दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26
माझे मन अखेर तुझे झाले _ भाग ११
लग्नाच्या आधी चार पाच वेळा कुमार आणि समिधा एकमेकांना भेटले पण समिधाला त्याच्या स्वभावाचा काही थांगपत्ता लागला नव्हता. आज त्यांच्या लग्नाचा दिवस उजाडला होता. मधल्या काळात कुमार आणि राजनमध्ये बरंच बोलणं झालं. राजन ने त्याला समजावून सांगितले की तू लग्न केलं तर ते नीट निभाव. आई बाबांना दिलेल्या वचनाला जाग. एकदा तू ह्या सेवेच्या कामात उडी घेतलीस की तुला बाहेर पडता येणार नाही. अर्थात तिथे आश्रमात गेल्यावर आपल्या घरच्याना भेटण्यासाठी महिन्यातून एकदा सवलत मिळते. काही जण ह्या सवलतीत पण घरच्यांच्या प्रेमाला बळी पडून आश्रम सोडून जातात. स्वामी म्हणतात जे स्वेच्छेने इथे राहतील त्यांचं स्वागत आहे पण कोणीही मनाविरुद्ध इथे राहू नये. अशा कामासाठी मनापासून तयारी हवी. तरच ती व्यक्ती तिचं पूर्ण योगदान देऊ शकते.
ह्याचमुळे लग्नाच्या दिवशी कुमार विशालशी बोलताना पण त्याच्या विचारांमध्ये हरवला होता. राजनने त्याला सांगून ठेवलं होतं की तुझा विचार पक्का झाला की मला फोन कर मी टॅक्सी घेऊन हॉलच्या कोपऱ्यावर उभा राहीन. कोणाला काही न सांगता ये कारण आता तुला तिथून निघायला कोणी परवानगी देणार नाही. दुसरं एक लक्षात ठेव मला फोन केल्यावर लगेच मोबाईल स्विच ऑफ कर.
राजनने सांगितलेले सगळं ऐकून कुमार लग्नाला तयार झाला असला तरी द्विधा मनःस्थितीत होता. एकदा त्याच्या मनात येत होतं आपण न सांगता निघून गेलो तर आईबाबांची काय परिस्थिती होईल. जमलेल्या सर्व लोकांना ते कसं तोंड दाखवतील. आपल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ यायला नको. आज आपलं लग्न होतंय म्हणून ते किती खुश आहेत. असं असलं तरी रात्री सगळे झोपल्यावर आईबाबांसाठी एक चिठ्ठी ज्यात त्याने लिहिलं होतं,
"आई बाबा तुम्ही माझा शोध घेऊ नका मी माझं ध्येय गाठण्यासाठी चिंतन स्वामींच्या आश्रमात जाणार आहे. तुम्ही तिथे येऊन माझं मन वळवण्याचा निष्फळ प्रयत्न करू नका."
त्याने लिहिलेली चिठ्ठी त्याने एका सोन्याच्या चेनच्या पेटीत अशा रीतीने ठेवली होती की ती त्यांना केवळ दुसऱ्या दिवशीच मिळू शकेल.
जेव्हा त्याच्या मनात समिधाचा विचार आला तेव्हा त्याला खूप भीती वाटली. ह्या सगळ्यात तिचा काय दोष. आपल्या ह्या निर्णयाने तिचं आयुष्य उध्वस्त होईल. तिचे आई बाबा काय करतील. त्यांच्यावर खूप नामुष्कीची वेळ येईल. हे सर्व टाळायचं असेल तर आपण ठरविल्याप्रमाणे लग्न करूया का!
शेवटी त्याने ठरवलं की जे व्हायचं असेल ते होऊ दे. आपल्याला आश्रमातील लोकांची सेवा करण्यात जर मानसिक आनंद मिळणार असेल तर आपण लग्नाचा जुलूमाचा रामराम कशाला घ्यायचा. कुमार गप्प बसलेला बघून विशाल त्याला म्हणाला,
"काय रे कसलं दडपण आहे का तुझ्या मनावर. मी मघापासून बघतोय मी किती बडबड करतोय तरी तू गप्प गप्प आहे."
कुमारला एक कल्पना सुचली. त्याने विचार केला की ह्याला इथून थोडा वेळ कुठे जायला सांगितलं तर आपल्याला पाच मिनिटांचा वेळ मिळेल. आपण कपडे बदलून राजन ला फोन करून इथून सटकू शकतो. म्हणून तो जरा बसल्या आवाजात विशालला म्हणाला,
"अरे तसं काही नाही. तू एक काम करतोस का. माझा घसा खवखवतोय. इथे हे साधं पाणी आहे. तू खाली जाऊन मला एक ग्लास गरम पाणी आणशील का?"
विशाल खाली पाणी आणायला गेल्या बरोबर त्याने राजनला फोन केला आणि मोबाईल स्विच ऑफ केला. पटकन कपडे बदलून डोक्यावर कॅप चढवली. ती कपाळावरून थोडी खाली ओढली. दरवाजा उघडला तर दारात बाबा उभे आणि मग नंतरचा सगळा गोंधळ. बाहेर जाता जाता त्याने खिशातील मास्क काढून चेहऱ्यावर लावला आणि भरभर पावलं उचलत तो राजन बसलेल्या टॅक्सीत बसला. तो बसल्याबरोबर राजनने स्वतःच्या मोबाईल वर टॅक्सी वाल्याला कळू नये म्हणून मेसेज टाईप केला, "फोन मधून सिम कार्ड काढून टाक". या प्रमाणे त्याने सिम कार्ड काढून टाकलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला. टॅक्सीने आश्रमाची वाट धरली.
(आता समिधाची आई बाबा तिच्याशी रूममध्ये काय बोलायला आले आहेत ते पाहुया पुढील भागात)
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा