माझं 'माहेर' पण
लग्न झालेल्या साऱ्या सासुरवाशीनच हक्काचं ठिकाण म्हणजे माहेर. सासर कितीही समृद्ध असू दे, नवरा कितीही प्रेमळ असू दे, माहेरची आठवण आल्याबरोबर प्रत्येक स्त्रीच मन हळवं होऊन जातं. आणि नकळतच," वाटेनं माहेराच्या मन धावत जातं".
सासरच्या उंबरठ्याचे माप ओलांडताना वाटतं की आता हे नवं आयुष्य सुरू झालं आहे . किती भांबावलेली, मनात घाबरलेली असते प्रत्येक नववधू . सासरच्या चालीरिती, परंपरा, सणवार, नवऱ्याची मर्जी, सासूसासऱ्याचे हवं नको, दीर नणंदा यांचे स्वभाव- आवडीनिवडी सांभाळतांना, कधी चुकताना, कधी गोंधळतांना मनाच्या एका कोपऱ्यात माहेर हळूच साद घालत असतं.
मला आठवतं माझ्या पहिल्या दिवाळ सणाला भाऊ मला घ्यायला सासरी आल्यावर मला किती आनंद झाला होता. सामानाची आवरा आवर करताना, कपड्याची बॅग भरताना डोळे सतत पाणावत होते, कारण मला माहेराची ओढ लागली होती. पती देवांच्या सूचनांकडे तर माझे लक्षच नव्हते," ते वेड लावणारे निरोप आणि हे ओढ लावणारे बोलावणे" मी तर पूर्ण बावरले होते.
" माहेराहून गलबत आले
मला सखये स्वप्न जडे
हृदया मधल्या गुपिता मध्ये
निशिगंधाचे फुल पडे"
कवी ग्रेस यांनी माझ्या मनस्थितीचेच जणू वर्णन केले या या ओळींमध्ये.
माहेरच्या उंबरठ्यावर वहिनी न ओवाळले माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवून आईने लिंबलोन केलं, लहान भाची धावत माझ्या कडेवर येऊन बसली. हे सगळं इतकं सुंदर, सहज होतं की माझं मन आनंदाचे पंख लावून क्षणात आकाशात मुक्त विहारच करायला लागलं.
माहेरची सकाळही मग आळसावलेली असते. इथं उशिरा उठलं तरी कुणाचे टोमणे नसतात, नवऱ्याच्या डब्याची घाई नसते की वटारलेले मोठे मोठे डोळेही नसतात. ह्या सकाळ साठी प्रत्येक माहेरवाशीण मनापासून आसुसलेली असते कारण उशिरा उठल्यावरही आई तिच्या हाताने आल्याचा चहा करून देते. लहान भावाची बायको चार-चार वेळा विचारत असते वन्स आज काय करायचं नाश्त्याला? तिकडे वडील माझ्या आवडीचे खास याच गावात मिळणारे जिन्नस आणायला बाजारात गेलेले असतात. चहा नाश्ता झाल्यावर इवलीशी भाची- ती जणू माझं प्रती रूपच, माझ्या मांडीवर बसून मला किती प्रश्न विचारते, आत्या तू आता इथं का राहत नाहीस ग? आत्या नवरा म्हणजे कोण ग? तिचे बाळबोध प्रश्न मनातल्या सगळ्या काळजा, दुःख, बोच कमी करतात. आत्या तू मला आज गोड शेवया करून देते का? आत्या तुझ्यासारख्या खव्याच्या पोळ्या कुणालाच जमत नाही बघ, आत्या तू मला आत्ताच खीर करून दे बरं, तिचं गोड गोड बोलणं, माझं कौतुक करणं मनाला आनंदित करतं. तोपर्यंत मोठ्या वहिनीचा स्वयंपाक तयार असतो पण भाची ची ची फर्माईश पूर्ण करायला मी स्वयंपाक घरात जाताच, दादा वहिनीला ओरडतो" अगं कालच तर आली ती ती आणि आज तिला स्वयंपाक करायला लावणार का तू? मग वहिनी सांगते" तुमच्याच लेकीचे लाड पुरे करणे सुरू आहे बरं का".
दुपारी निवांत आईच्या शेजारी बसून, आईचं दुखणं- खूपण, बाबांचं औषध-पाणी विचारल्यावर हमखास सासरचा विषय निघतोच, तिकडच्या माणसांचे वागणे, रागावणे, हेवेदावे सांगितले की आई म्हणते, " अगं असं हे चालायचं, मी इथे आली तेव्हाही असंच काहीसं होतं बरं का". आईच्या समजूतदार स्वभावाची मग परत एकदा पोच मिळते. कधी बाल मैत्रिणींची फोनवर मस्त निवांत गप्पा तर कधी छान साखर झोप यात दुपार कशी संपते ते कळतच नाही.
संध्याकाळी भाची भाच्यांना बगिच्यात, किंवा आईबरोबर मंदिरात जाणं होतं. कधीकधी घरीच गप्पा मारणं, भाच्यांना गोष्टी सांगणं, त्यांचा दंगा बघून मलाही मी लहान झाल्याचा भास होतो. संध्याकाळचा बेतही माझ्या आवडीचा असतो, बाजरीची किंवा साधी डाळ-तांदळाची गरम गरम खिचडी, त्याला सोबत करते दही मिरची, सांडगी आणि मुगाचा पापड सोबतच आंबट कडी चा थाट असतो तर कधी मिसळीच्या भाकरी बरोबर वांग्याचं भरीत तर कधी काकडीच्या थालीपीठला शेंगदाण्याची लसूण घातलेली चटणी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा असा अस्सल वऱ्हाडी थाट असतो. गोळा भाताबरोबर, लाल मिरच्या तळून, कांदा बारीक कापून चिंचेचा मस्त आंबट -गोड- तिखट सार पोटाची आणि मनाची तृप्ती करतो.
रात्री लहान मोठ्या भावानं बरोबर लहानपणाच्या खोड्या, गमती जमती, एकमेकांची गुपित , आठवणी सांगण्या ऐकण्यात रात्र कशी संपते ते कळतच नाही. माहेरचे दिवस अगदी जादूभरे असतात . बालपणात नेणारे, आई-वडिलांच्या प्रेमाने ओथंबलेले, भाऊ भावजय च्या मायेचे. आई मला एकदा म्हणाली होती," बाई ग मी असेन किंवा नसेन पण हे माहेर, हा माझ्याकडून मी तुला दिलेला आहेर आहे तो गोड मानून घे" , तेव्हा डोळ्यात टचकन पाणी आलं आमच्या दोघांच्याही.
मी लहान होती तेव्हा आई नेहमी म्हणायची," तू या घरची लेख आहे आणि नेहमी राहशील, आज माहेरी आहेस पण उद्या भूरकन सासरी, नवऱ्याच्या घरी उडून जाशील", आणि झालंही तसंच. राखी पौर्णिमेला, भाऊबीजेला दादा-वहिनी चा फोन येतो, मला माहेरी बोलावलं असतं, वहिनी म्हणते वर्षातून एकदातरी माहेरपणाला या, निदान गौरी-गणपती मध्ये तरी सवड काढा, असा आग्रह असतो तेव्हा मन कावरेबावरे होऊन जात .
आई आता थकली होती, पण तिच्या सुरकुतल्या-थरथरत्या हातातली आणि चेहऱ्यावरची माया तसूभरही कमी झाली नव्हती. उन्हाळ्यात " माहेरी" सगळ्या नातवंडांचा गोतावळा जमला किती म्हणायची," माझं घर आता गोकुळ झालं आहे, मुली चार दिवसाच्या माहेरवाशिणी लहान असतात तोपर्यंत घरादारात चिवचिवत असतात आणि सासरी गेल्या कि डोळे पाणावतात.
मागच्या वर्षी आई गेली, वाटलं आता बाबा हि नाही आणि आई पण गेली, माहेर सुटलं आपलं पण जेव्हा लहान भावाची बायको ताई -वन्स असं म्हणून गप्पा मारते, भाचवंड अंगाखांद्यावर खेळतात, खाऊसाठी माझ्यावर रुसून बसतात, लडिवाळ हट्ट करतात तेव्हा वाटतं माझी मायेची माणसं आहे अजून इथं. आईच्या खोलीतल्या तिच्या रिकाम्या पलंगाकडे बघून जेव्हा डोळे भरून येतात तेव्हा मोठी वहिनी मायना पाठीवरुन हात फिरवते आणि मन अगदी गलबलून येते, मोठ्या वहिनी ची अशी आईची माया लावणे, लहान भावाच्या बायकोचं मैत्रिणी सारखं वागणं, भाची मंडळांच्या रुसव्या फुग्याने, मनाला जरा धीर आणि उभारी येते आणि सहजच 'साधी माणसं' चित्रपटातलं जयश्री गडकर यांचे गीत आठवतं,
" सावळा बंधुराया साजिरी वहिनी बाई
गोजिरी शिरपा हंसा माहेरी माझ्या हाई
वाटेनं माहेराच्या धावत मन जातं
गुलाब जाई जुई मोगरा फुलवीत
माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं"
सासुरवाशिणीला माहेराहून भरजरी साड्या, उंची रेशमी शालू पैठण्या, महागडी गिफ्ट, कीमती उपहार हे काहीही नको असतं तिला हवी असतात तिच्या मनातल्या कोपऱ्यातली माहेरची हक्काची हात भर जागा. ज्या कोपर्यात तिला समजून घेणारी, हक्काची, प्रेमळ माणसं असावी, तिला माया लावणारी समंजस वहिनी आणि बहिण असावी. वन्स -ताई आपण असं करू या तसं करू या, चला गप्पा मारू या असा सारखा तगादा लावणारी लहान भावाच्या बायकोचा रूपात मैत्रीण मिळावी, आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना धीरानं उभा राहण्यासाठी मायेची प्रेरणा तिला ह्या माहेरा कडून मिळावी एवढीच तिची प्रामाणिक इच्छा आणि अपेक्षा असते.
 |
ReplyForward
|
|
|
|