दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ३
बाहेर विधी चालू होते तिथे समिधा सर्वांच्या हालचाली टिपत होती. काहीतरी गोंधळ झाला हे तिला कळत होतं. गुरुजींनी एकदोनदा कुमार आणि त्याच्या आई बाबांना बाहेर यायला सांगितलं तरीही ते आले नाहीत. शेवटी गुरुजी म्हणाले तुम्ही आता थोडा वेळ तुमच्या खोलीत आराम करा. तुम्हाला मी परत बोलावतो. नक्की काय ते कळत नव्हतं परंतु समिधाच्या मनात येत होतं की नावाप्रमाणे आपल्या आयुष्याची आहुती द्यावी लागणार की काय. आई बाबा बाहेर थांबून काय चाललंय त्याचा कानोसा घेत बाहेरच थांबले. समिधा आतमध्ये येऊन जरा खुर्चीवर निवांत बसली. तिच्या मनात आलं आपलं मनोज बरोबर लग्न झालं असतं तर आज ही अशी अनिश्चितता जाणवली नसती. त्या अल्पावधीत तिच्या डोळ्यांसमोरून तिचा भूतकाळ सरकून गेला.
समिधा, सुभाष आणि सुषमा सावंतांची पहिलीच लेक. तिचा जन्म झाल्यावर दोघांच्याही आनंदाला पारावर उरला नाही. वन रूम किचन इतक्या तुटपुंज्या जागेत त्यांचा संसार होता. अगदी लहानपणापासूनच समिधा हुशार होती. ती चार वर्षांची झाल्यावर तिला कळलं आपण ताई होणार आहोत. ती खूपच आनंदली. पण दुसरी मुलगी झाल्यामुळे सुभाष नाराज झाला. त्यांना मुलगा हवा होता. त्या नंतर समिधा आठ वर्षांची झाल्यावर ती पुन्हा ताई झाली. आता सुद्धा तिला बहिणच झाली. सुभाष खूपच निराश झाला. एकतर तो एकटाच कमावणारा आणि महागाईचा भस्मासुर आ वासून उभा होता. सुषमा घरगुती पदार्थ विकून त्यांच्या संसाराला हातभार लावत होती.
समिधा आता बारा वर्षांची झाली होती. एक दिवस ती रात्री अभ्यास झाल्यावर पाणी प्यायला किचन मध्ये आली तेव्हा तिच्या कानावर आई बाबांचा संवाद पडला,
"सुषमा आपण अजून एक शेवटचा चान्स घेऊया ना. मला आपल्या घराण्याला वारस पाहिजे."
"अहो तुम्हाला झालंय तरी काय. तीन मुली पदरात आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, लग्न. तीन मुली उजवायच्या म्हणजे काय खाऊ आहे का! नशीब तिघीही दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार आहेत. मोठीची पुस्तके, कपडे तिच्यामागची वापरते."
"हो ना आपल्या मुली तुझ्या सारख्याच खूप समंजस आहेत. आता ह्यावेळी जे पण काही होईल त्यानंतर आपण थांबू."
"नाही आता तर शक्य नाही. मी आता या गोष्टीला तयार नाही."
"तयार नसशील तर मुलींना घेऊन माहेरी जा. मी बघेन काय करायचं ते."
"इतक्या वर्षांचा संसार झाल्यावर ही भाषा तुमच्या तोंडी शोभते काय."
समिधा ते ऐकून बाहेर आली. तिच्या मनात आलं अजूनपण बाबांना मुलगा हवा आहे. आपल्यात काय कमी आहे. मी, सायली आणि सरला तिघीही अभ्यासात हुशार आहेत. तसं पण आपल्याला एव्हढे कळतं की हल्ली मुलीच मुलांपेक्षा आई वडिलांकडे जास्त लक्ष देतात. बाबांचे हे मुलगा पाहिजे विचार तिला खूप मागासलेले वाटले. त्या नकळत्या वयात तिने मनाशी निश्चय केला आपल्याबद्दल बाबांना आपला अभिमान वाटेल असंच वागायचं. त्यांची मान कधीच खाली गेली नाही पाहिजे.
त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिने शाळेतला पहिला नंबर कधीच सोडला नाही. ती तिच्या लहान बहिणींचा पण अभ्यास घ्यायची. बारावी झाल्यानंतर ती लहान मुलांच्या शिकवण्या घेऊ लागली आणि बाबांना थोडाफार हातभार लावू लागली.
इतक्यात बाहेर लग्नाच्या हॉलमध्ये काहीतरी आवाज येऊ लागले. तिने विचार केला की जे काय असेल ते आपल्याला कळेलच. ती पुन्हा तिच्या विचारश्रृंखलेत गुंग झाली.
क्रमशः
(समिधाच्या बाबांचा मुलगा हवा हा विचार पूर्णत्वास जाईल का पाहूया येणाऱ्या भागांत)
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा