Login

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १४

अपघाताने दुसऱ्याच तरुणाशी नाईलाजाने लग्न होतं
दीर्घकथा लेखन स्पर्धा डिसेंबर _ जानेवारी 2025_26

माझे मन अखेर तुझे झाले _ भाग १४


समिधाच्या लहान घराबद्दल पण ती किती आपुलकीने बोलते हे पाहून मनोजला तिच्याबद्दल प्रेमा बरोबर आदर वाटू लागला. नाहीतर हल्लीच्या मुला मुलींना असेल त्यापेक्षा जास्त शो ऑफ करायची सवय असते. तिचं बोलणं ऐकून मनोज तिला म्हणाला,

"तुझं घर लहान असलं तरी तुझं मन खूप मोठं आहे. समिधा आता आपण एक काम करायचं. हे बघ आता आपण तुझ्या घरी जमायचं असं ठरवून माझ्या घरी सगळ्यांनी यायचं."

"बघा बघा आतापासूनच सांगतोय की माझं घर पण तुझंच आहे. क्या बात है मनोज. हो आणि त्यानिमित्ताने समिधा त्याच्या घरी दोन वेळा जाऊ शकेल." सगळेजण हसायला लागले. त्यांना
जळवायला मनोज पण म्हणाला,

"तसं पण माझ्या आईला समिधा खूप आवडते आणि ती तर म्हणाली की तू तिला एकटीला पण आपल्या घरी बोलावू शकतोस म्हणजे माझी तिची पण छान मैत्री होईल." समिधा लाजून म्हणाली,

"अरे आता गप्प बसा नाहीतर मी कोणाच्याच घरी येणार नाही."

"बरं बाई आम्ही गप्प बसतो पण तू सर्वांकडे यायचं."

मस्करी मस्करीत पण मनोज समिधाला सुचवत होता की त्याच्या आईला ती आवडते. समिधाला वाटलं खरंच का आपण त्यांना आवडतोय. समिधाला पण मनोज मनापासून आवडत होता. इतका श्रीमंत असून सुद्धा त्याला त्याच्या श्रीमंतीचा अजिबात गर्व नव्हता. उलट तो खूप दिलदार होता. अडल्या नडल्याला मदत करायला तो सर्वात पुढे असायचा. तिच्या मनात पण त्याच्या विषयी प्रेमभावना फुलत होत्या. एकदा ते सर्व पिकनिकला गेले असताना मनोज तिचा सहवास जास्तीत जास्त कसा मिळेल हे पहात होता. त्यांच्या प्रेमाबद्दल ग्रुपमधील सर्वांना माहिती होते त्यामुळे ते पण त्यांची मस्करी करून त्यांना एकांत मिळवून देत होते. खूप सुंदर निसर्गाच्या सानिध्यात दोघे एकमेकांचा हात धरून चालत होते. समिधाच्या मनात येत होतं की मनोजचा हा हात असा अखंड माझ्या हातात राहायला हवा. मनोज तर एकदम सातवे आस्मा पे होता. तो तिला म्हणाला,

"आता येत्या रविवारी तू एकटीच माझ्या घरी येशील का म्हणजे मी आई-बाबांशी तुझी व्यवस्थित ओळख करून देईन. मी घरी तुझ्याबद्दल अधून मधून बोलत असतो त्यामुळे आईला पण तुला भेटण्याची उत्सुकता आहे."

"अरे रविवारी मला आईला मदत करावी लागते. माझी आई घरगुती खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स घेते त्यामुळे मी घरी नसताना तर ती एकटीच सगळं करत असते. ठीक आहे मी आईला रविवारी सकाळी लवकर लवकर सगळं करून देईन आणि चारच्या सुमारास तुझ्या घरी येईन."

"काही हरकत नाही. समिधा तू पण तुझ्या घरी आपल्या दोघांबद्दल बोलून ठेव. आपलं हे शेवटचे वर्ष आहे कॉलेजचं. कॉलेज नंतर तू नोकरी करणार हे तर तू ठरवलंच आहेस. लगेच तुझ्या घरच्यांनी तुझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात नको करायला."

"मनोज माझ्या घरचे तर नाही म्हणणार नाहीत पण आधी आपण तुझ्या घरच्यांचा निर्णय ऐकू आणि मगच मी माझ्या घरी सांगेन."

संध्याकाळी घरी परतताना दोघेही एकमेकांच्या सानिध्यात इतका वेळ राहायला मिळाल्याबद्दल खूप आनंदी होते. रोज रात्री एकमेकांची स्वप्न पाहतच ते निद्रा देवीच्या अधीन होत होते. समिधा हल्ली घरात गुमसुम राहत असलेली पाहून तिच्या आईला पण थोडं आश्चर्य वाटत होतं. तिने एकदा तिला विचारलं पण,

"काय ग हल्ली तू कसल्या एवढ्या विचारात
गढलेली असतेस. आपलं सर्व छानच होणार आहे तू जास्त विचार करत जाऊ नकोस."

"नाही ग आई मी कॉलेजच्या अभ्यासाचा विचार करत असते. आता हे शेवटचं वर्ष आहे खूप चांगले मार्क मिळाले तरच मला मनासारखी नोकरी मिळू शकेल."

"खरंच तुम्ही चारी बहिणी खूपच हुशार आणि गुणी आहात त्यामुळे आम्हाला तुमची इतकी काळजी वाटत नाही."

(येत्या रविवारी समिधा मनोजच्या घरी
जाणार आहे त्याच्या आईचं तिच्याबद्दल काय मत होतं पाहूया पुढील भागात)

क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


©️®️सीमा गंगाधरे
0

🎭 Series Post

View all