Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १२

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १२


बाहेर सुभाषरावांच्या नात्यातील तरुण मंडळींना शांत राहण्याची विनंती करून श्रीरंग राव आणि सुमन ताईंशी बोलणं झाल्यावर ते दोघं आणि त्यांचा भाऊ बाहेर गेला. सुभाष राव दोघींना उद्देशून म्हणाले,

"हे बघा आता आपल्याला काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे. सुषमा तू तुझी मोठी बहीण आणि भाऊजीना लागलीच इथे बोलावून आण. तो निर्णय काय घ्यायचा हे ठरवण्यात त्यांची मदतच होईल."

हे बोलताना बाबांना धाप लागली आहे हे बघून समिधाने त्यांना खुर्चीवर बसवून पाणी प्यायला लावलं. त्यांना जरा बरं वाटलं. सुषमा लगेच नीलिमा आणि भाऊजीना घेऊन आली. ते आल्यावर सुभाष रावांनी सगळ्यांना बसायला सांगितलं,

"हे बघा माझ्या मनात एक विचार येतोय तो मी तुमच्यासमोर मांडतो. तुम्ही सगळ्यांनी तो योग्य असेल तर मला नक्की सांगा. खास करून समिधा हा तुझ्या आयुष्याशी निगडित प्रश्न आहे. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नकोस."

"अहो आता आधी तुमच्या मनात काय आहे ते तरी सांगा उगाच आमचा जीव टांगणीला लावू नका." सुषमा ताई उताविळपणे म्हणाल्या.

"आता हा कुमार तर निघून गेला आहे. तो अजून थोड्या वेळात येईल की नाही काहीच माहित नाही. त्याच्या बाबतीत काय झालं असेल ते देवालाच ठाऊक! त्याच्या आई बाबांना सुद्धा माहित नसणार ह्यावर माझा विश्वास आहे. ती एकदम सच्ची माणसं आहेत." समिधा म्हणाली,

"बाबा पुढे काय?"

"हे लग्न मोडल्यातच जमा आहे. असं झालं तर आपली आणि आपल्या मुलीची नाहक बदनामी होणार. यातून मला एक मार्ग सुचतोय. इथे उपस्थित मंडळी आपली नातेवाईक, परिचयातील स्नेही आहेत. तसेच कुमारकडचे लोक आहेत. मी स्टेजवर जाऊन सुयोग्य तरुणांना आव्हान करणार आहे की त्यांच्या पैकी कोणी समिधाशी लग्न करायला तयार आहे का? तसं कोणी तयार असेल तर मी आधी दोघांना चर्चा करायला सांगून निर्णय घ्यायला सांगेन. आता तुम्हाला काय वाटतं ते सांगा."

"बाबा हे तर एखाद्या चित्रपटाप्रमाणे झालं. अर्थात तुम्ही योग्य तोच निर्णय घ्याल ह्याची मला खात्री आहे. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही."

समिधा असं बोलली त्यावेळी तिच्या मनात आलं हे लग्न मोडले तर आपल्या आई बाबांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागेल. पुन्हा नव्याने माझं लग्न जुळणे कठीण होईल कारण प्रत्येक स्थळाकडून हे लग्न का मोडले हा प्रश्न येईलच. शिवाय आपल्या पाठच्या तीन बहिणींच्या आयुष्यावर पण परिणाम होतील ते वेगळेच. आपण बिन लग्नाच्या राहिलो तरी आई बाबांना लोकांचं ऐकावं लागेल. बाबा तर आताच थकल्यासारखे वाटत आहेत.

ही एक बाजू झाली शिवाय बाबांनी खूप खर्च केला आहे. मी हातभार लावला आहे. अशा वेळी मी फक्त स्वतःचा विचार करून स्वार्थीपणे वागू शकत नाही. सगळे आपापसात बोलत असताना समिधा निर्णायक स्वरात बोलली,

"आई आणि बाबा मला तुमच्या इज्जतीपेक्षा दुसरे काहीही महत्त्वाचे नाही. तुम्हाला योग्य वाटेल असा तरुण लग्नाला तयार झाला तर मी लग्नाला तयार आहे."

"हे बघ समू तू भावनेच्या भरात काही बोलू नकोस. एक तर लग्न मोडले तर लोक चार दिवस बोलतील पुन्हा आपल्या जीवनात व्यस्त होतील. तुला हे खरोखर मान्य असेल तरच तू हो म्हण. हा तुझ्या पूर्ण जीवनाचा प्रश्न आहे. होकार देण्याचा जुगार खेळण्यापेक्षा दहा वेळा विचार कर."

नीलिमा आणि भाऊजी दोघेही म्हणाले,

"समिधा तयार असेल तर हा निर्णय घेणंच योग्य ठरेल. काय माहित पुढे येणारा मुलगा कदाचित कुमार पेक्षा चांगला असू शकतो. आपण नेहमी म्हणतो ना जे होतं ते चांगल्या साठीच होतं."

"ठीक आहे तुम्हा सर्वांची संमती असेल तर मी बाहेर जाऊन हे सर्वांसमोर बोलतो. भाऊजी तुम्ही माझ्याबरोबर चला."

(कोण मोठ्या मनाचा तरुण समिधाशी लग्न करायला तयार होईल पाहूया पुढील भागात)

क्रमशः

सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all