Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४

अपघाताने दुसऱ्याच मुलाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ४


सुभाष आणि सुषमा यांच्यामधील `मुलगा हवा` ह्या विषयावरून झालेल्या संवादामुळे काही काळ अबोला सुरू होता. समिधाला ते कळत होतं. तिच्या मनात आलं आई जर खरंच आपल्या तिघींना घेऊन माहेरी गेली तर आपलं आयुष्य खूप बदलून जाईल. आईच्या माहेरची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती. आजी, आजोबा, मामा आणि मामी खूप चांगले आहेत. तिथे आपलं स्वागतच होईल. पण बापाने टाकलेली मुलं म्हणून आपली उपेक्षाच होईल.

काही दिवसांनी बाबांनी आईला अगदी लाडात येऊन म्हटलं,

"ऐकले का सुषमा मला पुढल्या महिन्यापासून पगारवाढ होणार आहे. तुला आणि आपल्या लाडक्या लेकिंना काय घ्यायचं."

तेव्हा समिधाच्या लक्षात आलं की बहुतेक बाबांनी आपले पुरुषी वर्चस्व गाजवलेलं दिसतंय. पुरुषांची ही मानसिकता कधी बदलणार. आज स्त्रियांनी सर्व क्षेत्र काबीज केली आहेत. आई गरोदर असल्याचं कळल्यावर ती आईची खूप काळजी घेऊ लागली. ह्या वेळी आई अजिबात प्रसन्न दिसत नव्हती. आईचे दिवस भरल्यावर आईला हॉस्पिटल मध्ये नेलं. बाबा खूप उत्साहात होते. ते सुषमाला म्हणाले,

"सुषमा ह्या वेळी माझा वंशाचा दिवा या पृथ्वीतलावर येणारच. त्यानंतर आपल्या जीवनात फक्त आणि फक्त आनंदच असेल." त्याही परिस्थितीत धीर करून समिधा त्यांना म्हणाली,

"तुमची ईच्छा पूर्ण होऊ दे. पण जर आता पण मुलगीच झाली तर तुम्ही काय कराल?"

"काय करणार! जशी तुमची जबाबदारी घेतली आहे तशीच तिची पण घेईन."

"पण बाबा एक लक्षात ठेवा हयात आईचा काही दोष नसेल आणि तुम्ही आई आणि आम्हा सगळ्यांशी आता वागता तसेच वागाल."

"हो बाळा, हेच माझं प्राक्तन समजून वागेन."

देवाच्या इच्छेनुसार त्यांना चौथी पण मुलगीच झाली. त्यानंतर मुलगा हवा हा सुभाषचा हट्ट तिथेच थांबला. घरात अजून एक माणूस वाढलं आणि मोठी बहिण म्हणून समिधा वर जास्त ताण पडू लागला.

समिधा मोठी होत होती. बारावी नंतर शिकवण्या घेऊन घरात मदत करत होती. कॉलेजचे मोरपंखी दिवस तिला खुणवत होते. अभ्यासाबरोबर ती इतर स्पर्धांमध्ये पण भाग घ्यायची. सगळीकडेच ती चमकत होती. ती एफ वाय बीकॉम ला असताना तिला सिनिअर असलेल्या मनोजशी तिची एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने ओळख झाली. समिधा मुळातच खूप देखणी होती. गव्हाळ वर्णाची, मध्यम उंचीची, कमनीय बांध्याची समिधा बघता क्षणीच सर्वांचे लक्ष वेधून घ्यायची. तिचे काळेभोर बोलके डोळे आणि सरळ रेशमी केस नजरबंदी करायचे. मनोज श्रीमंत आणि एकदम राजबिंडा होता. सावळा वर्ण, पावणेसहा फूट उंची, नागमोडी वळणाचे केस त्याला शोभून दिसायचे. त्याचा आवाज एखाद्या नायकाला शोभेल असच होता.

समिधा जुन्या आठवणींमध्ये रंगली असतानाच रुम बाहेरून मोठ्या आवाजात बोलण्याचे आवाज येऊ लागले. तिने दार उघडून पाहिले. तिच्या बाबांशी नातेवाईक तरुणांमधील दोघे तिघे आवेशाने बोलत होते.

"काका त्या नवऱ्या मुलाच्या वडिलांना एका कोपच्यात घेऊन विचारा, बघा कसे घडाघडा बोलतील ते. अरे आपला मुलगा कुठे गेला ते बापाला माहीत नसेल काय! त्यांना काय हुंडा बिंडा पाहिजे का. फोडून काढायला पाहिजे अशा लोकांना."

"अरे तुम्ही शांत रहा. ते लोक असे नाहीत. माझ्या माहितीतले आहेत. कुमार कुठे त्यांना खरंच माहीत नसणार. थांबा, असा घाईघाईत निर्णय घेऊन चालणार नाही. आपल्याला थोडा वेळ वाट पहावी लागेल."

इतकं बोलून सुभाषराव आणि सुषमा समिधाला धीर द्यायला रूम मध्ये आले.

क्रमशः

(सुभाष राव आणि सुषमा लेकीला कसा धीर देतील पाहूया पुढील भागात)


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all