित्रांसोबत खाडी किनाऱ्यातील गाळात चिंबोऱ्या, खुबे, पकडणे हा आमचा नित्याचा उपक्रम असायचा. रानात उगवलेल्या तुरीच्या कोवळ्या शेंगा, कारांदेच्या वेलींना लगडलेले कारांदे तोडणे, अळंबी आणि आंबट चिंबट रानमेवा जमा करून त्यांचा फन्ना उडवण्याची मज्जा अजूनही हवीहवीशी वाटते.

रानातून भटकून आल्यावर कोणाच्याही घरी मिळणारी गरम तांदळाची भाकरी आणि त्यावरील मासळीचा तुकडा आणि त्याची ती अवीट चव आता मिळणे दुर्मिळ योग वाटतो. ते दिवस किती निरागस आणि निर्मळ होते. माझ्या लहानपणी आमच्या जवळील उपनगराच्या स्टेशनला छप्पर पण नव्हते. गावात रेशनचे दुकान पण नव्हते. एकच डॉक्टर आणि एक शाळा.

फाटक्या संसाराचा गाडा ओढणारी माझी आई प्रत्येक महिन्याचे रेशन घेण्यासाठी ट्रेनने ठाणे शहरात जायची. आई गेल्यावर आम्हा भावंडांच्या जीवाला घोर लागून राहायचा. स्टेशनच्या रस्त्याला डोळे लावून आम्ही तिची वाट पाहायचो, आणि मग दूरवरून लहानशा पायवाटेने येणारी आईची आकृती दिसू लागायची. डोक्यावर गव्हाचे पोते,एका हातात तांदळाची पिशवी तर दुसऱ्या हातात घासलेटचा पत्र्याचा डबा आणि काखेत डाळी साखरेच्या पिशव्या. असे हे रेशनचे दुकान घेऊन तारेवरची कसरत करत येणाऱ्या आईची प्रतिमा अजूनही डोळ्यांसमोर लख्ख उजळून येते.

ज्या दिवशी आई ठाण्यावरून रेशन घेऊन यायची त्या दिवशी आमची दिवाळीच साजरी व्हायची. कारण आई ठाण्यावरून बटाटे वडे, भजी, गोळ्या आणि एखादा बिस्कीटचा पुडा हमखास घेऊन यायची. तुटपुंज्या पैशात संसाराचे गाडे चालवून ती कशी बरे काटकसर करायची याचे अजूनही कोडे सुटलेले नाही.

मोठा भाऊ शाळेत जात होता, माझे शाळेचे कुतूहल वाढत होते, परंतु अजून वय झाले नसल्याने माझे नाव शाळेत टाकता येत नव्ह्ते. शेवटी माझ्या हट्टा पुढे आईने एकदा मला शाळेच्या बाईंसमोर नेऊन उभे केले. माझा हट्ट पाहून बाईंनी मला शाळेत यायची परवानगी दिली,आणि मी आनंदात शाळेत जाऊ लागलो. एकच मोठा वर्ग, प्रत्येक विद्यार्थी खाली बसायला गोणपाट नेत होता. त्या एकाच वर्गात तुकडयांनी विभागून बसलेले विद्यार्थी आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यादान देणारी एक सरस्वती बाई. त्यांना आठवून मी अजूनही त्यांच्या चरणी नतमस्तक होतो.

पाटी आणि बसायला गोणपाट घेऊन शाळेत जाताना एक वेगळाच अभिमान वाटायचा. शाळेच्या मागच्या बाजूला खूप मोठे मोकळे रान होते आणि त्याच्यापुढे मोठी खाडी होती. बाई नेहमी आम्हाला सांगायच्या.
"शाळा सुटल्यावर सरळ घरी जायचे, शाळेच्या मागच्या बाजूला फिरकायचे नाही, तेथे भलीमोठी गिधाडे राहतात आणि ते लहान मुलांना उचलून नेऊन खातात"

बाईंचे शब्द आमच्या सगळ्यांच्या मेंदूत चांगलेच कोरले गेलेले होते, परंतु जिज्ञासा आम्हाला स्वस्थ बसू देत नव्हती. एके दिवशी आम्ही मुलांनी ठरवले, शाळा सुटल्यावर गुपचूप मागे जाऊन गिधाडे पहायची. ठरल्या प्रमाणे आम्ही भितभित उघड्या माळरानावर गेलो. पुढे पुढे जात असताना छाती भीतीने दडपून जात होती. काही पाऊले पुढे टाकताच सामोरचे दृश्य बघून भीतीने तारांबळ उडाली. समोर एका मेलेल्या गुरावर भल्यामोठ्या गिधाडांचा कळप तुटून पडलेला होता. आमची चाहूल लागताच त्यातील काही गिधाडे हवेत उडाली आणि आमच्या डोक्यावर घिरट्या घालत ओरडू लागली. आता हे आपल्याला उचलून नेणार या विचारांनी सगळ्यांच्या पोटात गोळा आला आणि आम्ही सगळ्यांनी तेथून धूम ठोकली.

घडलेल्या घटनेने त्या रात्री मला ताप भरला, त्या ग्लानीत मी आईला सगळी घटना कथन करून झालो. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. माझी शाळा बंद झाली. मन खुप दुःखी झाले, परंतु आईच्या निर्णयापुढे जाणे मला शक्य नव्हते.

त्या घटनेच्या पुढच्याच महिन्यात आमच्या घर मालकाने भाडे वाढवले, जे भरणे आम्हाला शक्य नसल्याने आम्हाला ते घर सोडावे लागले आणि आम्ही कधी न पाहिलेल्या आत्याच्या मुंबई मधिल झोपडपट्टी मधील झोपडीत स्थलांतरित झालो. मला आता आश्चर्य वाटते की त्यावेळी आम्ही आमचे समान घेऊन ट्रेनने मुंबईत उतरलो. स्टेशनच्या बाहेर आल्या बरोबर डोक्यावरून प्रचंड आवाज करत एक विमान गेले, आम्ही घाबरून आईला बिलगलो. पहिल्यांदाच पाहिलेल्या इतक्या मोठ्या विमानाला डोक्यावरून जाताना पाहून आमचे डोळे सताड उघडेच राहिले होते. त्या नंतरचे बरेच महिने घराच्या वरून सतत जाणाऱ्या विमानांच्या आवाजाने झोपणे कठीण झाले होते.

मी आता सहा वर्षांचा झालो होतो. मोठ्या बंधू बरोबर मलाही आईने म्युनिसिपल शाळेत घातले. बृहन्मुंबई म्युनिसिपल मराठी शाळा क्रमांक २, या शाळेने माझे आयुष्य बदलवले. माझ्या ज्ञानदात्या शिक्षकांच्या ज्ञानाने मी भाषा समृद्ध होऊ लागलो. माझ्या जाणिवांचा विस्तार होऊ लागला. एक संवेदनशीलता मला व्यापू लागली होती.

बाबांचे व्यसन चरम सीमेला पोहोचले होते. त्याचा परिणाम म्हणजे त्यांना कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यात अपयश येऊ लागले. त्यामुळे संसाराचा गाडा चालवताना आईची ससेहोलपट होऊ लागली. त्यात वडिलांचा दारू पिऊन तमाशा मार आणि शिवीगाळ यामुळे आईचे आणि आमचे आयुष्य नरक झाले होते. इतका त्रास सहन करून खचून जाणारी माझी आई, आमची चिमुकली तोंडे बघून पुन्हा नव्याने उभारी घेऊन संसाराचा गाडा ओढायला तयार असायची. प्रत्येक अकरा महिन्यांनी भाड्याची झोपडी बदलून विंचवाच्या आई सारखा पाठीवर संसार घेऊन फिरणाऱ्या माझ्या आईचे दुःख पाहून माझ्या मनात शिकून मोठे व्हायची जिद्द जागृत झाली. शिकून मोठे व्हायचे आणि आईची या कष्टातून सुटका करून तिला खुप सुख द्यायचे. हेच माझे ध्येय झाले होते.

वडिलांना आमचे शाळेत जाणे म्हणजे वेळेचा अपव्यय आणि शिक्षणासाठी होणारा खर्च व्यर्थ वाटत होता. शाळेचा हा खर्च त्यांच्या डोळ्यात खुपत होता. तरीआम्ही भावंडे शाळेतून घरी आल्यावर राखी बनवणे, टिकल्यांचे पॅकिंग, खुर्च्या विणणे अशी घरात बसून कामे करून घर खर्चाला हातभार लावत होतो.

पालिकेच्या शाळेत सातवी पास झाल्यावर आईने मला दुसऱ्या शाळेत घातले. नविन शाळा, नविन मित्र भेटणार या आनंदावर पहिल्याच दिवशी विरजण पडले. कारण या शाळेत सुखवस्तू घरातील मुलं जास्त असल्याने, माझ्या सारख्या नादारीवर शिकणाऱ्या मुलांना अनेक प्रकारच्या भेदभवांना सामोरे जावे लागले. आता पर्यंत मी मनुष्याच्या स्वभावाचे जे अनुभव घेतले नव्हते ते एकदम अंगावर आले. हे सगळे पचवणे माझ्यासाठी अवघड होते, परंतु आईच्या शिकवणीतून आयुष्याचे हे अंग मला समजले. या सगळ्या कठीण परिस्थितीतुन मार्ग काढून पुढे कसे जायचे हे माझ्या माउलीने मला शिकवले.

पालिकेच्या शाळेत मळक्या विद्यार्थ्यांचे फाटलेले सदरे, तुटलेली बटणे लावून देणाऱ्या माझ्या सरस्वती शिक्षिका आणि छडीचे टोक लावून आपल्या पासून अंतर ठेवायला लावणाऱ्या नविन शाळेतील शिक्षिका पाहून माझ्या बालमनावर आघात झाला होता. त्यात माझ्या अंतर्मनात होणारे बदल मला अस्वस्थ करत होते. हे काय आहे माझ्यात मी इतर मुलांपेक्षा वेगळा आहे का? त्यांच्या सारखा आपला स्वभाव नाही, त्यांचे खेळ आपल्याला आवडत नाहीत. आपला मृदू आणि हळुवार स्वभाव. भावनांच्या उलथापालथी मध्ये माझी खूपच कुचंबणा होत होती.

माझ्या भोवती होणाऱ्या मैत्रिणींच्या गराड्यामुळे आणि माझ्या वेगळेपणामुळे शाळेतील मुलं मला 'बायल्या' म्हणून चिडवू लागली, प्रत्येक गोष्टीत मला गृहीत धरून माझे खच्चीकरण करू लागली. हा प्रकार मला सगळीकडे अनुभवावा लागत होता, या सगळ्या प्रकारामुळे मी आणखीन अंतर्मुख होत गेलो. देवापुढे हात जोडताना मी त्याला हेच विचारात असे की देवा तू सगळ्यांना बनवलेस, मग माझ्यात असे काय वेगळेपण दिलेस की ज्यामुळे मला समाज टोचून घायाळ करतोय. मनाची असह्य घुसमट आणि अश्रू मी कुणालाही दाखवू शकत नव्हतो. त्या बालवयात समजत नव्हते की माझे काय चुकतेय. झाडावरून पडलेल्या कावळ्याचे पिल्लू आणि त्याला टोचून मारणारे कावळे अशी माझी अवस्था होत होती.

वस्तीचा नाका, शाळेचा नाका म्हणजे एखाद्या छळचवणीचे द्वार वाटायचे, आपण कुणाला दिसू नये असेच वाटायचे. या त्रासाला कंटाळून मला बऱ्याच वेळा वाटा बदलून जावे लागत होते. कधी वाटायचे कुठे जाऊच नये, शाळा सोडून द्यावी. गोधडीत तोंड लपवून असहायपणे रडलेले दिवस आठवून आजही अंगावर काटा येतो. आत्महत्या करण्यासाठी रेल्वेच्या जवळही जाऊन आलो होतो, त्यावेळी मग असहाय आईचा चेहेरा समोर आला आणि फक्त तिच्यासाठी आपल्याला जगावे लागेल शिकावे लागेल हे पटले आणि मी तो विचार सोडून दिला.

असह्य त्रासात आईच्या शिकवणीची जादुई फुंकर हे कठीण आयुष्य सुसह्य करत होती. समाजाने दिलेल्या काळ्याकुट्ट अनुभवांनी मी अकालीच प्रौढ होऊ लागलो होतो. माझ्या वेगळेपणाचा एक फायदा झाला होता तो म्हणजे मला आईच्या सगळ्या भावना समजू लागल्या होत्या, त्यामुळेच मी तिची मैत्रीण बनून तिच्या दुःखात साथ देऊ शकत होतो. तसेच माझ्या वर्गातील दुर्बल मुलांना समजून घेऊन त्यांनाही सांत्वना देत होतो.

आईची मदत आणि शिक्षण हेच ध्येय असल्याने खेळ विरंगुळा यापासून मी फार दूर निघून आलो होतो. आईला वाचनाची आवड होती तिचा वारसा आम्हा सगळ्या भावंडांना मिळाला होता. त्यावेळी रस्त्यावर जुनी मासिके, पुस्तके विकत किंवा काही आकार देऊन वाचायला मिळायची. चांदोबा, चंपक, लोटपोट, चंदन, इंद्राजाल कॉमिक्स या सगळ्यात मी रमू लागलो. पुढे नववी आणि दहावीत गेल्यावर 'गुरुनाथ नाईक, एस.एम. काशीकर, बाबुराव अर्नाळकर, सुहास शिरवळकर, भा. रा. भागवत या लेखकांच्या कथांनी वृद्धिंगत होत गेलो. त्या वयातच आम्ही 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय' मध्ये मेंबर झालो. तेथील दिग्गज लेखकांच्या पुस्तकांचा खजिना तर वेड लावून गेला. 'वाचाल तर वाचाल' या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आम्ही वाचून ज्ञानाचा खजिना जमवत होतो.

दहावीची परीक्षा जवळ असतानाच माझे आजारी वडिल देवाघरी गेले आणि मी पोरका झालो, वडिल गेल्यावर मला उमजले की स्त्रियांसाठी कमकुवत का असेना 'कुंकवाचा धनी' अस्तित्वात असणे किती महत्वाचे असते त्याचा अनुभव आला. एक विधवा असहाय स्त्रीला पुरुषसत्ताक समाजात किती कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते हे मी आईच्या डोळ्यांनी पाहिले आणि अनुभवले. हे सगळे मला माझ्यातील वेगळेपणाच्या शक्तीने समजत होते.

दहावी पास झाल्यावर मी रात्रीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले, दिवसा काम करून घराला हातभार लावणे अत्यावश्यक होते. आता पर्यंत मी स्वतःला ओळखले होते, समलिंगी असणे त्यावेळी गुन्हा होता. एलजीबीटीक्यु समूह भूमीगत रीत्या एकमेकांना भेटत होता. इंडियन पिनल कोड 377 नुसार सगळे समलैंगिक हे कायद्याच्या कक्षेत गुन्हेगार होते. साध्या संशयावरूनही आमच्या समूहातील मुलांना अडकवले जात होते. एखाद्याला या भावनांसाठी ब्लॅकमेल करून त्याचे लैंगिक शोषण केले जात होते. 'सगळ्यांना सांगेन की तू काय आहेस' या वाक्यात किती मोठी मरण भीती होती हे मी स्वतः अनुभवले आहे. शाळा, कॉलेज, हॉस्टेलस, या ठिकाणी आमच्या असहायतेचा फायदा घेऊन बलात्कार होत होते आणि त्याची वाच्यता कुठे करता येत नव्हती.

पुढे प्रसिद्ध पत्रकार 'अशोकराव कवि' यांनी या अन्याया विरोधात चळवळ सुरू केली. लोकं जमा होऊ लागली, एकी निर्माण झाली आणि काही अंशी आमच्यात या अन्याया विरुद्ध लढण्याचे बळ येऊ लागले. समलैंगिक समूहाचे आधार स्तंभ अशोकराव कवींनी 'हमसफर' नावाची एलजीबीटीक्यु समूहाच्या उद्धारासाठी संस्था काढली. या सगळ्या चळवळीत माझा खारीचा वाटा आहे. कॉलेजमध्ये माझी ओळख अजय बरोबर झाली. आम्ही एकमेकांना एका भेटीतच ओळखले होते की आम्ही दोघे समान भावनांचे शिकार आहोत.

अजय बरोबर गाढ मैत्री झाल्याने माझे त्याच्या रमाबाई वस्तीमधील घरी येणेंजाने सुरू झाले. त्याच्या आईला लहानपणीच यल्लम्मा देवीला सोडले असल्याने त्यांच्या घरात देवीचा मोठा देव्हारा होता. आयुष्याचा विस्कोट झालेल्या त्या माउलीला मुलाच्या आयुष्याची फारच चिंता होती. त्यामुळे तिने पोटाला चिमटा काढत अजयला शिकवले होते. त्या माऊलीची माझ्यावर खूप माया आणि विश्वास होता. या जोगतपणाच्या दलदलीत आपल्या मुलाचा बळी जाऊ नये म्हणून तीने मला त्याचे करियर बनवण्यात साथ देण्याची जबाबदारी दिली होती.

अजयच्या घरी आणि वस्तीत आई यल्लम्मा, रेणुका, सप्तश्रृंगी माता, आणि जोगती समुदायात होणाऱ्या देवाच्या कार्यक्रमामुळे मला समलैंगिक अंश असलेला 'कोती, जोगती, तृतीय पंथी' समुदाय जवळून समजला. त्याच बरोबर देवदासी, मुरळी सारख्या देवाला सोडलेल्या मुलींचे आयुष्य श्रद्धेच्या आवरणात कसे नासवले जाते याची जिवंत उदाहरणे मी पहिली. या अंधश्रद्धा फक्त पुरुषसत्ताक समाजाचे लैंगिक चोचले पुरे करायला बनवल्या गेल्यात हे कोडे मला येथेच उलगडले.

समलैंगिक कल असलेल्या मुलामुलींचे अगदी घरातील पुरुषांकडून, नात्यांमधील काका मामांकडून कसे लैंगिक शोषण केले जाते हे मला समजले. कारण मलाही या अनुभवांमधून जावे लागलेले होते. दिवस जात होते मनात काही ध्येय निश्चित होत होते, जीवनाला दिशा दिसत होती की एके दिवशी अजयने खुप मोठा गौप्यस्फोट केला 'त्याचे सावत्र वडिल लहानपणापासून त्याचे लैंगिक शोषण करत होते, वडिलांच्या धमकीमुळे त्याने ही गोष्ट आजपर्यंत लपवून ठेवलेली होती.

अजयला मी आधार देऊन अन्यायाला वाचा फोडून त्याचा सामना करण्यास बळ दिले. पुढे त्याच्या वडिलांना आईने हाकलून दिले, परंतु त्या माऊलीच्या मनात एक सल राहून गेली की आपण आपल्या मुलाचे संरक्षण नाही करू शकलो. या घटनेने मी मनात ठरवले की या तळागाळातील शोषित लैंगिक अल्पसंख्याक समूहासाठी आपले आयुष्य वेचायचे. येथेच अजय आणि इतर समविचारी तरुणांनी एकत्र येऊन एका सामाजिक संस्थेची निर्मिती केली, आणि कामाचा झंझावात सुरू झाला.

कॉलेज सांभाळून संस्थेच्या कामाने महाराष्ट्रातील एलजीबीटीक्यु समूहातील माझ्या लोकांना, किन्नर तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांना त्यांच्या संस्थांना समजून घेता आले. त्यांची मने, त्यांची दुःखे आणि समलैंगिक समूहाच्या दुःखात कुठेतरी एक समानतेचा धागा दिसला, ज्यामुळे हे समूह एकमेकांशी भावनिक जोडलेले दिसले. लैंगिकतेला अनैसर्गिक, अनैतिक समजून या सगळ्या वंचित समूहाचा आरोग्याचा अधिकाराची डावलला जात होता. त्यांना हॉस्पिटलमध्ये कलंकाची वागणूक देण्यात येत होती. त्यांच्या आरोग्याच्या हक्कासाठी आम्ही पुण्यातील बुधवार पेठ, आणि मुंबई मधील कामाठी पुरा येथे चळवळ सुरू केली. येथील रात्रीची दुनिया किती भयावह असते हे 'गंगुबाई कोठेवली' सिनेमातून दाखवून दिलेले आहे. परंतु तेथील प्रत्येक गल्लीत काम करताना मी ते दुःख डोळ्यांनी पाहिलेले आहे.

या वंचित समूहाच्या आरोग्यहक्कांच्या चळवळींचे काम सुरू होते, त्यांच्या बरोबर होणार भेदभाव दूर करण्यासाठी समाजप्रबोधनाचे कार्य सुरू होते की आणखीन एक मोठी आफत येऊन आदळली ती म्हणजे 'एचआयव्ही' हा या समूहात आढळून आलेला व्हायरस. या रोगाने या समूहभोवती एक कलंकाचे वलय निर्माण केले. एक समलैंगिक किंवा देह विक्री करणारी म्हणून सामाजिक कलंक माथ्यावर त्यात एचआयव्ही संसर्गित असणे हा दुहेरी कलंक लागला. या दोन कलंकां साहित जगताना आमच्या या समूहाला समाजात पराकोटीची हीन वागणूक मिळत होती. त्याविरुद्ध भारतात जी चळवळ सुरू झाली त्यात माझा खारीचा वाटा उचलत मी घडलो.

आईला तिच्या म्हातारपणात सुख देता आले यातच माझ्या जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटते. आजही मी एलजीबीटीक्यु समूहाच्या संस्थांमधून काम करतो, एखाद्याच्या डोळ्यात आनंद देण्याचे काम केले की जे समाधान प्राप्त होते त्याला शब्दात मांडता येत नाही. आमच्या समूहाचा कलंकित चेहेराच फक्त समाजाने पुढे केलेला असल्याने त्यांच्या आयुष्यातील काळोखाची बाजु दाखवण्याचा प्रयत्न मी माझ्या कथांमधून नेहमीच करतो हेच माझ्या आयुष्यातील सुख आहे.

कधी वाटले नव्हते मलाच माझी कथा लिहावी लागेल, पण आज स्वतःकडे या आत्मचिंतनाच्या निमित्ताने बघताना फार समाधान वाटते. मी पैसे नाही तर माझी माणसे कमावली. माझी माणसेच आज माझी खरी संपत्ती आहे.