Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ८

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं

दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ८

दुसऱ्या दिवशी कुमार ऑफिसमधून आल्यावर संध्याकाळी आई बाबांबरोबर गप्पा मारत बसला होता. त्या संधीचा फायदा घेत बाबा म्हणाले,

"हे बघ कुमार तुझ्या मर्जीप्रमाणे तू नोकरीत पण आता सेटल झाला आहेस. आता आम्हाला दोघांनाही वाटतंय की सुनमुख पहावं. आमच्याशी बोलायला घरात अजून एक माणूस वाढेल. मी तरी व्यवसायात व्यस्त असतो पण तुझ्या आईला दिवसभर कंटाळा येतो. शिवाय आपल्याकडे घरात सर्व कामांसाठी मावशी येतात. मैत्रिणींमध्ये रमून रमून तरी ती किती रमणार ना रे. मला असं वाटतंय की हीच योग्य वेळ आहे तुझ्यासाठी वधू संशोधन करण्याची."

"बाबा मला इतक्यात तरी लग्न नाही करायचं. अजून एक-दोन वर्ष गेल्यावर आपण बघूया."

"अरे असं कसं म्हणतोस योग्य वयात लग्न झालं की आम्हाला पण जरा निवांतपणा येईल." सुमन ताई पण त्याला हट्टाने म्हणाल्या,

"आजवर तुला जे काही करायचं होतं ते करण्याची आम्ही तुला मुभ दिली. आता आमचं इतकं तरी ऐक ना राजा."

"चला मी जरा बाहेर पाय मोकळे करून येतो." असं म्हणून कुमार उठून पायात चपला सरकवून बाहेरच पडला. दोघांनाही कळून चुकलं हा का इतक्यात लग्न करणार नाही.

बाहेर पडल्यावर कुमारने राजनला फोन केला.

"राजन उद्या ऑफिसमधून एक तास लवकर निघून जरा बाहेर बसून बोलूया. मला एका महत्त्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं आहे."

"हो नक्कीच चालेल."

कुमारने बाबांनी विरोध करूनसुद्धा चिंतन स्वामींच्या प्रवचनाला जाणं चालूच ठेवलं होतं. त्यासाठी त्याने एक युक्ती लढवली होती. घरी तो नेहमी वेळेतच यायचा त्यामुळे त्याला जरा उशीर झाला की आई बबा दोघेही काळजी करायचे. म्हणून त्याने एकदा जेवता जेवता बाबांना सांगितलं,

"आमच्या ऑफिसमध्ये वर्कलोड वाढलं आहे त्यामुळे साहेब म्हणाले की आठवड्यातून एक दोन दिवस प्रत्येकाला ओव्हरटाईम करावा लागेल. त्यांनी प्रत्येकाला वार ठरवून दिले आहेत. त्याप्रमाणे मला मंगळवार आणि शुक्रवार थांबायला सांगितलं आहे."

"हे तू आम्हाला आधी सांगितलं ते बरं झालं म्हणजे आम्ही विनाकारण तुझी काळजी करणार नाही."

मंगळवारी चिंतन स्वामींचे प्रवचन असतं म्हणून ही युक्ती राजनने कुमारला सांगितली होती. पण प्रत्येक मंगळवारी घरी उशिरा गेलं तर कळेल म्हणून त्याने दोन दिवसांची सवलत घेतली. मंगळवारी दोघेही ऑफिस सुटल्यावर प्रवचनाला जायचे आणि शुक्रवारी कुमार राजनच्या घरी गप्पा मारायला यायचा. त्यानिमित्ताने त्याला त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांचे विचार ऐकायला मिळायचे. दिवसेंदिवस कुमारवर चिंतन स्वामींचा प्रभाव वाढत चालला होता. एक दिवस प्रवचन संपल्यावर राजन कुमारला म्हणाला,

"मी अजून एक दोन वर्ष नोकरी करणार आणि नंतर मात्र मी कायमचा स्वामींच्या आश्रमात येऊन
त्यांच्या आणि आश्रमातील इतरांच्या सेवेला राहणार आहे."

"अरे काय म्हणतोस! पण तुझे घरचे लोक या गोष्टीला तयार होतील का? आणि मग तुझ्या लग्नाचे काय!"

"मी लग्न करणारच नाही आणि आमच्या घरात हे सर्वांना माहिती आहे. सर्वच स्वामींचे अनुयायी असल्यामुळे त्यांनी मला परवानगी दिली आहे."

"नशीबवान आहेस तू. तू तुझ्या आवडीच्या परमार्थाकडे जाऊ शकतोस."

"तू पण हळूहळू घरच्यांचं मन वळवायचा प्रयत्न कर."

इकडे कुमार लग्न करेल की नाही या चिंतेने श्रीरंगरावांची प्रकृती नरम-गरम राहू लागली. एके दिवशी त्यांना विलक्षण अस्वस्थ वाटू लागलं. तेव्हा कुमार पण खूप घाबरून गेला. बाबांनी त्याला जवळ बोलावून म्हटलं,

"कुमार माझ्या आयुष्याचे आता काही सांगता येत नाही. आता तरी तू लग्नाचा विचार कर."

"बाबा असं नका म्हणू. आम्हाला तुम्ही हवे आहात."

कुमारचं बाबांशी खूपच सख्य होतं. तो त्याच्या मनातील सारं काही बाबांना बिनदिक्कतपणे सांगत होता. फक्त चिंतन स्वामींच्या बाबतीत त्याने त्या घटनेनंतर बाबांजवळ कधीच विषय काढला नाही.

कुमार विचार मग्न झालेला पाहून बाबा त्याला म्हणाले,

"तू मला तसं वचनच दे की तू लग्नाला तयार होशील. तर आणि तरच माझ्या परिस्थितीत काही सुधारणा होऊ शकेल." सुमन ताई मोठ्या आशेने त्याच्याकडे पहात म्हणाल्या,

"अरे कसला विचार करतोस बाबांना असं वचन दे ना. आम्ही काय तुला अगदी लगेचच लग्न कर असं म्हणत नाही."

"ठीक आहे बाबा मी लग्नाला हो म्हणेन तुम्ही आता लवकर बरे व्हा."

(कुमारने बाबांना तसं वचन दिल्यावर त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू झालं. लग्नाच्या दिवशी कुमार आश्रमात गेला असेल की त्याने जीवाचं काही बरवाईट केलं पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all