Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ६

अपघाताने दुसऱ्याच मुलाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ६


हो ना करताना कुमारच्या लग्नाचा क्षण येऊन ठेपला. सकाळपासून तो यांत्रिकपणे घरातल्यांची गडबड, उत्साह पाहत होता. आई बाबा, इतर वडीलधारे जसं सांगतील ते तो करत होता. घरातून बाहेर पडताना देवाच्या पाया पडताना त्याने प्रार्थना केली की त्याला योग्य निर्णय घेण्याचं बळ दे. आई बाबा, सर्व मोठ्यांच्या पाया पडून त्याच्या मनात आलं की कदाचित या घरातून आपण बाहेर पडतोय ते शेवटचं असेल का! एखादी नवरी मुलगी घरातून बाहेर पडताना अगदी व्याकुळ नजरेने घराचा कोपरा ना कोपरा भरल्या डोळ्यांनी आपल्या नजरेत सामावून घेत असते तद्वत तो सगळीकडे बघत होता. त्याची आई सुमनताई त्याला म्हणाल्या,

"अरे कुमार लग्नानंतर तुला इथेच यायचं आहे. असा बावरलेल्या नजरेने का बघतो आहेस. चल आता निघू लवकर. उशीर व्हायला नको."

सगळे घाईघाईने निघाले. दोन तीन गाड्या तयारच होत्या. निघताना कुमार खूप भावूक झाला होता. लग्नाच्या हॉल मध्ये वराकडच्या मंडळीचं यथोचित स्वागत झालं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होतं. कुमार मात्र स्वतःच्याच विचारात गुंग होता. आल्यावर सर्वांनी गरमा गरम बटाटा वडा, मेदु वडा सांबार वर यथेच्छ ताव मारला. सोबत आलं घातलेला वाफाळता चहा सर्वाची लज्जत वाढवत होता. थंडीच्या मोसमात चहाची साथ न्यारी आणि हवीहवीशी वाटते. पाहुणे मंडळी अल्पोपहारावर प्रचंड खुश झाले.

थोड्याच वेळात सुमन ताईंनी कुमारला तयार होण्यासाठी वराकडच्या मंडळींना नेमून देण्यात आलेल्या रुम मध्ये पाठवलं. त्याच्या बरोबर त्यांनी त्यांचा भाचा विशालला त्याची मदत करण्यास सांगितले. दोघे रूम मध्ये गेल्यावर विशाल त्याच्याशी गप्पा मारू लागला.

"कुमार वहिनी अगदी तुला साजेशा आहेत. जुनी लोकं म्हणतात तसा अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडाच जणू!'

प्रत्युत्तरादाखल कुमार फक्त "हम्म" म्हणाला.

विशालशी बोलताना त्याच्या मनात विचारांचे द्वंद चालू होते. त्याला त्याचा लहानपणापासूनचा सारा जीवनपट डोळ्यापुढून सरकून गेला.

कुमार हा सुमनताई आणि श्रीरंग राव यांचा एकुलता एक लेक. श्रीरंग रावांचा वडिलोपार्जित मसाल्यांचा व्यवसाय होता. अगदी दूरदूर वर श्रीरंग गोडबोले यांचं मसाल्यांच्या बाबतीत अग्रगणी नाव घेतलं जायचं. व्यवसाय खूप तेजीत चालायचा. आर्थिक परिस्थिती खूप उत्तम होती. कुमार अगदी सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आला होता. असं असलं तरी त्याच्यावर आई बाबांचे उत्तम संस्कार झाले होते. लाडकोड भरपूर झाले तरी शिस्तीच्या वेळी शिस्त. कुमार पण एकुलता एक असला तरी खूप समजूतदार होता. त्यांच्या घरी आध्यात्मिक वातावरण होते. शिक्षणाबरोबर त्याचे देवा धर्मावर पण प्रेम होते. लहानपणापासूनच खूप हुशार होता. कॉलेज मध्ये गेल्यावर पण तो इतर मुलांप्रमाणे धम्माल मस्ती करण्यात रस घ्यायचा नाही. त्याला त्याचे आई बाबा नेहमी सांगायचे,

"अरे कधी मित्र मैत्रिणीबरोबर बाहेर जायचं. हे कॉलेज लाईफ आयुष्यात एकदाच येतं. त्याचा आपल्या मर्यादेत राहून आस्वाद घ्यायचा."

कुमार त्याच्या त्याच्या मध्ये मग्न असायचा. त्याचं आयुष्य एका सरळ रेषेत चालत होतं. कॉलेज शिक्षण झाल्यावर बाबांनी त्याला आपल्या व्यवसायात लक्ष घालवण्याचे सुचविले.

"कुमार अजून तुला जितके शिकायचं असेल शिक. आमची काहीच हरकत नाही. पण आम्हाला दोघांनाही वाटते की आपला व्यवसाय खूप तेजीत असतानाच तू त्याची सूत्र आपल्याकडे घे."

"बाबा योग्य वेळ आल्यावर मी ते करेनच. पण त्याआधी मला हवी तशी नोकरी करून स्वतःच्या पायावर उभं रहायचं आहे."

"ठीक आहे. जशी तुझी ईच्छा."

कुमारने एका नामांकित आय टी कंपनीत उच्च पदावर नोकरी स्वीकारली. कामात तो खूपच प्रामाणिक आणि हुशार असल्यामुळे कंपनीत त्याचे वरचे अधिकारी खूप खुश होते. कंपनीतल्या समविचारी अशा राजनशी कुमारची खूप छान मैत्री झाली. कुमार घरी पण त्याच्या बद्दल बोलू लागला. आई बाबांना वाटलं की चला आता तरी हा जरा माणसात येऊ लागला आहे. कुमारला राजनचे बोलणे ऐकत राहावंसं वाटायचं. आपण एखादं प्रवचन ऐकतोय की काय असं त्याला वाटायचं. इतक्यात विशालने त्याला काहीतरी विचारलं आणि त्याची तंद्री भंगली


(राजन असे काय बोलायचा की कुमारवर त्याचा इतका पगडा पडला पाहूया पुढील भागात)

क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all