Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २

अपघाताने दुसऱ्याच मुलाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग २

श्रीरंगराव रूममध्येच डोक्याला हात लावून बसले होते. सुमनताई बाहेर हॉलमध्ये विशालला शोधत होत्या. इतक्यात त्यांना विशाल कोणाशी तरी बोलत असलेला दिसला. विशाल त्यांचा भाचा, धाकटी बहीण इंदूचा मोठा मुलगा. त्या लगबगीने विशाल जवळ गेल्या आणि त्याला हळू आवाजात म्हणाल्या,

"विशाल जरा पटकन रूम मध्ये ये."

"हो चल आलोच."

सुमन ताईंचा चालण्याचा वेग वाढला होता. त्यामुळे विशाल पण थोडा विचार करतच त्यांच्या बरोबर रुम मध्ये आला. सुमन ताईंनी पटकन दरवाजा लावून घेतला.

"विशाल तू इथे कुमार बरोबर त्याची तयारी करायला मदत करत होतास ना! मग आता कुमार कुठे आहे. तो इथे नाही. तू का गेलास बाहेर त्याला सोडून?"

"मावशी त्याची तयारी झाल्यावर तो मला म्हणाला की त्याचा घसा खवखवल्यासारखा वाटतोय. पूर्ण दिवस उभे रहायचं आहे. इथे साधं पाणी आहे. जरा मला एक ग्लास गरम पाणी आणून दे. घसा शेकला जाईल. मी लगेच गेलो आणि पाणी घेऊन इथे आलो तर काका इथे बसलेले. त्यांनी पाणी ठेवून मला जायला सांगितलं. म्हणून मी बाहेर गेलो."

"बरं तू इथे असताना तो तुला काही बोलला का की त्याला पाच मिनिटांसाठी बाहेर जायचं आहे वगैरे."

"म्हणजे कुमारला कदाचित बाहेर जायचं होतं म्हणूनच मला पाणी आणायला पाठवलं असेल. असा काय हा. मी सकाळपासून त्याच्याबरोबर होतो. त्याला कुठे जायचंच होतं तर मी गेलो असतो त्याच्याबरोबर."

"आता काय करायचं. तो जाऊन पंधरा मिनिटे झाली. कुठे शोधायचं याला!"

"मावशी पण आज सकाळपासून तो जरा गप्प गप्प होता. मला वाटलं की लग्नाचं त्याला दडपण आलं असेल. मी त्याला बोललो पण अरे सगळ्याच मुलांची हीच अवस्था होते भले मग त्यांचा प्रेमविवाह असो की ठरवून केलेलं लग्न असो."

"तेव्हातरी तो काय बोलला का!"

"अगं नाही ना. मी त्याला हसविण्यासाठी म्हटलं अरे लग्न झालेल्या मित्रांकडून टिप्स घे. किंवा माझं लग्न झालं नसलं तरी मी देऊ शकतो बरं का खास तुझ्यासाठी टिप्स. तरी पण तो गप्पच होता."

"हे बघा आता काय झालं त्याचा विचार करण्यापेक्षा आता पुढे काय करायचं त्याचा विचार करा." त्यांची चर्चा ऐकत असलेले
श्रीरंगराव उद्वेगाने बोलले.

"ऐक विशाल तू कोणाला कळू न देता जरा तुझ्या मित्रांना सांगून कुमारचा शोध घ्यायचा प्रयत्न कर. तोपर्यंत इथले आम्ही सांभाळून घेतो."

इतक्यात बाहेरून दारावर कोणीतरी टकटक केलं. सुमन ताईंनी त्यातल्या त्यात चेहरा ठाकठीक केला आणि दरवाजा उघडला. श्रीरंग रावांचे धाकटे बंधू सारंग बाहेर उभे होते.

"दादा वहिनी कुमार तयार झाला ना, चला आता त्याला बाहेर घेऊन या. गुरुजींनी विधींसाठी तुम्हाला तिघांना बोलावलं आहे."

"भाऊजी आम्ही येतोच बाहेर. अहो कुमारच्या पोटात जरा दुखतंय. वॉशरूम मध्ये गेला आहे. सांगा गुरुजींना."

"या लवकर. काही औषध मागवायचे असेल तर मला सांगा."

"हो नक्कीच."

"विशाल जा तू सांगितलेलं काम कर."

अर्धा तास होऊन गेला तरी कुमार आला नव्हता. दोघांचेही धाबे दणाणले होते. बाहेर इतकी मंडळी जमली आहे. काय सांगायचं! सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वधू कडच्यांना काय उत्तर द्यायचं.

(आता काय करतील सुमन ताई आणि श्रीरंगराव. त्यांच्यावर नामुष्कीची पाळी आली होती. काय होईल ते पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all