दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १०
ठरल्याप्रमाणे समिधा आणि कुमार रविवारी संध्याकाळी भेटले. समिधा खूपच छान दिसत होती. तिला पाहून काही क्षण कुमार अनिमिष नेत्रांनीं तिच्याकडे पहात राहिला. त्याच्या मनात आलं की चिंतन स्वामींचं कार्य संसारात राहून करता आलं असतं तर किती छान झालं असतं. समिधा आपल्याला आवडली आहे आणि आई-बाबांना पण सुखी ठेवता आलं असतं. क्षणार्धात त्याचे विचार बदलले आणि तो समिधाशी औपचारिक बोलू लागला.
"तुला ट्रॅफिक तर नाही लागला ना."
"नाही काही विशेष नाही."
त्यानंतर कुमार स्वतःहून काही बोलेच ना. तेव्हा समिधानेच पुढाकार घेऊन त्याला विचारलं,
"तुमच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी, छंद याबद्दल मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मला स्वतःला वाचन करायला खूप आवडतं. त्याचप्रमाणे काम करता करता गाणं गुणगुणायला माझी नेहमीच तयारी असते. तुमचं काय?"
"नाही खाण्यापिण्याच्या माझ्या विशेष आवडी नाहीत. घरी बनवलेले मी सगळंच खातो."
"तुम्ही नेहमी असंच त्रोटक बोलता का! माझ्याशी लग्न झाल्यावर मात्र तुम्हाला भरपूर बोलायची सवय करून घ्यावी लागेल. मी जास्त वेळ शांत बसू राहत नाही. मला गप्पा मारायला खूप आवडतं."
"हो बहुतेक मुलींचे तसंच असतं."
कुमार स्वतःहून जास्त काही बोलत नव्हता त्यामुळे समिधाला वाटलं कदाचित सुरुवातीला काही जणांना बोलताना भीड वाटते. कदाचित याचेही तसंच असेल. एखाद्या गाडीला जसा स्टार्टअपचा प्रॉब्लेम असतो तसा ह्याचा असावा कदाचित. याची तुलना आपण एखाद्या गाडीशी केल्याची गंमत वाटून ती मनोमन हसली. कसं असतं ना जीवनात संवाद हवा नाहीतर ते निरस होऊन जातं. अर्थात असं प्रत्येकाला वाटायला हवं ना! तिने विचार केला असं नुसतच बसून राहण्यात काही अर्थ नाही म्हणून ती त्याला म्हणाली,
"आता आपण निघूया का. पुढच्या वेळी भेटायला याल तेव्हा आरशासमोर गप्पा मारायची तयारी करून ठेवा."
"समिधा तुझ्याशीच असं नाही पण मी एकंदरीतच कमी बोलतो."
"असं म्हणणाऱ्यांच्या आयुष्यात लग्नानंतर फरक पडतोच. चला बाय मी निघते."
समिधा तिथून निघाल्यावर तिच्या मनात आलं बापरे अशा अबोल माणसाबरोबर संसार करायचा म्हणजे जरा कठीणच आहे. काही का असेना आई-बाबांना हा मुलगा योग्य वाटला आणि मुळात तो खूप हुशार, समजूतदार आहे असं बाबा म्हणाले. लग्नानंतर त्याच्या वागणुकीत फरक पडेलच.
कुमारच्या मनात येत होतं की ही घरी असल्यावर आपल्याला कायम बोलतं ठेवणार की काय. कदाचित नंतर तिला आपला स्वभाव कळल्यावर ती आपल्याकडून जास्त अपेक्षा ठेवणार नाही. बघूया पुढचं पुढे. आई-बाबांना जशी मुलगी हवी होती तशी समिधा आहे त्यामुळे ते तरी खुश राहतील.
समिधा घरात शिरताच तिच्या आई-बाबांनी तिला विचारले,
"काय ग समू जावईबापू बोलायला कसे आहेत. तुमचा दोघांचा जोडा शोभून दिसेल एवढे मात्र नक्की. तुला आवडला ना कुमार."
"हो ते चांगले आहेत. न आवडण्यासारखं त्यांच्यात काहीच नाही."
इकडे कुमारच्या घरी कुमार घरात शिरताच त्याचे आई-बाबा म्हणाले,
"काय रे समिधाशी तरी नीट बोललास ना. की आपल्या घरच्या सारखाच अगदी जेवढ्यास तेवढं बोलला."
"अहो काही नाही हो समिधाच्या सानिध्यात आल्यावर त्याला भरपूर बोलावं असं वाटू लागलं असेल. आता एकदा लग्न झालं की आपला मुलगा पण इतरांसारखा संसारात गुरफटून जाईल."
"घोडा मैदान जवळच आहे आपल्याला लगेचच कळेल."
"आई आणि बाबा लग्न ठरल्यापासून तुम्ही अगदी माझ्या वागणुकीचे जासूस झाला आहात. माझ्याकडे बघून तर्कवितर्क सुरू होतात लगेच. मी आलो फ्रेश होऊन मग आपण जेवायला बसू."
"जेवायला! अरे मला वाटलं समिधाला भेटून तुझं पोट भरलं की काय." मस्करी करण्याच्या इराद्याने सुमनताई म्हणाल्या. त्यांची री ओढत श्रीरंग राव म्हणाले,
"हॉटेल मध्ये तिच्या बरोबर गप्पा मारताना मस्त गरमागरम खमंग काही खाल्ले असशीलच."
"नाही खाल्लं काही. आमचं पुढच्या वेळी हॉटेलमध्ये जायचं ठरलं आहे." आई-बाबांचा ससेमीरा चुकवण्यासाठी कुमार हळूच बोलला. कुमारचं मन दोलायमान झालं होतं.
(कुमारच्या आयुष्याचे भरकटलेले तारु मार्गी लागावं असं सध्या तरी त्याला वाटतंय. आता काय घडेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा