Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ७

अपघाताने दुसऱ्याच मुलाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ७


राजन आणि त्याचे कुटुंबीय चिंतन स्वामी नामक एका स्वामींचे अनुयायी होते. ते सगळेच नियमित त्यांच्या प्रवचनाला जायचे. राजन त्यांच्या विचारांनी खूप प्रभावित झाला होता. त्यांचे विचार राजन नेहमीच जेवणाच्या वेळी कुमारला ऐकवायचा. अशा एखाद्या कार्याने प्रेरित व्यक्तीचे प्रवचन आपण सुद्धा एकदा ऐकायला हवे असे त्याने ठरवलं. त्याने राजनला विचारलं,

"चिंतन स्वामींचे प्रवचन कधी आणि कुठे असतं. मी पण तुझ्याबरोबर एक दिवस येईन."

"अरे एक दिवस कशाला. उद्या मंगळवार आहे. मंगळवारी असतं त्यांचं प्रवचन. ऑफिस सुटल्यावर आपण जाऊया. संध्याकाळी सात वाजता अंधेरीला असते."

कुमार दुसऱ्या दिवशी राजन बरोबर तिथे गेला. तेथील वातावरणाने तो मंत्रमुग्ध झाला. या गडबडीत तो घरी उशिरा येणार असल्याचं कळवायला विसरला. चिंतन स्वामींचे विचार ऐकून प्रभावित झालेला कुमार घरी परतला तेव्हा त्याच्या पुढे वेगळेच ताट वाढून ठेवले होते. कधीही उशीर न करणारा कुमार रात्र झाली तरी घरी आला नाही म्हणून त्याचे आई बाबा चिंताग्रस्त झाले होते. बरं त्याने मोबाईल पण सायलेंट मोड वर ठेवला होता. तो घरात शिरताच दोघांच्याही जीवात जीव आला.

"अरे काय कुमार मोबाईल बघितला का. आमचे किती मिस्ड कॉल आहेत ते बघ. तुला कधीही उशीर होत नाही. आम्ही खूप काळजीत होतो. आता तुला पाहून खूप बरं वाटतंय."

कुमारने मोबाईल काढून पाहिले तर किमान वीस बावीस तरी कॉल होते.

"बाबा मला माफ करा मी तुम्हाला सांगायला विसरलो."

"काही हरकत नाही. पण कुठे गेला होतास ते तरी आम्हाला सांगण्यासारखं आहे ना! कोणी नवीन मैत्रीण भेटली का आमच्या लेकाला."

"काय हो बाबा तुम्हाला माहित आहे ना मी कोणाशी किती बोलतो ते. तुम्हाला मी त्या राजन बद्दल नेहमी बोलतो ना त्याच्या बरोबर मी चिंतन स्वामींच्या प्रवचनाला गेलो होतो. तो आणि त्याच्या घरचे त्यांचे अनुयायी आहेत."

"काय म्हणालास! अरे तुला काय वेड बीड लागलं का. हे तुझे प्रवचनाला जायचं वय आहे का. अरे हे स्वामी तरुण मुलांची दिशाभूल करत असतात. आपण बघतो ना अशा स्वामींच्या आश्रमात काय काय चालतं ते. कित्येक वाममार्गी कामं तिकडे चालतात. मग एकदा हे पकडले गेले की आपल्या सारख्या सामान्य माणसांचे डोळे उघडतात. हे बघ आज गेलास ते ठीक आहे. तू इतर कुठेही जा पण चिंतन स्वामींच्या प्रवचनाला जायचे नाही. आणि हो त्या राजन पासून चार हात दूरच रहा. चल आता हातपाय धुवून जेवायला ये आम्ही वाट पाहतोय."

कुमारला कळतच नव्हतं की एखाद्याचे चांगले विचार ऐकण्यात काय चूक आहे. चिंतन स्वामी अशा भोंदू स्वामींपैकी नाहीत. किती गर्दी होती तिकडे तरी चिंतन स्वामी बोलायला लागल्यावर सर्वजण किती शांत चित्ताने ऐकत होते. त्याच्या डोळ्यासमोरून त्यांचा तेजस्वी चेहरा हटतच नव्हता. इथे त्याचे आईबाबा ह्याला हे काय नवीन खुळ लागलंय म्हणून चिंतीत झाले.

"सुमन आपण कुमारसाठी वधू संशोधन करायला सुरुवात करूया. एकदा संसारात पडला की सगळं विसरेल. आपण आता जेवताना नको, उद्या त्याच्याशी बोलूया."

(कुमार आई बाबांचे ऐकेल की चिंतन स्वामींकडे जात राहील की दुसरे काही घडेल पाहूया पुढील भागात)

क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"

©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all