Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १

अपघाताने दुसऱ्याच मुलाशी नाईलाजाने लग्न होते
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १

कुमार रूमचे दार उघडून बाहेर पडणार इतक्यातच त्याचे बाबा श्रीरंग रूममध्ये शिरले,

"अरे कुमार तू कपडे का बदललेस? बाहेर सर्व विधींची तयारी सुरू आहे आणि तू अचानक कुठे चाललास?"

"बाबा मी आलोच पाच मिनिटात. पण आता मला जाऊदे. मी इथे खालीच जाऊन येतोय."

"अरे पण एव्हढे काय महत्त्वाचे काम आहे की तू असा घाईघाईत जातो आहेस."

"बाबा प्लिज तुम्ही बाजूला व्हा मी येतो लगेच."

"अरे तू आईला तरी काही बोललास का? कोणाला तरी सोबत घेऊन जा."

"लगेच यायचं म्हणून मी कोणालाच काही सांगितलं नाही. तुम्ही इथे आलात म्हणून तुम्हाला सांगतोय. लग्नाच्या कपड्यात बाहेर कसा जाणार म्हणून कपडे बदलले. तुम्ही इतक्यात कोणाला सांगू नका मी बाहेर गेलोय ते. मी आलोच."

जवळजवळ बाबांना दूर करतच कुमार तिथून घाईने बाहेर पडला. त्याला कोणी पाहू नये म्हणून त्याने डोक्यावर कॅप घातली होती. भरभर पावले उचलून तो लग्नाच्या हॉल मधून बाहेर आला आणि त्याने निःश्वास सोडला.

इथे रूममध्ये बाबांना काही कळतच नव्हतं की हा नक्की कुठे गेला असेल. खरं तर कुमार असा बेजबाबदार मुलगा नाही. एकतर त्याची नोकरी पण विशेष गुप्त मिशन असलेल्या संस्थेत नव्हती. चारचौघांसारखी नोकरी त्याची. असे काय घडलं की तो कोणालाच काही न बोलता गेला. त्याने कबूल केलं आहे पाच मिनिटात येण्याचं म्हणजे तो येईलच. नाही म्हटलं तरी श्रीरंग रावांना थोडं टेन्शन आलं होतं. तो येईपर्यंत त्यांना धाकधुक होती. अशातच कुमारची आई सुमन रुम मध्ये आली.

"अहो काय हे मी बाहेर हॉल मध्ये तुम्हाला शोधतेय आणि तुम्ही इथे निवांत बसला आहात! कमाल आहे तुमची. कुमार आणि विशाल दोघं कुठे दिसत नाहीत. मी बाहेर गेले तेव्हा कुमारची तयारी झाली होती आणि दोघेही इथेच गप्पा मारत होते. अहो तुम्ही काहीच बोलत का नाही."

"अगं सुमन शांत हो. मी इथे आलो आणि कुमार घाईघाईने कपडे बदलून पाच मिनिटांसाठी बाहेर गेला आहे. विशाल इथे नव्हताच."

"अहो बाहेर सर्व विधी चालू असताना तुम्ही त्याला जाऊच कसं दिलं. कुठे आणि कशासाठी जातोय काहीच सांगितलं नाही का?"

"त्याने मला कसली संधीच दिली नाही. तो एकटाच गेला आहे. लवकर आला तर बरं होईल."

"मला तरी पटकन बोलवायचं. मी अडवलं असतं त्याला. आता कधीही गुरुजी नवऱ्या मुलाला बाहेर बोलावतील. काय उत्तर द्यायचं त्यांना."

"तू जरा गप्प बस. येईल तो. तू पण इथेच थांब. गुरुजींचा निरोप घेऊन जो येईल त्याला आपण थोडा वेळ काहीतरी बहाणा करायला सांगू."

"थांबा मी बाहेर विशालला बघते. तो त्याला एकट्याला सोडून बाहेर कसा गेला."

(लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा कुमार बाहेर गेला आहे. तो येईल का लवकर परत. ह्यासाठी पुढचे भाग वाचत रहा)

क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all